शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

 

या लेखाला मुद्दाम नाव दिलं नाहीये. दु:खी पत्रावर 'श्री' लिहीत नाहीत, तसंच काहीसं. आज लिहीणारे यंदाच्या गणपतीबद्दल.

 गणपती, सुख-समाधान, आनंद देणारा, बुद्धी, विद्येचं वरदान देणारा! दर वर्षी वाजत गाजत, नाचत डोलत येतो. दहा दिवस भक्तांच्या घरी राहतो. पोरीबाळी, नातवंडानी घर फुलून जातं. चार सुखदु:खाच्या गोष्टी होतात आणि बाप्पा दहा दिवसांनी निरोप घेतो.

पण बाप्पा! यंदा सगळं वेगळं आहे. सगळं शांत शांत! रांगोळीच्या पायघड्या नाहीत, ढोल ताशांचा गजर नाही, मोठमोठे देखावे नाहीत इतकंच काय, नेहमी येणारे नातेवाईकही नाहीत. सगळं गुमसूम. काही घरांत दर वर्षी लगबगीने गणपतीची तयारी करणारा काका नाहीये. काही घरांत पातळ पारीचे कळीदार मोदक बनवणारी आजी नाहीये. कुठे गणपतीचं लायटिंग करणारा दादा नाहीये तर कुठे आरतीची पुस्तक, टाळ शोधून ठेवणारे आजोबा नाहीयेत. काय झालं? कुठे गेले सगळे? तेही एकाच वेळी? बाप्पा, प्रश्न पडलाय का तुला? हरवले सगळे... दूर निघून गेले कुठेतरी!

दर वर्षी तू येतोस तेव्हा उधाण येतं आनंदाला. या वर्षी मात्र सगळच दबकत दबकत. इतर वेळी तू जाताना तरारणारे अश्रू, आज अनेकांच्या डोळ्यात ठाण मांडून बसलेत रे. गुढीपाडव्यापासून सुरू झालेलं नष्टचर्य थांबायच नाव घेत नाहीये. दु:खी गणपती ही काही नवीन गोष्ट नाही. जगाच्या रहाटगडग्यात हे अपरिहार्यच. तू आधीही अनेकदा अशा रडवेल्या घरी जाऊन घरात चैतन्य फुलवलं असशील. पण बाप्पा, यंदा अनेक घरात तुझ्या आगमनालासुद्धा अश्रुपात होईल. आधीच मोजक्या लोकांचं घर; उत्सवाला चार नातेवाईक येतात, दु:खं वाटलं जातं, मन हलकं होतं; पण आता तेही नाही. तुझ्या आगमनाने जीवलगाची उणीव आणखी गडद होईल. एखादी काकू गौरीला गजरा माळताना चुटपुटत हात मागे घेईल. आईने गेल्यावर्षी गौरीला घेतलेली साडी म्हणत एखादा अस्फुट हुंदका निसटून जाईल. कुठे दरवर्षी तुझी पावलं काढणारे चुडाभरले हात दिसणार नाहीत तुला. बाप्पा, यंदा हे सगळं तुला पाहायचंय, पचवायचय आणि भरल्या सोंडेने आशीर्वादही द्यायचाय. I know, it’s going to be too much. पण देवा गजानना, यंदा हे असं आहे.