गुरुवार, ३० जुलै, २०२०

माझ्या वाटचं थोडं


गेल्या वर्षी, महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घालण्याआधी खरडलेलं काहीतरी...

आकाशातल्या ढगास..




ऐक ना ...
दिल्लीतल्या माझ्या ऑफिसमध्ये माझी जागा खिडकीत आहे...
A girl working in the officeएसीने शुष्क आणि थंड झालेल्या ऑफिसच्या त्या खिडकीतून पाहते मी रोज तुला!!!

काय? पावसाचा सांगावा नाहीये तुझ्याकडे... बरं मग ऐक ना... थांब ना!
कुठे चाललायस...पुण्याला, मुंबईला? 
माझा सांगावा घेऊन जातोस?

असं कर पुण्याला जा... आणि तिथून मुंबई; कुठलीही शिवनेरी सोडेल तुला. 
एक्स्प्रेस वे आता धुक्याने भरला असेल, लोणावळ्याच्या पुढे धबधबे सुरू झाले असतील...
त्यात भिज थोडंसं...
एक मक्याचं भाजलेलं कणीस खा पावसात भिजत भिजत ... माझ्या वाटचं!!

जुलै मध्यावर आलाय, सह्याद्रीला पान्हा फुटला असेल. त्याच्या कड्याकपारीतून अमृत खळाळून वाहत असेल... 
ढेकर येईपर्यंत प्राशून घे ते... माझ्या वाटचं थोडसं!

रानवाटा जाग्या झाल्या असतील आता ... ट्रेकर्सची चाहूल लागली असेल त्यांना ... जाऊन भेट त्या पायवाटांना... निरोप दे माझा. म्हणावं खूप अंतर पडलंय आपल्यात. नव्या वाटा तुडवताना पायाखालचा मऊ चिखल अजूनही सुखावतो. कुठे तोल गेला तर तुझ्या अंगाखाद्यावारच्या चिवट वेली आणि कणखर बेसाल्टची आठवण येतेच."

पुण्यातल्या रस्त्यांच्या नद्या झाल्या असतील आता. त्यात मेट्रोच काम...
जॅकेट घालून बाईकवर मुळशीला एक चक्कर टाकून ये...
पाउस ररपारप कोसळू दे चेहेऱ्यावर...
आरशात बघताना फुललेला तजेला दिसू दे... मज्जा कर तिकडे ... माझ्या वाटची!

तसाच बीएमसीसीच्या ग्राउंडवर जा... तळं साचलं असेल कदाचित!
Rashtrapati Bhawan Delhi
Add caption
त्यात माझं प्रतिबिंब दिसतंय का ते पाहून ये ! 
तिथल्या flag post ला हाय सांग. 
सांग त्याला, हल्ली १५ ऑगस्ट, २६ जानेवारीचं ध्वजवंदन दिल्लीत होतं, पण मनात ग्राउंडवरचं संचलन चालू असतं.
किंवा असं कर ना... ते सोड सगळं .. तिकडे बीड, मराठवाड्याकडे जा ना ढगांना घेऊन...
अनेकजण व्याकुळलेत तुझ्यासाठी... 
माझ्यासारखेच...
माझ्या वाटंच थोडं पाणी त्यांना दे...थोडी मज्जा त्यांनाही करू दे !
माझ्या वाटची...    
तेजाली
१५ जुलै २०१९