रविवार, २८ एप्रिल, २०१९

बनारस- काशी


लहानपणी, आई वडिलांना काशीला घेउन जाणारा श्रावण बाळ मनात ठसलेला असतो, मुघलांनी काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडल्यावर व्यथित झालेल्या जिजाऊ पाहिलेल्या असतात, काशीच्या गागाभट्टांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला हे वाचलेलं असतं. पंडित बिस्मिल्ला खान हेही काशीचेच; बनारस घराण्याच्या ठुमरीने कधीतरी मनावर गारुड घातलेल असतं, साड्यांच्या प्रदर्शनात अस्सल बनारसी शालू अणि नंतर त्याच्या किंमतीने, डोळे विस्फारलेले असतात. अगदी आत्ता आत्ताचं बघितलं तर बनारसच्या घाटांचे कृष्ण-धवल किंवा मग रंगीबेरंगी फोटो इन्स्टाग्रामवर पाहून आपण .. वाव, मस्त आहे, भारी आहे.. असं करत असतो. मोदींचा मतदारसंघ, तिथली अस्वच्छता, काशीचे पंडे असं या न त्या मार्गाने काशी आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे डोकावून जाते.
पण काशीमध्ये गेल्यावर खरं मनावर ठसतं ते जीवनातलं अंतिम सत्य ... मृत्यू. एक गुजराथी म्हण आहे, सुरतनो जिमण काशीनो मरण! इतकं महत्त्व इथल्या मरणाचं. इथे अंत्यविधीसाठी दोन घाट आहेत. हरिश्चंद्र घाट आणि मणिकर्णिका घाट. हरिश्चंद्र घाटावर म्हणे खुद्द राजा हरिश्चंद्र मांग म्हणून राबलेला. 
     माझी पहिली भेट झाली ती हरिश्चंद्र घाटाशी. संध्याकाळी बोटिंगसाठी रस्ता विचारत गल्ली बोळांतून फिरताना एका बोळकांडीतून बाहेर आले आणि समोर पाहते तो समोर गंगामाईचं अथांग पात्र...
माझ्यात आणि गंगामाईमध्ये साधारण पन्नासेक पायऱ्यांचं अंतर. उजव्या हाताला अगदी नजरेच्याच टप्प्यात धडाधडा पेटलेल्या २ – ३ चिता, आणि समोर लिहिलेलं नाव ‘राजा हरिश्चंद्र घाट’. 
आणि मणिकर्णिका घाट... संध्याकाळी नावेतून गंगा आरती पाहताना एक नजर उजवीकडे टाका, रेखीव घाटांच्या गर्दीत थोडंस लांब एका ठिकाणी लालबुंद प्रकाश दिसेल...जरा खाली नजर घ्या.. तो प्रकाश असेल परमात्म्याशी तादात्म्य पावलेल्या आत्म्यांच्या पार्थिवांच्या चितेचा.
हे दृश्य तुम्हाला अंतर्मुख करतं. एकच ठिकाणी तुम्ही अग्नीची, मानवाची, भावनांची दोन रूपं पाहत असता... आणि गंगा हे रोज पाहते. 
मी मनकर्णिका घाटावर पोचले तेव्हा नुक्ती सकाळ होत होती. गंगेला श्वासात भरून घेत एक एक घाट नजरेत साठवत पुढे चाललेले. थोड्याच अंतरावर एके ठिकाणी लालिमा दिसली आणि त्या घाटाची खूण पटली.. मनकर्णिका घाट!
मन थोडंस दचकलं. पोचता पोचताच मनाची तयारी होईल अशी सगळी सामग्री तिथे होती. एका ठिकाणी ओंडके एकावर एक पद्धतशीर रचलेले होते, बाजूलाच रामाचं देऊळ होतं. चार पावलांवर एक मडक्यांचं दुकानं. एका कुत्रीची ४-५ पिल्ल तिथे विझल्या शेकोटीच्या उबेशी निवांत पहुडली होती, एक पिल्लू नुसतंच लुडबुडत होत, त्यांना काय कल्पना, तिथे काय चालू आहे. 

तिथून समोर दिसणारं दृश्य मात्र नि:शब्द करणार होत. जीवन आणि मृत्यू मधलं अगदी काही पावलांचं अंतर मी अनुभवत होते. समोर १०-१२ चिता धडधडत होत्या. काहींची धग शांत झाली होती, काही जण मुक्तीच्या प्रतीक्षेत शांत पडले होते. एक विचित्र शांतता होती तिथे, कोलाहालातली शांतता. मृत्यू नंतर आत्म्याला जी शांतता वाटते ती कदाचित अशीच असावी, मनाला विचार चाटून गेला. मृत्यु नंतरची शांतता अशीच असते का? इथलं वातावरणही स्मशानापेक्षा वेगळंच. स्मशानात लोकांच्या डोळ्यांत पाणी असतं, आप्त, जिवलग गेल्याचं दु:ख स्पष्ट दिसत असतं. हा घाट तर मृत्यूघाटांचा राजा...पण एवढ्या चिता असूनही रडताना कोणीही दिसलं नाही हे विशेष. लोकांच्या चर्येवर प्रचंड तटस्थपणा दिसतं होता किंवा एखादं कर्तव्य, काम उरकून टाकल्याची भावना... त्या संपूर्ण घाटावरच शतकानुशतके, अहोरात्र जळणाऱ्या चितांच्या राखेचा करडा थर!

तटस्थ अंतिम सत्य हे असं समोर आणते काशी, ते तटस्थतेनं स्विकारायला शिकवते. अनेक जन्माच्या फेऱ्यामधलं ‘मनुष्यजन्म’ फक्त एक ठिकाण, पुढे जाण्यासाठी साधन मृत्यूच, मग तो कुठल्याही जन्मातला. एवढं साधंसुधं उघड सत्य!
- तेजाली शहासने.
१२/०८/२०१८
#latepost #kashi #banaras #varanasi

इंद्रधनुष्य पेलण्याचे आव्हान 🌈🌈

इंद्रधनुष्य पेलण्याचे आव्हान 🌈🌈🌈🌈🌈🌈✌️

खूप लहानपणीची गोष्टं, मी पाचवी सहावीत होते. मी आणि आजोबा दोघेच घरी होतो आजोबा चहा करत होते. रस्त्यावर टाळ्यांचा आवाज ऐकू आला. कुतूहलाने मी खिडकीत गेले, टापटीपीने नेसलेल्या मळकट साड्या आणि गडद मेक अप केलेल्या काही पुरुषी बायका घराखालच्या दुकानदारांकडे पैसे मागत होत्या. त्यांना छक्के म्हणतात हे नंतर आजोबांनी सांगितलं. ठाण्याला राहायला आल्यावर सिग्नलला, रेल्वेत भीक मागणारे तृतीयपंथी बघून भीती वाटायची कि किळस नक्की सांगताच येणार नाही. त्यांचा एकूण अवतार, वागणं बोलणं, त्यांच्याबद्दलच्या दंतकथा... खूप वर्ष त्यांच्याबद्दल मनात भीतीच होती.
आज कलम ३७७ रद्द झालं ✌️✌️त्या निमित्ताने या सर्व घटना चटकन नजरेसमोर आल्या. आजचा दिवस संपूर्ण ‘LGBTQ’ जमातीसाठी खऱ्या अर्थाने ‘gay’ दिवस आहे. (ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी, गे चा एक अर्थ आनंदी असाही आहे). व्हिक्टोरीयन कायद्याच्या चौकटीतून बाहेर पडून, अनेक बाजूंनी चर्वितचर्वण होऊन, धर्मग्रंथ, संविधान, कायद्यांचा कीस पडून आज भा.दं. वि. कलम ३७७ सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलं. भारतातल्या एका मोठ्या वर्गाच्या मुलभूत हक्कांचा लढा सुफळ संपूर्ण झाला. अनेकांनी म्हटलं, आज स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटतंय. 👨‍❤️‍👨👨‍❤️‍👨 👩‍❤️‍👩👩‍❤️‍👩
पण भारतीय समाजासाठी ही एका नव्या युगाची, नव्या जाणीवा नेणीवांच्या प्रदेशातील प्रवासाची सुरूवात आहे. आता या समुदायाला कायद्याने मोकळेपणे भरभरून श्वास घेण्याची संधी दिली आहे. पण मुळात त्यांच्या अस्तित्त्वाचा स्वीकार हेच भारतीय समाजापुढचं फार मोठ आव्हान आहे. गेली अनेक वर्ष कळत नकळत भारतीय मनात पोसले गेलेले भयगंड, समजुती, अंधश्रद्धा यांची जळमटं कायद्याचा एका फटकाऱ्यानिशी काढून टाकता येणार नाहीत. प्रचंड आणि सातत्याने जनजागृती करूनच मनाची मशागत करणं शक्य होईल.
कायद्याने तर या इंद्रधनुष्याची दखल घेतली 🌈पण हे इंद्रधनुष्य समर्थपणे पेलण्याची, त्याचे चमकदार रंग अबाधित ठेवण्याची जबाबदारी आज प्रत्येक भारतीय व्यक्तीवर आहे. आणि हेच आज आपल्यासमोरच आव्हानही आहे.
साठाउत्तराची कहाणी पाचाउत्तरी सफळ संपूर्ण!🌈

तेजाली 
६/०९/२०१८ 

नाती.....




सुंदर.... 
शिंपल्यातल्या मोत्यांसारखही
निर्मळ.... 
झर्‍याच्या खळखळत्या पाण्यासारखी
पवित्र.... 
गंगेच्या पहिल्या प्रवाहासारखी
निरागस.... 
झोपलेल्या अर्भकाच्या हास्यासारखी
गोंडस.... 
पायात खेळणार्‍या मांजराच्या पिल्लासारखी 
अव्यक्त.... 
मुठीत लपविलेल्या सोनचाफ्यासारखी
दुखावलेली.....
काच रूतलेल्या पायासारखी   
अस्वस्थ.... 
भूगर्भातल्या असंख्य प्रस्तरांसारखी
गोंधळलेली..... 
जत्रेतल्या हरवलेल्या मुलासारखी
भरकटलेली..... 
वार्‍याने उडून लावलेल्या पाचोळयासारखी
दुरावलेली.... 
कधीही भेटू न शकणार्‍या दोन डोळ्यांसारखी
तुटलेली.... 
न सांधता येणार्‍या दगडावरल्या भेगेसारखी
संपलेली..... 
विझून शांत झालेल्या चितेसारखी....

: तेजाली 24/05/2014
छायाचित्र सौजन्य : ओमकार वाबळे.