रविवार, २८ जुलै, २०१९

आजी, टॅटू आणि मी



 
माझ्या आजीच्या कपाळावर, हनुवटीवर हातावर गोंदवलेलं होतं, माझ्या आईच्या कपाळावरही गोंदण आहे. लहानपणी हे सगळं खूप गावठी वाटायचं. माझ्या सगळ्या मावश्या, आज्या, माम्या, आत्या, काक्या सगळ्यांचा कॉमन फॅक्टर - कपाळावरचं गोंदवण. आजी लहानपणी सांगायची, गोंदवण किती महत्त्वाचं! मला म्हणायची, “आपण हिंदू.. पण याची खूण काय? स्वर्गाच्या दारावर देव विचारतो बाबा तू कोण, मग त्याला हे हातावरचं गोंदण दाखवायचं... मग त्याला खात्री पटते की आपण हिंदू.” लहानपणी हे सगळं ऐकूनच एकदम भारी वगैरे वाटायचं. तेव्हा तर वाटायचं, हमसे न हो पाएगा. गोंदवताना किती दुखतं! इथे मला साध्या इंजेक्शनची भीती... आपण नरकातच जाणार; आपल्याला देव दारावरूनच परत पाठवणार.  
तेव्हा आमच्या इथे खूप कोळी, आगरी, कातकरी स्त्रिया दिसायच्या. हातभर गोंदवलेल्या... कधी स्वतःचं नाव, कधी नवऱ्याचं, कधी कुलदैवताचं, कधी सात आसरा. हिरवं गोंदण आणि हिरव्या बांगड्या, काय मस्त दिसायचं. आणि कपाळावरची तुळस नाहीतर छोटासा ठिपका. स्थल काल परत्वे नक्षी बदलली तरीही आदिम भावना तीच. कष्टकरी समाजात धर्मापेक्षाही कलासक्ती जास्त होती, त्यामुळे त्यांची गोंदवणं अंगभर दिसायची, तर पांढरपेशा समाजात धर्माचाच पगडा त्यामुळे शास्त्र म्हणून का होईल, एक ठिपका हवाच. आजी सांगायची, गोंदून घे हो... पुढे मी मोठी झाले, आजीही म्हातारी झाली, गोंदवणाची गोष्ट ही मागे पडली. पुलाखालून बरंच पाणी गेलं, आणि एके दिवशी माझ्या अनामिकेवर एक चांदणी उमटली. त्या चिमुकल्या चांदणीचे मी दीड हज्जार रुपये मोजले ऐकल्यावर आजीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता, दीड दमडीच्या गोंदवणाचे काय एवढे कौतुक. अर्थात तिचंही म्हणण बरोबरच ठरलं.
हल्ली टॅटूची जाहिरात कशी करतात, “मरताना फक्त तुमचा टॅटूच तुमच्यासोबत राहतो”.  आजीने तरी वेगळं काय सांगितलं होतं
   आधी जत्रा, मेळे, आठवडी बाजार यापुरत्या मर्यादित असलेल्या गोंदवणानं आता रूप पालटलं आहे. Now it’s an art, they call it body art and now it’s part of an Industry, which commonly includes body piercing and tattoos. आता हे टोचणं कान, नाकाच्या कितीतरी पुढे (मागे, वर, खाली) गेलंय ती बाब अलहिदा. टॅटूचं रुपडंही पालटलं आहे.
  कपाळावरची तुळस अंगणातल्या तुळशीसोबतच हरवली. आता जमाना आहे dady’s angleचा. खरंतर टॅटू व्यवसायाचं बदललेलं रूप खूप सुखकारक आहे. हल्ली त्यांच्याकडे जुन्यापान्या सुयांऐवजी आधुनिक टॅटू गन असते, रंगांसाठी नैसर्गिक रंगकण वापरले जातात, टॅटू आर्टीस्ट कुशल कलाकार असतो. टॅटूव्यावसायिकांची नियमावली आहे, टॅटू करताना तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते, तुम्ही मादक पदार्थांच्या प्रभावाखाली नाही ना याची चाचपणी केली जाते. वापरलेली सुई ग्राहकाला दिली जाते किंवा त्याच्या समोरच नष्ट केली जाते, आणि याचे रग्गड पैसेही घेतले जातात. अर्थात त्यांच्याकडून घडणारी कलाही त्याच तोडीची असते. After all, it’s a piece of art you are buying. पण... इथे एक मोठ्ठा पण आहे.          
    जसं मोठमोठ्या कंपन्या सगळे नीतीनियम पळून आपला व्यवसाय करत असल्या तरी तेच नीतीनियम गुंडाळून ठेऊन त्यांची कमअस्सल प्रारूपे बनवून धंदा करणारेही असतात; तेच दुर्दैव या व्यवसायाच्या नशिबीही आले आहे. अर्थात मागणी वाढली की पुरवठा वाढवायचा, तर दर्जात तडजोड होण्याची शक्यता वाढतेच. त्यात पुन्हा affordability हा मुद्दाही आहेच. पण फक्त हौस करायची म्हणून कुठल्यातरी कोपऱ्यातल्या माणसाकडून अत्यंत हीन दर्जाचा, वेड्यावाकड्या आकाराचा टॅटू करून घेणाऱ्यांची मला खरंच कीव येते. गणपती, मोरपीस, पऱ्या, त्रिशूळ, फुलपाखरू, शंकर ओम, माणसाची कवटी असे खरं तर अप्रतिम आकार जेव्हा अशी केविलवाणी रूपं घेऊन समोर येतात, त्या व्यक्तीचीच दया येते. कसं काढणार संपूर्ण आयुष्य अशा आकृतीसोबत. तुम्हाला याचा घसरलेला दर्जा पहायचा असेल तर कधीतरी दिल्लीच्या पालिका बाजारात जा किंवा गोव्याला. आणखीही बरीच ठिकाणं मिळतील पण मी एवढ्याच ठिकाणी गेलीये.
फुटपाथवर उदबत्ती विकतात तसे इथे टॅटू विकले जातात. भाजीवाले गिऱ्हाईक बोलावतात तसे इथे टॅटू  येऊन विचारतात. दर्जाबद्दल न बोललेलंच बरं. तसा दिल्लीत टॅटूंचा सुकाळ आहे. मेट्रोतून जाताना किंवा जनपथ, सीपी या भागात फिरताना थोडी नजर इकडे तिकडे टाकलीत तरी या ill executed tattoos ची झलक तुम्हाला सहज दिसेल. मला वाटतं 7-8 वर्षांपूर्वी इथे मुलींमध्ये टॅटूची जबरदस्त क्रेझ असावी, कारण साधारण 25-35 वयोगटातल्या मुलींच्या/स्त्रियांच्या मनगटावर, मानेवर पऱ्या, daddy’s angel, गुलाब, चांदणी, friend’s forever हे असले टॅटू सर्रास दिसतात. कवट्या, हाड, शंकर, अगम्य नक्षी, गाड्यांचे लोगो हे मुलांचे फेवरेट. त्यांच्या जागाही वेगळ्या. दंडावर, बाहुवर, छातीवर तर कधी मानेवर.
  हे झालं चित्रकलेबद्दल. आता तांत्रिक बाबी. टॅटू करताना रंगकण त्वचेच्या तिसऱ्या किंवा चौथ्या थरापर्यंतच जाणं अपेक्षित असतं; म्हणजे साधारण १ मिलीमीटर खोल, बस. त्याखाली सुई गेली की त्वचेतून रक्त येते, ती फाटते. टॅटू कलाकार प्रशिक्षण घेताना आधी चित्रकलेचा सराव, मग कागदावर खालचा कागद कापला न जाता कोरीव काम, मग कृत्रिम त्वचेवर आणि मग आधी स्वत:च्या अंगावर अशा क्रमाने सराव करतात. यामुळे त्यांचा हात हलका होतो आणि सुई योग्य तेवढीच खोल जाते. पण टॅटू करणारा कलाकार योग्य रितीने प्रशिक्षित नसेल तर त्वचा फाटू शकते आणि यामुळे होणारं नुकसान भरून न येणारं असतं. यातून संसर्गही होऊ शकतो. कृत्रिम रंग वापरल्यास त्वचा खराब होऊ शकते, असे टॅटू लवकर फिकट पडतात... योग्य स्वच्छता आणि खबरदारी घेतली नाही तर रक्तातून संक्रमित होणारे रोगही होऊ शकतात. एकूण काय तर टॅटू हा अतिशय नाजूक विषय आहे. त्याची संबंध थेट आपल्या 'स्व'शी जोडलेला आहे. त्यामुळे टॅटू करायचाच असेल तर अगदी दोनशे टक्के काळजी घ्यायला हवी.
   कलाकाराची गुणवत्ता सर्वात महत्त्वाची. नक्षी निवडतानाही चलनी गोष्टींपेक्षा शाश्वत गोष्टींना महत्त्व द्या... coz class is forever! कुठल्या नटाने केला, मित्राला आवडला, मैत्रिणीने आग्रह केला, गर्ल फ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी केला अशी कारणं निव्वळ भंपक आहेत. तुमचा टॅटू तुम्हाला स्वत:ला आवडायला हवी. कारण तो तुम्हाला अंगावर वागवायचा आहे. कुठलीही नक्षी निवडताना, तिला अर्थ आहे हे ध्यानात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्यातून तुमचं व्यक्तिमत्त्व, मानसिकता, श्रद्धा, बांधिलकी दिसून येते. विविध संस्कृतींमध्ये विविध चिन्हांचे विविध अर्थ असू शकतात. त्यामुळे तुम्ही निवडलेला आकृतीबंध तुमच्या विचारसरणीशी जुळतो का, त्याचे काही चुकीचे अर्थ तर नाहित ना याची खातरजमा करून घ्या. एखादा शब्द किंवा वाक्य गोंदवणार असाल तर त्याचं व्याकरण नीट तपासून घ्या. नाहीतर संपदाचं सानपाडा व्हायला वेळ लागणार नाही.
  एक महत्त्वाची टीप... भावनेच्या भरात टॅटू करू नका. भावनेच्या भरात खरं तर कुठलेच निर्णय घ्यायचे नसतात, त्यामुळे टॅटूही अपवाद नाही. नकोसा टॅटू आयुष्यभर अंगावर वागवण्याइतकं त्रासदायक काहीच नसेल. अर्थात आता टॅटू लेसरने काढून टाकता येतात. पण ती प्रक्रिया टॅटू काढण्यापेक्षाही खर्चिक किचकट आणि वेदनादायी आहे. त्यातही टॅटूमध्ये पिवळा किंवा हिरवा रंग असेल तर तो सहजासहजी निघत नाही. आणि रंग निघाला तरी व्रण राहतोच.  काही नोकऱ्यांसाठी अंगावर टॅटू नसणं किंवा दृश्य भागावर टॅटू नसणं ही महत्त्वाची अट असते. त्यामुळे तेही लक्षात घेणं महत्त्वाचं.
   आता मी टॅटू करूनही अनेक वर्षं झाली. एका वाढदिवशी केलेला मी. त्याआधी किती खल झाला तो माझा मलाच माहित. पण कदाचित त्यामुळेच माझ्याकडे आहेत त्या फक्त टॅटूबद्दलच्या सुंदर आठवणी. माझी एक भाची मला भेटली की नेहमी म्हणते, मावशी मला पण तुझ्यासारखा स्टार हवा. मग एखाद्या पेनने तिच्या अनामिकेवर चांदणी काढून दिली की स्वारी खुश. आजीनंतर टॅटूबद्दलची ही माझी सर्वात प्रिय आठवण आहे. माझ्याकडचं सगळं सांगून झालंय. याचा खरंच कोणाला उपयोग होईल तेव्हाच या लिखाणाला अर्थ! काळजी घ्या !
तेजाली शहासने
28/07/2019



रविवार, १४ जुलै, २०१९

एकदा तरी पथक अनुभवावं

ढोल,ताशा, ध्वज, झांज ..टोल … पथक। 
सगळं एक निराळंच समीकरण असतं .
प्रत्येकची जागा आणि किंमत आपापल्या परीने अमूल्यच.
आणि त्या सगळ्या मेळातून  मिळणारा आनन्द…
हा तर स्वर्ग सुखाचा ठेवाच
पथकतली प्रत्येक गोष्ट काही ना काही शिकवत राहते आपल्याला..
मग ती वाद्य असो व व्यक्ती !
सगळीकडून थापडा खाताना सुद्धा सतत आनंदच द्यावा हे ढोल आणि ताशा शिकवतं

आणि कितीही हेलकावे मिळू दे. . . स्वतः चा आब कसा राखायचा हे ध्वज शिकवतं …
आकाशात उंचच उंच उसळी घेऊन, गवसणी घालायची स्वप्न तो भगवा सतत डोळ्यापुढे तरळत ठेवतो.
सगळ्यांचे सूर ताल सांभाळून घेत एक कुटुंबच बनतं पथक ।
लहनग्या चिमुरड्या पासून ते अगदी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच सामावून घेत एक सहजीवन शिकवतं पथक... 
सर्वांसोबत मिळून सराव , वाद्य दुरुस्ती,पहिल्या मिरवणुकीची आतुरता ,लक्षी रस्त्यावरचा विसर्जनाच्या दिवशीचा जल्लोष, भर पावसातल्या मिरवणुका आणि ऊर फुटेस्तोवर, दणकून भान हरपून  केलेलं  वादन … 
त्या क्षणाचं वर्णन... केवळ  शब्दातीत… 
असा म्हणतात ,'एक तरी ऒवि अनुभववि'… तसंच प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी

'पथक' अनुभवावं !
-तेजाली