रविवार, ११ एप्रिल, २०२१

मनासारखे घर शोधताना...


 स्थळ – दिल्ली, राजेंद्रनगर. वेळ – जूनमधली रणरणती दुपार.

पात्र - मी, इस्टेट एजंट आणि माझा दिल्लीतला एक मित्र.

घटना – आम्हा तिघांची वरात राजेंद्रनगरच्या गल्ल्यांमधून फिरत होती. एजंट एकामागून एक घरं, पीजी, बरसाती दाखवत होता आणि मनातल्या मनात मी ते रिजेक्ट करत होते. चौथा मजला, लिफ्ट नाही, चिंचोळे जिने, मोठमोठ्या झुलत्या वायरींची गर्दी, टीचभर खोल्या, नकोसे भोचक प्रश्न या सर्वांच्या गर्दीत  कुठेतरी मला साक्षत्कार झाला की ये हमसे ना हो पाऐगा’. तरी सगळं संभाषण माझा मित्रच करत होता. माझी हिंदीची प्रचंड बोंब आहे. पण तरी...कुठेतरी अहं दुखावला. दुपारभर फिरून शेवटी सीपीला जाऊन पिझ्झा हादडला तेव्हा कुठे मन ताळ्यावर आलं. मित्र बिचारा मला समजवत होता. कोई ना, दुसरी जगह देखेंगे, मिल जाएगा अच्छा घर. But I was traumatized.  दोन-तीन दिवस वेगवेगळे भाग पाहीले. बजेट सोडा, कुठे घरच आवडेना. 

   शेवटी ब्रम्हास्त्र आठवायची वेळ आली. वैतागून रात्री घरी आले आणि घरी फोन केला. दोन दिवसात डॅडी दिल्लीत आले आणि त्या विकेंडला घर फायनल झालं. तेव्हापासून आजपर्यंत त्या घरात मी सुखाने राहीले, असंख्य मित्र मैत्रिणी- नातेवाईक आले, मनसोक्त पार्ट्या केल्या, ना कधी कोणी अपरात्री बेल वाजवली ना कधी काही कमी पडलं. कारण...घर शोधताना डॅडींचा अनुभव कामी आला. पण दर वेळी प्रत्येकालाच हे जमेल असं नाही. म्हणूनच हा लेखप्रपंच. 

  अन्न वस्त्र निवारा, माणसाच्या मूलभूत गरजा. अन्न कसं खायचं, किती खायचं कोणत्या वेळी खायचं आपल्याला बऱ्यापैकी माहीत असतं, कपडे तर काय, एक नूर आदमी दस नूर कपडा त्यासाठी असंख्य प्रकारचे सल्ले फुकट उपलब्ध आहेत. पण खरी कसोटी लागते ती घर शोधताना. मनासारखी वास्तू मिळाली तर ती ते घर नंदनवन बनतं, नाही तर आपलं जगणं मुश्कील होऊन बसतं. तुमच्या नशिबाने तुमच्या माता पित्यांनी ती तरतूद केली असेल तर आयुष्य थोडं सुखावह होतं. पण तरीही शिक्षण, बदलत्या नोकऱ्या, नवीन प्रदेश पाहण्याची ओढ, परदेशातील संधी यामुळे कोणी घर देता का घर हा प्रश्न कुणालाही चुकलेला नाही.

 घर शोधताना काय काय घडू शकतं याची कल्पना, घर शोधताना येणाऱ्या अडचणी, त्यांचे संभाव्य उपाय, काही टीप्स या लेखात मी देणार आहे. ही माहिती माझ्या आणि काही इतर मित्र मैत्रिणींच्या अनुभवावर आधारित आहे.

  नवीन शहरात गेल्यावर घर शोधताना भाषा हा एक मोठा अडसर ठरू शकतो. तुम्ही कितीही इंग्लिशचे पापड असा, हिंदी-विशारद असा वा मराठी तज्ज्ञ असा, तुम्हाला संवाद/ घसाघीस घरमालक किंवा एजंटशीच करावी लागते. तुमचं भाषाप्रभूत्व त्याच्या अज्ञानापूढे हात टेकू शकतं. भारतात दर 12 मैलाला भाषा बदलते हे तेव्हा अगदी पदोपदी जाणवतं. आणि त्यातून असंख्य घोटाळे आणि गैरसमज घडू शकतात.

उपाय – विश्वासू स्थानिकाची मदत. आपला मित्रपरिवार, नातेवाईक याच्या ओळखीतून एखादी व्यक्ती आधीच शोधून ठेवा जी तुम्हाला मदत करू शकेल. आणि स्थानिक व्यक्ती सोबत असल्यास एजंट आणि मालक लोक जरा मवाळ होतात हा एक अनुभव आहे.

घर शोधताना खालील मुद्दे तुमच्यासाठी चेकलीस्टप्रमाणे काम करतील. त्यात जास्तीत जास्त संभाव्यता लक्षात घेतल्या आहेत. त्यांच्यावरची विशेष टिप्पणी मी स्वतंत्रपणे देणार आहे-

1.घरभाडे आणि त्यासंबंधीत इतर खर्च, सोसायटी/ घराचे नियम व शर्ती

2.आजूबाजूचा परिसर, तिथली स्वच्छता व सुरक्षितता आणि उपलब्ध सोयी

3.सार्वजनिक वाहतूकीच्या सोयी – रिक्षा, टॅक्सी, बस, मेट्रो, लोकल इ.

हे तीन सर्वांत महत्त्वाचे मुद्दे. इतर सर्व मुद्दे यातील या तीन मुद्दयांतर्गतच येतात.

इतर तपशीलवार मुद्दे

शेजार व आचारसंहिता – सोसायटीतील लोक, घर भाड्याने देण्याची सोसायटीची नियमावली (एकटी मुलं किंवा पुरूष यांना या नियमांमुळे घर मिळताना बरेचदा त्रास होतो.) रात्री घरी येण्याच्या वेळा( पीजीच्या बाबतीत प्रामुख्याने), शाकाहारी/ मांसाहारी खाद्य, पाळीव प्राणी, आगंतुक पाहूणे, पार्कींग, पार्टीज यासाठी सोसायटीचे/ घरमालकाचे नियम

सोसायटीतील सोयी-सुविधा –  कचरा नेणारे, प्लंबर, मेकॅनिक इ, CCTV, सिक्यूरिटी गार्ड्स, सोसायटीतील स्वच्छता, जिम, स्विमींगपूल, क्लबहाऊस, जॉगिंग ट्रॅक

जवळपासची किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, हॉटेल्स, कॉफीशॉप्स, कॅफेज  

कामाच्या ठिकाणापासूनचे अंतर

इतर सोयी सुविधा जसं की बाजार, शाळा, जिम, मैदान, दवाखाना, ब्युटीपार्लर्स, देऊळ, सर्विसींग सेंटर्स, पेट्रोल पंप इ.

(क्रमश:)