रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

मेघालय भाग-३


तेजाली चं शहासने
(टीप- हा भाग थोडा मोठा आहे.)
गुवाहाटीचा विमानतळ नेटका आहे. छोटासा, आटोपशीर, स्वच्छ. उतरल्यावर पहिला प्रश्न होता आता पुढे कसं जायचं शिलॉंगला. अचानक ठरवलेल्या प्रवासाची ही एक गंमत असते. पुढे काय घडणार काहीच माहिती नसतं. आपण आणि आपली निर्णयक्षमता. विमानतळावर मेघालय टुरिझमचा स्टॉल होता, पण तो अजून उघडला नव्हता. बसने जायचं की टॅक्सी/ओला याचा विचार चालू होता. दोन मुली प्रवास करत असल्या की सुरक्षिततेचा विचार सर्वांत आधी. शेवटी काळ, काम वेगाचं गणित मांडून आम्ही दोघींनी टॅक्सी करायचं ठरवलं. सहज चेक केल तर ओला आऊटस्टेशन दाखवत होतं. सरळ बुक केली, पंधरा मिनिटांत गाडी हजर आणि आम्ही सुटलो शिलॉंगच्या दिशेने. गुवाहाटीवरून शिलॉंगला जाण्यासाठी बस, टॅक्सी कोणताही पर्याय निवडा, पोटातल पाणी हलणार नाही इतका रस्ता मख्खन आहे. घाटाघाटातून, हिरव्या गच्च झाडीतून वर वर जात आपण शिलॉंगला पोचतो. शिलॉंगच्या साधारण ३० किमी आधी उमरॉई इथे शिलॉंगचं विमानतळ आहे आणि तिथेच बारपानी किंवा उमईयाम जलाशय आहे. मेघालयातल्या स्थलदर्शनाची सुरुवात इथून होते. आमच्या ड्रायव्हरने मुद्दाम तिथे गाडी थांबवली. आपल्या मॅप्रोजवळ वाटत तसंच वाटलं थोडंसं, पण अनुभव आणखी भव्य आणि श्रीमंत. थोडावेळ थांबलो, पावसाची बुरबुर सुरू झाली तसे निघालो, थेट हॉटेलात पोचलो. दुपार झालेली. निवांत जेवलो. आमच्या हॉटेल मालकाने आमच्यासाठी गाडी सांगून ठेवली होती. एक नवा अनुभव आमची परीक्षा बघायला सज्ज होता.
ड्रायव्हर, थोडे वयस्कर काका होते. आम्ही निघालो तसं हॉटेल मालकाने ड्रायव्हरला त्यांच्या भाषेत पटापट सूचना दिल्या, संध्याकाळपर्यंत फिरवून हॉटेलमध्ये सोडायला सांगितलं. नंतर आमच्या लक्षात आल की त्यांना इंग्लिश, हिंदी, मराठी यातली कुठलीच भाषा येतं नाही. सुरुवातीला आमच्या हिंदीला त्यांनी जुजबी उत्तर दिली. पण आम्ही काय सांगतो हेच त्यांना कळेना. आम्हाला तिथल्या टुरीझम ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करायची होती, त्यांना काही केल्या झेपेना. शेवटी त्यांना म्हटलं, थांबा. बाजूने जाणाऱ्या एका मुलाला थांबवलं. त्याला विचारलं, बाबा, इंग्लिश/हिंदी येते? म्हणाला इंग्लिश येते. मग मी त्या मुलाला आणि त्याने त्या काकांना समजवलं आणि एकदाचे त्या ऑफिसमध्ये पोचलो. तिथल्या कर्मचाऱ्यांनी प्रेक्षणीय स्थळांची माहिती दिली, शंका समाधान केलं. गंगटोकच्या टुरिझम ऑफिसमधला अनुभवही असाच सुखावह होता.
मेघालयमधे जास्त विचार न करता फिरायचं असेल तर मेघालय टुरिझमच्या बसेस तुमच्यासाठी स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. शिलॉँगच्या बाजारपेठेतून रोज सकाळी ७-८ च्या सुमारास या बसेस सुटतात, दिवसभर तुम्हाला फिरवून संध्याकाळी परत आणून सोडतात. बससोबत गाईड असतात, ते इंग्रजीतून माहिती देतात. शासनाने ठरवून दिलेले दर आहेत त्यामुळे फसवणुकीचा प्रश्न नाही. थेट ऑफिसात जा, शक्यतो आदल्या दिवशी तिकीट काढा कारण बस संख्या मर्यादित असते. सकाळी वेळेत पोहोचा आणि मेघालयभर हुंदडा. शिलॉँगवरून एका दिवसात जाऊन येण्याच्या दृष्टीने या सहली आखलेल्या आहेत. रोज एक या हिशेबाने ५ सहली करत तुमचं मेघालय फिरून होतं. पण दुर्गम भागात आणखीही अनेक अद्भुत ठिकाणं आहेत ज्यांच्यासाठी थोडी पूर्वतयारी आणि नियोजन गरजेचं आहे.
मेघालयात पर्यटनाची प्रमुख आकर्षण म्हणजे तिथले जीवंत ‘मूलसेतू’, तिथल्या गुहा आणि त्यांतील लवणस्तंभ, उमनगोट नदीचं निवळशंख पात्र आणि धबधबे. त्यातही तुम्हाला खासम खास, धाडसी पर्यटन करायचं असेल तर इथल्या महाकाय गुंफा आणि दुर्गम भागातले मूलसेतू तुमच्यासाठी आहेत. तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण जगभरातील काही विशालकाय गुहा मेघालयात आहेत. कधीही न बघितलेललं एक वेगळंच जग या गुहांमध्ये आहे. भारतातल्या सर्वांत लांब १० गुहांपैकी ९ या मेघालयमधे तर १ मिजोरममधे आहे. गुंफा पर्यटन हा तिथला एक महत्त्वाचा उद्योग आहे. पण अर्थात यासाठी प्रशिक्षण, सराव, माहिती खूप गरजेची आहे.
तसंच मूलसेतू; मेघालयामधे जवळपास ६-७ असे सेतू आहेत. त्यातला एक शिलॉंगजवळ आहे. तो तुम्हाला टूरमध्ये दाखवतात. हा सर्वांत सोप्पा आणि त्यामुळे प्रसिद्धही आहे. इथे पर्यटकांची सतत गर्दी असते. पण खरंच त्यातली अद्भुतता बघायची असेल तर दुर्गम भागातले दुमजली सेतू नक्की पाहा. ट्रेकिंग आवडत असेल, सवय असेल तर तुम्ही तिकडे जायलाच हवं. हौशी, वेळेची मर्यादा असलेल्या पर्यटकांच्या दृष्टीने मेघालय पर्यटन विभागाने ५ विभाग करून रोज एक विभाग बघता येईल अशा प्रकारे सहली आखल्या आहेत. सोहरा(चेरपुंजी), शिलॉँग, मॉसिनराम (जगातील सर्वांत चिंब ठिकाण, एकेकाळी हा मान चेरपुंजीकडे होता.), मॉवलिननॉंग, आणि नार्तियांग/जोवई असे हे पाच विभाग आहेत. अंतर येऊन जाऊन साधारण १५० ते २०० किमी. पण अंतरावर जाऊ नका, इथल्या वळणांमुळे प्रवास तुमची दमछाक करतात.
मेघालयाचं नियोजन करताना पर्यटनाचा उद्देश नक्की केलात तर पर्यटन स्थळे निवडणं सोपं जाईल. नेहमीचं पर्यटन, गुंफा भ्रमंती आणि मूलसेतूदर्शन यातलं तुम्हाला काय आणि किती हवंय ते ठरवा आणि नियोजन करा. तिथले नयनरम्य धबधबे या पर्यटनातला बोनस. काही खास नियोजनाची गरज नाही. जाता येता वाटेवरच हे भेटतात. अर्थात त्यातही काही मस्ट आहेतच.
पहिला म्हणजे नो का लिकाई, हा भारतातला सर्वांत उंच धबधबा, #चेरपुंजीजवळ आहे. ‘नो का लिकाई’ नावामागे एक करुण कथा आहे. नो का लिकाई म्हणजे ‘लिकाईची उडी’. लिकाई नावाच्या महिलेने पुनर्विवाह केला. तिच्या नवऱ्याला वाटायचं की ही त्याच्यापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते. त्या रागात त्याने त्या मुलीचा खून केला. इकडे मुलगी सापडत नाही म्हणून ती महिला वेडीपिशी झाली, एक फळांच्या टोपलीत तिला तिची बोटं सापडली. त्या दुखा:त तिने या कड्यावरून उडी घेतली. तिचं नाव या प्रपाताला दिलंय.
आम्ही गेलो तेव्हा पाऊस पडत होता आणि संपूर्ण दरी ढगांनी भरून गेली होती. पावसाळ्याच्या तोंडावर मेघालय पाहायला गेल्याची ही शिक्षा. ड्रायव्हर म्हणाला, जरा थांबू, पाऊस थांबला तर ढग जातील, मग दिसेल तुम्हाला धबधबा. मग काय, थांबलो. धबधबा पाहण्यासाठी इथली व्यवस्था खरंच चांगली आहे. सतत पावसामुळे निसरडं होण्याची शक्यता लक्षात घेऊन नीट बांधीव पदपथ आणि कठडे केलेले आहेत. अलीकडे आपण, पलीकडे धबधबा आणि मध्ये महाकाय दरी असं स्वरूप. तिकडे गेल्यावर तुम्हाला कदाचित वरंध घाटातल्या धबधब्याची आठवण येऊ शकते.
थोडा वेळ तिकडे रेंगळलो, फोटो काढले, ढगांची आणि पावसाची गंमत पाहण्यात अर्धा तास असा उडून गेला. पाऊस कमी झाला आणि वारा सुरू झाला. मी कठड्यापाशीच होते. त्या वाऱ्याने दरीभर पसरलेले ढग उडवून लावले आणि तो प्रपात समोर प्रकटला. अशा धबधब्याला प्रपात हाच शब्द योग्य. धबधबा तसा लडिवाळ वाटतो. इकडून तिकडून टणाटण उड्या मारत जाणाऱ्या मुलासारखा! त्या विशाल गंभीर रूपाला प्रपात हेच नाव योग्य. दूरवर पसरलेल्या खॉंसी पर्वतरांगेच्या पठारावरून पावसाचं पाणी एकत्र येतं इथे प्रपातचं रूप घेतं आणि या कड्यावरून खोल दरीत झेप घेतं. संपूर्ण धबधबा नजरेत साठवताना दमछाक होते. खाली साठलेल्या जलाशयाचं पाणी हिवाळ्यात नीळं तर उन्हाळ्यात हिरवं दिसतं.
आणि या धबधब्याच्या जवळपास एक सुंदर गुहा आहे तिचं नाव आरवा. हे थोडं दूर असल्याने पर्यटक त्या मनाने कमी असतात. मी गेले तेव्हा तर आम्ही दोघीच होतो. छान बांधून काढलेली वाट आपल्याला गुहेपर्यंत नेते. अर्थात चालावं लागतंच, गुहेपर्यंत आणि गुहेच्या आतही. जवळपास ३०० मीटरपर्यंत ही गुहा पसरलेली आहे. सतत पाणी ठिबकून तयार झालेले लवणस्तंभांचे अद्भुत आकार हे या गुहेचं खरं वैशिष्ट्य. ही गुहा आपल्याला अलिबाबाच्या गुहेत नेते. आत एक ऑक्टोपससारखा लवणस्तंभ तयार झाला आहे. एका ठिकाणी चक्क समुद्री जीवांचे जीवाश्म देखील सापडलेत. गाईड तुम्हाला ते दाखवतो. गुहेत पाहण्याच्या महत्त्वाच्या गोष्टींची यादी आणि त्यांचं गुहेतील ठिकाण गुहेच्या बाहेर बोर्डावर दाखवलेल आहे. गुहेत जाताना बॅटरी असणे अत्यावश्यक. इथे सतत पाणी असतं, त्यामुळे पावसाळी पादत्राणे आवश्यक. अनेक ठिकाणी कपारी आहेत, खाच खळगे आहेत. गुहा काही ठिकाणी एकदम निमुळती, अरूंद होते, काही ठिकाणी अगदी कमरेपर्यंत वाकून चालवं लागतं. गुहेत अत्यंत काळजीपूर्वक वावरा, गाईडसोबत, एकत्र राहा. गुहेत शिरतानाही, गर्दीचा अंदाज घेऊन मगच आत जा. तशी इथे गर्दी कमी असते पण तरीही, गुहेच स्वरूप लक्षात घेता अति गर्दी असेल तर आतला ऑक्सीजन कमी होऊ शकतो आणि हे तुम्हाला त्रासदायक होऊ शकतो.
आणखी एक आणि सुप्रसिद्ध गुहा #मौसमाई. ही देखील चेरपुंजीजवळच आहे. चेरपुंजीचं स्थानिक भाषेतल नाव #सोहरा. ही गुहा सर्व टूरमधे दाखवली जाते. अर्थात ती प्रशस्त आहे आणि आतील लवणस्तंभांचे आकार विस्मयकारी आहेत. पण सहजप्राप्य असल्याने तिथे प्रचंड गर्दी असते. भर हंगामात गेलात तर चक्क रेटारेटी देखील! ते एक तीर्थक्षेत्र देखील आहे. नैसर्गिक आकर्षणाचं तीर्थक्षेत्र झाल्यावर जे घडतं ते तिथे घडतंय आणि यावर कोणाचेही नियंत्रण नाही. आत शिरायची वाट चिंचोळी आहे, संपूर्ण गुहेत ठिकठिकाणी पाऊलभर पाणी साचलेलं असतं. उजेडसाठी दिवे लावलेले आहेत. एक दोन ठिकाणे गुहेत सूर्यप्रकाश येतो. पण एकूणच गर्दी, बेशिस्त आणि फोटो काढणारे हौशे गवशे यामुळे रसभंग होतो. बाकी काही पाहायला वेळ नसेल तर ही गुहा तुम्हाला मेघालयातल्या गुहांची छोटीशी झलक नक्कीच दाखवेल. तुमचा भ्रमनिरास नक्की होणार नाही. फक्त वर सांगितल तसं, अपरिहार्य गोष्टी कानामागे टाकाव्या लागतील. जर स्वत:मध्ये रमण्याची कला साधली, तर समस्त कोलाहलास फाट्यावर मारून तुम्ही या गुहेचा आनंद लुटू शकता.
तुम्हाला गर्दीची, कोंदटपणाची भीती वाटत असेल, बंदिस्त जागा अंगावर येत असतील तर ही गुहा तर टाळाच. कारण तिच्यात आत गेल्यावर मागे फिरता येतं नाही. दुसऱ्या टोकानेच बाहेर पडावे लागते. आणि तो मार्ग कमीत कमी १०-१५ मिनिटांचा आहे. त्यामुळे गुंफा पर्यटन करताना या बाबी नक्की लक्षात ठेवा. तर चेरपुंजी किंवा सोहरा आणि त्याच्या आसपासची ठिकाणं साधारण दिवसभरात बघून होतात. चेरपुंजीचा धबधबा, मौसमाई गुहा हे अति महत्त्वाचं. याच मार्गात नोह संगी ठियाअंग अर्थात सप्त भगिनी धबधबा देखील आहे. अवाढव्य दरीत सात बाजूंनी सात धबधबे एकत्र येतात. अतिशय रमणीय दृश्य. त्यातल्याच एक धबधब्याच्या काठावर इको पार्क तयार केलेलं आहे. इथे दिवसाच्या शेवटी छान श्रमपरिहार करून शिलॉँगकडे प्रस्थान करू शकता.
(क्रमश:)

मेघालय - भाग २

तेजाली चं. शहासने

मेघालयची राजधानी शिलॉंग. शिलॉंग शहर इतर कुठल्याही राजधानीच्या शहरांसारखंच. गजबजलेलं. मोठी गर्दीची बाजारपेठ आहे, हॉटेले आहेत, दुकानं आहेत. मोठमोठ्या बेकरीज आहेत. सिक्कीमच्या तुलनेत इथे दारू पिण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. बरीचशी लोकसंख्या कर्मठ ख्रिश्चन असल्याचा परिणाम, असं आमच्या ड्रायव्हरने सांगितलं. शहराच्या उंच सखलपणामुळे इथे रिक्षा नाहीत तर टॅक्सीज आहेत, त्याही मारुती ८००. व्यवसायासाठी खूप स्वस्त पडतात. अर्थात ही ३ वर्षांपूर्वीची गोष्ट.
तिथली उच्च न्यायालयाची इमारत दृष्ट लागण्याजोगी आहे. माझी बहीण वकील असल्याने ती बघणं हे आमच्या प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत होतं. शिलॉँगमधेच काही संग्रहालयंही आहेत. कॅप्टन संगमा संग्रहालयात मेघालयाची वीरगाथा मांडलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इतर भारतप्रमाणे या भागानेही खूप सोसलं. काटक, लढाऊ जमातीची आख्खी पिढी ब्रिटिशांच्या गोळ्यांना बळी पडली. अर्थात बंदुकीच्या गोळ्यांपुढे भाले आणि तलवारींचा काय निभाव लागणार? तिरोट सिंग या त्यांच्या राजाचं तैलचित्र आणि स्मारक तिथे आहे. १८२९ ते १८३३ या कालावधीत हा राजा आपल्या प्रजेला स्वतंत्र ठेवण्यासाठी झुंजला. “यापेक्षा स्वतंत्र राजा म्हणून मरेन” असं म्हणत मृत्यूला सामोरा गेला. इथे एक फुलापाखरांचं संग्रहालय देखील आहे. डॉन बॉस्कोचं सांस्कृतिक संग्रहालय तर अप्रतिम आहे, सप्तभगिनी प्रदेशातील संपूर्ण लोकजीवन, संस्कृती, त्यांचा इतिहास अतिशय बारकाव्यांसह इथल्या वेगवेगळ्या मजल्यांवर मांडलेला आहे. याच्या गच्चीवरून संपूर्ण शिलॉंगचं नयनरम्य दृश्य दिसतं.
इथल्या माणसाचा मूळ धंदा शेतीच. पण वाढत्या पर्यटनामुळे इथे अनेक उद्योग वाढीस लागलेत. त्यामुळे व्यावसायिक गरजांसाठी इथे आसाम, पश्चिम बंगाल मधून लोक रोजगारनिमित्त येतात. इथल्या भाषेला स्वत:ची लिपी नाही, लिखणासाठी रोमन लिपी वापरली जाते. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाषेची अडचण येऊ शकते. स्थानिक विरुद्ध स्थलांतरित संघर्षाची झळ या टुमदार शहराला बसलीये. अवैधरीत्या भारतात आलेले बांग्लादेशी इथे सहज मिसळून जातात. त्यामुळे रोजगराचा इथे तुटवडा निर्माण झाला आहे. इथे कोळसाही मुबलक मिळतो. इतका की, इथल्या खाण मालकांची मुलं सरसकट परदेशात नामवंत विद्यापीठात शिक्षण घ्यायला जातात, असं आमच्या टॅक्सीवाल्याने सांगितलं. हा कोळसा, ही रेती मेघालयाचं सौन्दर्य घुशीसारख पोखरतीये. त्यातून येणारी सुबत्ता सामान्य जनतेपर्यंत झिरपत नाहीये.


मेघालय पहायचं असेल तर भरपूर प्रवासाची तयारी हवी. अगदी राज्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत. सप्तभगिनी प्रदेशातल्या कुठल्याही राज्यात भटकायचं असेल तर ते आलंच. कारण एक तर हे भाग डोंगराळ आहेत, त्यामुळे बराचसा प्रवास रस्त्यानेच करावा लागतो. गुवाहाटी, बाघ डोगरा हे तिथले महत्त्वाचे विमानतळ. इतर राज्यांत विमानतळ असले तरी उड्डाणाची वारंवारता त्या मानाने कमी आहे आणि थेट फ्लाइट्स जास्त नाहीत. मेघालय हिंडताना दिवसचा दिवस प्रवास करायची तयारी ठेवा.
मी गेले तेव्हा दिल्लीहून गेलेले. दिल्ली ते गुवाहाटी विमान आणि तिथून शिलॉंग गाडीने. भल्या पहाटेची फ्लाइट मला खरं तर आवडत नाही. मी अक्षरक्ष: झोपळलेले. पण या प्रवासात एक गोष्ट मी विसरलेलेच. दिल्लीहून गुवाहाटीला उडताना मधे नगाधिराज हिमालय लागतो. एक डुलकी झाल्यावर खाली नजर टाकली, दूरवर सूर्यकिरणांत हिमालय चमचमत होता. त्या दृश्याने माझी सकाळ सोनेरी केली.
काही वर्षांपूर्वी दार्जिलिंगला गेलेले तेव्हा भल्या पहाटे उठून कांचनगंगा बघायला गेलेले. पण नेमकी तेव्हा ती लाडात येऊन ढगांच्या आड लपून बसली, मात्र तो गुलाबी सोनेरी हिमालय मनात घर करून गेला. हिमालयाचं हे चमचमतं सोनेरी रूप अनपेक्षितपणे माझ्या समोर साकार झालं, तेही अत्यंत अमर्याद, लांबच लांब. नजर जाइस्तोवर आडवा हिमालय पसरलेला. जणू सांगत होता, तिकडे पाहिलंस ते तर माझ टीचभर रूप...चल, तुला विश्वरूप दर्शन घडवतो. अशा वेळी खरंतर सूर्यकिरणांचा अभिषेक वगैरे कल्पनाही थीट्या पडतात. कुणीतरी तप्त सोन्याचा रस हिमालयाच्या शिखरांवर ओतावा आणि त्या हिमावरून ओघळत तो हळूहळू थिजून त्याचा सुवर्णलेप बसावा अशा त्या हिमालयाच्या रांगा दिसत होत्या. नाखुषीनेच घेतलेली सकाळची फ्लाइट, न मागता मिळालेली डाव्या बाजूची सीट आणि मोक्याच्या क्षणी डुलकीतून आलेली जाग... एकसमयवच्छेदेकरून. अशा घटनांना मी खरंच दैवी समजते.

मेघालय - भाग १

तेजाली चं. शहासने-




पाऊस आणि ढगांचं नातं अतूट. पावसाची वर्दी मिळणार ती ढगांकडूनच आणि त्यांच्या रंगा, ढंगावरून पावसाचा मूडही कळणार. एवढं महत्त्व ढगांचं. या पावसाळ्यात गोष्ट सांगणार आहे मेघस्य आलय: इति मेघालय| असं ज्याच वर्णन केल जात त्या मेघालयाची...
हिमालय म्हटलं की आपल्याला बर्फ आठवतो. तसंच मेघालय म्हटलं की मला ढग आठवतात, नागा, गारो, खॉंसी आणि जैंतीया या डोंगररांगांवरून हुंदडणारे. हिमालय जर तपस्वी वाटत असेल तर मेघालयातल्या या डोंगररांगा, हिरवकंच शेला लपेटलेला लेकुरवाळा बाप वाटतात मला. आपल्या अंगाखाद्यावरच्या समृद्ध जैवविविधतेतून इथल्या मानवावर मनसोक्त उधळपट्टी करणारा बाप! म्हटलं तर, इथे वर्षभर पाऊस पडतो. आपल्या सह्याद्री काही कमी नाही, पण पावसाळ्यातला, हिरवागार सह्याद्री उन्हाळ्यात सुकून जातो, मलूल होतो, डोंगर उघडे बोडके पडतात.
मेघालयाला हा पिवळा रंग ठाऊकच नाही. हिरव्या रंगाच्या १०० छटा पाहायला तुम्ही मेघालयात जा. सतत कॉम्प्युटरच्या पडद्यावर भिरभिरुन थकलेले तुमचे डोळे इथे निवतील. इथला पाऊस अंगाअंगात भरून घ्या, गात्र तृप्त होतील.
अगदी त्याचा कहर अनुभवायचा असेल तर भर जुलैमध्ये जा. समोरचे ढग तुम्हाला गाडीतून काय, चालतही दोन फुटांपुढे हलू देणार नाहीत. खरं तर, हे ढग नसतातच. ते असतात ‘जलद’. ढगाचा कण न कण पाण्याने संपृक्त होऊन त्या भाराने झुकालेले. ते जीवनाचं दान भरभरून देण्यासाठी आसुसलेले. पावसाळ्यात मेघालयात निसर्गाच्या रोमारोमात फक्त पाऊस भरलेला दिसेल. आणि ते जीवनाचं दान प्राशून तुम्ही समृद्ध व्हाल.
आता तिथे जाण्याचा ऋतू, एप्रिल ते जून सर्वांत उत्तम, पण माझ्या मते हिवाळा; कारण तोपर्यंत पाऊस तसा कमी होतो. तिथले धबधबे मस्त धबधबत असतील, तिथल्या लवण स्तंभांच्या प्रचंड गुहा पाहताना अचानक ढग किंवा पाऊस येऊन तुम्हाला घाबरवणार नाहीत, तिथले जीवंत मूलसेतू पाहायला जाताना चिखलाचा त्रास होणार नाही.

तिथलं एक मोठं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे #उमनगोट नदी. आरपार, तिच्या तळाचा ठाव घेणारे फोटो तुम्ही पाहिले असतील. ते खरोखर अनुभवायचं असेल तर खरंच हिवाळ्यात जा. कारण पाऊस कमी झाल्याने डोंगरातून नदीत वाहून येणारी वाळू कमी होते, नदी शांत होते, तळ निवळतो. पण इतर वेळी सुद्धा कधीही गेलात, तरी ती तुम्हाला आनंदीतच करते. आजोळी आलेल्या लेकरांसारखी! छोट्याशा बोटीतून नावाडी तुम्हाला तिथल्या एका बेटावर नेतो. तिथे पाण्यात खेळा, दगडांचे किल्ले करा, तासभर शांत बसा, आजूबाजूचे डोंगर बघा, हवं ते करा. तुम्ही गप्पीष्ट असाल तर तो नावडी तुम्हाला तिथल्या गोष्टी सांगेल. कोळशाच्या वाहतुकीबद्दल सांगेल, वाळूच्या अवैध तस्करी बद्दल, माणसांच्या अवैध येण्या जाण्याबद्दल सांगेल. अरे, हे मधेच काय अवैध आलं? सांगते.. तर, जिथे या उमनगोट नदीला तुम्ही भेटता ते ठिकाण आहे डाउकि. भारत आणि बांगलादेशाच्या सीमेवरच शेवटचं गाव. सील्हेट जिल्हा आठवतोय? फाळणीच्या वेळी हा जिल्हा बांग्लादेशात गेला. शतकानुशतकांचा शेजार एका अदृश्य रेषेने दुभागला. इथून हा सील्हेट जिल्हा आणि बांग्लादेशाची हद्द सुरू होते. मेघालयाच फिरताना, वळणावळणांतून इतिहास हा असा अचानक समोर येतो.
या अदृश्य रेषेला दृश्य स्वरूप देण्याचं, कुंपण घालण्याचं काम मी गेले तेव्हा सुरू झालं होतं. याला अनेकदा विरोधही झालाय. हे काम किचकट देखील आहे. इथे भारत-बांग्लादेश सीमा डोंगरा-वनांतून, नदीतून जाते. यामुळे, शतकानुशतके इथे राहणारे स्थानिक, आता आडवाटा काढत या देशातून त्या देशात ये-जा करतात. मित्रांना, नातेवाईकांना भेटतात, लग्नं होतात, सगळं काही यथासांग चालू असतं. उमनगोट नदीचं डाउकिमधलं पात्र प्रचंड मोठं आहे. डोंगरातून उत्तम प्रतीचा गाळ वाहून येतं असल्याने नदीतील वाळूच्या विक्रीचे कामही जोमत चालते. पण त्यालाही तस्करीची काळी किनार आहेच. ही भूलभूलय्या असणारी हद्द आणि तिचा सोयीस्करपणाच आज मेघालयाच्या मुळावर उठलाय...
(क्रमश:)