मंगळवार, २८ मे, २०१९

ब्रायटनच्या किनाऱ्यावर

ब्रायटन...अजूनही नाव वाचलं की मनात हलकीशी कळ उमटते. आता अर्थात संदर्भ बदललेत. पण त्यातली आर्तता अजूनही तीच आहे. सहावी सातवीत असताना वि.दा.सावरकरांची ‘सागरास’ ही कविता होती शिकायला. ती पाहिल्यावर, एवढी मोठी कविता पाठ कशी होणार या तद्दन अभ्यासू प्रश्नाने मी हैराण झाले होते. नंतर मग कधीतरी ते गाणं ऐकलं... सागरा प्राण तळमळला... आणि असंच कधीतरी ती कविता श्वास बनून गेली. मूळ मुद्दा हा, त्या कवितेच्या माहितीमध्ये, ‘‘ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर बसून सावरकरांनी ‘सागरास’ ही कविता लिहिली.” हे वाक्य होतं. ब्रायटनची ओढ तेव्हापासूनची! पण तेव्हा कधी वाटलं नव्हत की खरंच ब्रायटनला मी जाईन.
 
ब्रायटनचा समुद्रकिनारा या अप्रतिम काव्यरत्नाची प्रसवभूमी. लंडनमधील धकाधकीला कंटाळून काही दिवस शांतपणे व्यतीत करवेत या उद्देशाने सावरकर ब्रायटन या छोट्याश्या खेड्यात आले. त्यांना आलेलं एकाकीपण, घरच्यांची चिंता, मायदेशाची आठवण हे सगळं या कवितेत अगदी ओतप्रोत भरलंय.
    कसा असेल तो समुद्रकिनारा, कसा असेल तो सागर? तिथे काही आठवणी असतील का त्यांच्या? असंख्य प्रश्न मनात घेऊन ब्रायटनला गेले. खरंतर लंडनला जायचं ठरलं तेव्हा काहीच डोक्यात नव्हतं ... आणि तयारी करता करता एके दिवशी अचानक आठवलं ... अरे मी ब्रायटन कसं विसरले? लंडनला जातीये तर ब्रायटनला जायलाच हवं. आणि एकदाचा ४ मार्च २०१९ रोजी तो सुदिन उगवला आणि अस्मादिक ब्रायटनला येऊन पोचलो.
    यूकेमध्ये प्रवास त्या मानाने महाग आहे हे जाता जाता सांगायला हरकत नाही. लंडन ब्रायटन अंतर साधारण ८७ किमी आहे पण तेवढ्या प्रवासाचे वट्ट २० पौंड भरले... येऊन जाऊन ४० आणि खाण्यापिण्याचे वेगळे. एकूण काय, बांबू बसला ... पण हौसेला मोल नसतं! पण प्रवास मात्र सुंदर होता. शहरातून गावाकडे जातानाचा प्रवास हा नेहमीच सुखावह असतो. मी गेले तेव्हा हिवाळा संपत आलेला. त्यामुळे लंडनमध्ये झाडांचे सापळे दिसत होते. कुठे कुठे झाडांना फुटवे यायला सुरवात झाली होती. बस शहरातून बाहेर पडली आणि लांबलचक कुरणं, पांढऱ्या, गुलाबी फुलांनी लगडलेली झाडं दिसायला सुरवात झाली. मधेच कधीतरी डोळा लागला, तो थेट ब्रायटनला पोचल्यावरच उघडला. दुपारी १२ च्या आसपास पोचले असेन. ऊन होतं पण हवेत गारठा होता. एका प्रशस्त रस्त्यावरून  भसकन एका चिंचोळ्या गल्लीत आमची बस शिरली. ड्रायव्हर चुकला की काय? मनात विचार आला आणि अगदी दोनच मिनिटात त्या गल्लीच्या टोकाशी असलेल्या एका छोट्याश्या बस स्टॅंडवर आमची बस थांबली.
(या दोन पिवळ्या इमारतींच्या मध्ये एक छोटी गल्ली आहे, तिथे बस स्टँड आहे. हा फोटो पिअरच्या गेटवरून काढलाय.)
समुद्रकिनारा तिथून जवळच होता. जवळ म्हणजे डेक्कनच्या बस स्टॉपपासून नदी जेवढी जवळ आहे तेवढाच आणि बसस्टॉपचा आकार, आपल्या इथल्या एखाद्या फलाटाएवढाच (म्हणजे कोथरूडचा PMT स्टॅंडपण मोठा वाटेल.)  लगबगीनं रस्त्यावर आले. डाव्या हाताला थोड्या अंतरावर ब्रायटन पियर दिसत होतं. कधी त्या किनाऱ्यावर पोचते असं झालेलं.
   आता इथे थोडं तिथल्या रस्त्याबद्दलही लिहायला हवं. रचना तशी नेहमीसारखीच! रस्ता, त्याला लागून सायकलचा ट्रॅक आणि त्याला लागून फुटपाथ. पण वेगळेपणा हा की फुटपाथ आणि सायकलचा रस्ताही अगदी ऐसपैस, प्रशस्त होते. आपल्या गणिताप्रमाणे चांगला तीनपदरी रस्ता आरामात बसला असता हो तेवढ्यात!

 हा सायकल मार्ग यूकेतील National Cycle Network चा भाग आहे.
तर... फुटपाथाला लागून रुंद कठडे होते, दुर्बिणी ठेवल्या होत्या. छान ऊन होतं. मस्त माहोल झालेला. किनाऱ्यावर पोचायला मन अधीर झालेलं. रस्ता पार करू फुटपाथवरून चालत चालत एकदाचे तिकडे पोचलो. इथे समुद्र किनाऱ्यावर एका मोठ्या धक्क्यावर ब्रायटन पॅलेस पिअर बनवलं आहे.  इथे रेस्तरॉं आहेत, छोटी छोटी दुकानं आहेत, कॅसिनो आहे, एक छोटेखानी amusement park पण आहे.
😛
एका कुटुंबाला एक मस्त दिवस घालवण्यासाठी लागणारं सगळं आहे तिथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून दोन्ही बाजूला ब्रायटनचा समुद्र किनारा आणि समोर क्षितिजापर्यंत दूर पसरलेला निळसर हिरवा (to be specific, turquoise blue) समुद्र अगदी मनसोक्त पाहता येतो.
आणि यासोबत इथल्या सीगल्सच्या लीला पाहणं म्हणजे चेरी ऑन द केक.
   मी पोचले तेव्हा दुपारचे १२.३० झालेले. भूक लागायला सुरूवात झालेली थोडी थोडी. इथे तासभर थांबू आणि मग शहराची भटकंती करू असं ठरवलं.(Planning महत्त्वाचं हो). एक दोन मोजकी दुकानं उघडी होती. दुपार असल्याने हॉटेल्स बंदच होती. पिअरवर खूप जास्त वारा होता. माझे कान दुखायला लागलेले, बिचारे सीगल्स उडत नाही, तरंगत होते. भरपूर फोटो काढले तिथे. मग तिथेच एका कठड्याशी थांबले..
                      

      एका बाजूनं सुंदर, रंगीत-संगीत ब्रायटन आणि दुसऱ्या बाजूला समोर तो अथांग सागर पसरलेला आणि त्याच्यालगत पहुडलेला त्याचा किनारा.
आपल्याइथे कोकणातला समुद्र तपकिरी, काळपट रंगाचा...
अंदमानला निळाशार, अगदी शाईतून बुडवून काढलेला समुद्र पाहिलेला...
तर इथल्या समुद्राची छटा अजूनच वेगळी. दूरवर हिरवट मोरपंखी, किनाऱ्याशी थोडा करडा. भर दुपारचं उन असल्यामुळे ते रंग अजूनच खुलून दिसत होते. समुद्राची ही छटा यापूर्वी कधी पहिली नव्हती. कितीतरी वेळ तो रंग डोळ्यात साठवत होते.
इथल्या किनाऱ्यावर वाळू नाही तर चक्क मोठमोठे गोटे आहेत. (त्यामुळे परदेशातल्या वाळूत पदचिन्हं उमटवण्याचा, नाव लिहून फोटो काढण्याचा प्रताप काही करता आला नाही, ते दु:ख वेगळंच. बदला म्हणून ४ गोटे खिशात टाकून आणले.)
या संपूर्ण किनाऱ्यावर हे गोटे बाहेरून आणून टाकलेत. याला पेबल बीच असंही म्हणतात. थोडं दूर समुद्रातल्या पवनचक्क्या इथून सहज दिसतात.
(ही आयडिया भारी आवडली मला. एवढा वारा असतो इथे, सरळ समुद्रातच पवनचक्क्या. लंडनहून निघाले तेव्हासुद्धा विमानातून खाली बघताना बऱ्याच ठिकाणी समुद्रात पवनचक्क्या दिसल्या. आपल्याकडेपण असं करायला पाहिजे.) समुद्राची खोल गाज आणि वाऱ्याचा आवाज याचं एक अजब पार्श्वसंगीत तिथे चालू होतं. एक दीर्घ श्वास घेऊन ते वातावरण मनापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला.
     हाच समुद्र कुठेतरी पुढे माझ्या मायदेशापर्यंत पोचतो ही भावना किती उत्कट आणि हळवं करणारी आहे हे त्या क्षणी जाणवलं. कानात ती कविता घुमायला लागली.
कदाचित याचं किनाऱ्यावर कुठेतरी, कोणे एके काळी एक कणखर मनाचा देशभक्त व्यथित झाला असेल, आपल्या जीवलगांच्या आठवणीने व्याकुळ झाला असेल... कदाचित अगतिकही...
आणि हा समोरचा समुद्र या आपल्यातला दुवा आहे... तो संदेशवाहक आहे हे वाटणं किती दिलासादायक असेल! सगळ चित्रं मनासमोर उभं राहिलं आणि डोळ्यात पाणी तरारलं. आयुष्याच्या चेक लिस्ट मधला एक बॉक्स टिक झाला होता.
-तेजाली शहासने.

1 टिप्पणी: