मंगळवार, २९ मार्च, २०२२

मार्च आला.. कर नियोजन सांभाळा

 पूर्वप्रसिद्धी - मार्च आलाय; कर नियोजन केलं की नाही? जाणून घ्या Tax वाचवण्याच्या टिप्स | Sakal (esakal.com)


तेजाली चं. शहासने

मार्च महिना हा ऋतुबदलाचा महिना. पानगळ सुरू होते. गरम व्हायला लागतं. लोकरीचे कपडे बॅगेत बंद होऊन सूती, मलमलीचे कपडे बाहेर येतात. चहाऐवजी लिंबू सरबत बरं वाटतं. एसी, कूलर्स परत सुरू होतात. एकूण काय आपण उन्हाळ्याच्या जय्यत तयारीला लागतो. पण यात चोरपावलांनी आणखी एक गोष्ट येते, काय बरं? कर नियोजनाच्या जाहिराती! आता कर नियोजनबद्दल माहिती देणाऱ्या, तुम्हाला घाबरवणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या, मदत करणाऱ्या, गोंधळात टाकणाऱ्या अशा असंख्य प्रकारच्या जाहिराती आता तुमच्या मेल बॉक्समधे,मोबाईलच्या मेसेज बोक्समध्ये, वेगवेगळ्या वेबसाइटवर धुमाकूळ घालायला सुरुवात करतील. आणि तुम्हाला एकदम जाग येईल की आपलं कर नियोजन राहिलंय आणि त्यामुळे आता भरभक्कम कर भरावा लागणार.

  भारतात आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपतं. त्यामुळे ज्यांना करपात्र उत्पन्न असलेल्यांची एकदम धांदल उडून जाते. वर्षभर कंटाळा करत पुढे पुढे ढकललेलं करनियोजन आता एकदम घशाशी येतं आणि कुठे ना कुठे पैसे गुंतवायचे आणि त्यातल्या त्यात जमेल तेवढा कर वाचवायचा या भावनेतून माणूस समोर येईल त्या कर नियोजन योजनेत पैसे गुंतवतो. इथेच फसव्या, दिशाभूल करणाऱ्या संस्था, योजनांचं फावतं. तात्पुरता आपला कर वाचतो पण बरेचदा गुंतवणूक तितकीशी फायदेशीर ठरत नाही आणि उलट दीर्घ मुदतीत आपल्याला भुर्दंड सहन करावा लागतो.

आता यातून आपला बचाव कसा करता येईल? सर्वांत पहिला आणि मोलाचा सल्ला म्हणजे आर्थिक शिस्त अंगी बाणवा. उत्तम संपत्ती निर्मितीसाठी काटेकोर आर्थिक शिस्त आणि नियोजन याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एप्रिल महिन्यापासून तुमचे अर्थ नियोजन करण्याची सवय लावून घ्या आणि ती काटेकोरपणे पाळा. अशी योग्य वेळी आणि विचारपूर्वक केलेली गुंतवणूक तुम्हाला उत्तम परतावा देईल.

आता वळू शेवटच्या महिन्यातील कर नियोजनाकडे. इथेही शिस्त महत्त्वाची. सर्वप्रथम स्थितप्रज्ञ राहा. गोंधळून न जाता शांतपणे तुम्हाला कशात गुंतवणूक करता येईल त्याचे उपलब्ध आणि तुम्हाला परवडणारे पर्याय लक्षात घ्या. 80C आणि 80D अंतर्गत बऱ्याचशा वजवटी येतात. 80D अंतर्गत वैद्यकीय उपचाराचा खर्च, वैद्यकीय विमा या बाबी समाविष्ट होतात. 80C अंतर्गत जास्तीत जास्त १५०,००० – २००००० पर्यंतचेच कर नियोजन होऊ शकते. यापेक्षा जास्तीची  गुंतवणुक वजावटपात्र नसते. म्हणजे एकूण कर बचत ही २०,००० पेक्षा जास्त होत नाही. जर तुमचे गृहकर्ज असेल तर बरेचदा त्यातूनच तुमचे पुरेसे करनियोजन होते. उरलेली रक्कम वरीलपैकी एखाद्या ठिकाणी गुंतवता येईल. कर नियोजनासाठी, हे सर्व एकत्र करून या व्यतिरिक्त आणखी गुंतवणूक आवश्यक आहे का हे नक्की पडताळा.   

तुमच्याकडे जवळपास तीन आठवडे विचार करण्यासाठी आहेत. कर बचतीसाठीच्या मुदत ठेवी हा एक सोपा सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. यात केलेली गुंतवणूक तीन वर्षे काढता येत नाही आणि मिळणारा परतावा त्या मानाने कमी असतो. पब्लिक प्रॉव्हिडंड फंड हा आणखी एक सुरक्षित गुंतवणुकीचा उपाय. अचानक कर नियोजनाची वेळ आली आणि गुंतवणुकीबाबत योग्य मार्गदर्शन करणारं कोणी नसेल तर हे दोन सर्वांत सुरक्षित पर्याय ठरतात.

यानंतरचे हुकूमी कर नियोजनाचे पर्याय म्हणजे कर बचतीचे म्यूचुअल फंड, विमा पॉलिसी, शासनाचे विविध बॉण्डस, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय निवृत्ती योजना, तुम्ही उद्योजक असाल तर स्थावर किंवा जंगम मालमत्तेची खरेदी, व्यावसायिक खर्च, देणग्या इत्यादी. जसं मी आधी म्हणाले, जरी कर नियोजन झालेले नसले तरीही मुळात भंबावून जाऊ नका.  

 सध्याची युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअरबाजार खाली आला आहे, त्यामुळे चांगले म्यूचुअल फंड वाजवी किमतीत मिळून पुढे दीर्घ मुदतीत ते चांगला परतावा देऊ शकतील. त्यामुळे टॅक्स सेव्हींग म्यूचुअल फंडचा विचार करता येईल.

पुढचा पर्याय विमा पॉलिसी.
जर विमा पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल तर विमा संरक्षण पुरेसे आहे ना हे पाहणे सर्वांत महत्त्वाचे. त्याचा हप्ता किती जाणार आणि त्यातून कशा कशा प्रकारे परतावा मिळेल यांची पूर्ण स्पष्टता मिळल्याशिवाय विमा घेऊ नका. मनी बॅक, इक्विटी लिंक्ड, यूलिप, एंडोवमेंट, रिटायरमेंट प्लॅन, टॅक्स सेव्हिंग प्लॅन अशा विविध योजना येतात. मार्चमधील तातडीचे कर नियोजन लक्षात घेता शक्यतो दीर्घ काळ हप्ते भरावे लागतील अशी नवी विमा पॉलिसी घेऊ नये. निर्णय चुकल्यास त्याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागू शकतात. एक लक्षात ठेवा की विमा ही गुंतवणूक नसून आपत्कालीन तरतूद आहे. इतर गुंतावणुकीप्रमाणे त्यातून परतावा मिळत नाही. पुरेसे विमा संरक्षण, आरोग्य विमा, निवृत्तीनंतरची तरतूद या प्रमुख बाबी सोडून अधिकचा विमा फक्त तुमचा खर्च वाढवेल.  

मालमत्तेच्या विक्रीतून जर भांडवली लाभ (कॅपिटल गेन) झाला असेल तर त्याची पुनर्गुंतवणूक अथवा ते विशिष्ट बँक खात्यात ठेवण्यास विसरू नका.  

यासोबतच या मार्च महिन्यात आणखी काही महत्त्वाची कामे जी प्रत्येक करदात्याने करणे आवश्यक आहे

1.आर्थिक वर्ष २०-२१चं कर विवरण पत्र भरलं नसेल तर विलंबित कर विवरण (belated income tax return) ३१ मार्च २०२२ पर्यंत भरता येईल.          

२. बँकेत तुमच्या KYCची पूर्तता करा. रिजर्व बँकेने यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत दिलेली आहे. KYCची पूर्तता नसेल तर नंतर तुम्हाला बँकांचे व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात.

३. तुमचे आधार आणि पॅन एकमेकांशी जोडा. यासाठी देखील ३१ मार्च २०२२ पर्यंतची मुदत आहे.   

४. करदात्याचे करदायित्व दहा हजाराच्या वर जात असेल प्रत्येक तिमाहीत अग्रिम कर (अॅडव्हान्स टॅक्स) भरावा लागतो. तुम्हाला अग्रिम कर लागू होत असेल तर तो भरण्याची मुदत १५ मार्चपर्यंत आहे. नंतर त्यावर १% दंड भरावा लागतो.  

तेजाली चं. शहासने

०४-०३-२०२२

मँगो (Mango) शब्द इंग्रजीत आला कसा माहितीये?

 


फेब्रुवारी संपून मार्चच्या मध्यावर होळी, धुळवड वगैरे संपली की वसंताला सुरुवात होते. मोगरा बहरतो, तल्खली वाढायला लागते आणि वेध लागतात आंब्याचे. मंडईत पहिली पेटी दाखल होते, तिच्या लिलावाच्या बातम्या येतात. पण अजूनही फळांचा राजा तसा नजरेपासून दूरच. नुसत्या आठवणीनेसुद्धा तोंडाला पाणी सुटतं असा हा आंबा. संस्कृतमध्ये आम्रफल तर इंग्रजीत मँगो.

हा मँगो (Mango) शब्द इंग्रजीत कसा आला माहितीये? याचा प्रवास खूपच गमतीशीर. शब्दांच्या या उगमाचा शोध घेणाऱ्या शास्त्रास etymology aअर्थात व्युत्पत्तीशास्त्र म्हणतात. या व्युत्पत्तीशास्त्रज्ञांच्या मते हा मँगो हा शब्द तामीळ किंवा मलय भाषेतून आला आहे. कसा?
बघा. तर तामीळ भाषेत शब्द आहे मंकाय (mankay). man म्हणजे आंब्याचं झाड आणि kay म्हणजे फळ. म्हणजे याचा अर्थ आंब्याच्या झाडाचे फळ असा होतो. आताच्या तामीळ भाषेत हा शब्द मला सापडला नाही. तर या तामीळ भाषेतून तो मलय भाषेत गेला आणि झाला मांग्गा(mangga) म्हणजे आंबा. मलय ही मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, ब्रुनोई इ. देशांची राष्ट्रभाषा आहे. पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी आंबा युरोपभर पोचवला, त्यांनी मांग्गाचं केलं मांगा (manga) आणि अशा रीतीने इंग्रजीत त्याचं झालं मॅंगो (mango).
😁😋. आहे की नाही गंमत!
बोलीभाषा, स्थानिक भाषा याच कारणासाठी महत्त्वाच्या आहेत. दैनंदिन वापरासाठी त्या आवश्यक आहेतच. त्यासोबतच त्यांच्यात आपल्या इतिहासाचे, अस्तित्वाचे ताणे बाणे विणलेले आहेत. अशा विविध भाषा मिळून एक इतिहासाचं एक महावस्त्र विणलेलं आहे. यातल्या प्रत्येक धाग्याची जागा जपणं आणि ती टिकवून ठेवणं मानवी संस्कृतीचे पाईक म्हणून आपलं कर्तव्य आहे.
- तेजाली चं. शहासने