मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

टर्कीमधल्या मांजरी

 
सुट्टीसाठी जेव्हा इस्तंबूल नक्की झालं तेव्हा तिकडे मांजरी भेटतील हे अपेक्षित होतंच. पण गंमत म्हणजे त्या संपूर्ण टर्कीभर आहेत. लोक मनापासून त्यांची काळजी घेतात. 

टर्कीमधलं माझं पाहिलं स्थलदर्शन होतं इफसस / इफेसस. कैसे बताए क्यू तुझको चाहे या गाण्यात दिसतं ते हेच शहर... इथेच नायके आणि स्टारबगच्या चिन्हातील शिल्प आहेत. ते प्रसिद्ध भव्य स्टेडियम इथे आहे. हा फोटो तिथेच काढलाय. निघता निघता या दोघी निवांत बसलेल्या दिसल्या. लगेच चान्स मारला... 

😻😻😻😻
चीनमधून युरोपात जाणारा रेशीम मार्ग आपल्याला माहिती आहेच. हे शहर याच मार्गावरचं एक प्रमुख ठिकाण होतं. एकेकाळी हे एक महत्त्वाचं बंदर होतं. भौगोलिक घडामोडींमुळे इथला समुद्र मागे हटला आणि बंदर बंद पडल्याने व्यापार मंदावला आणि शहराची कळा पालटली.
त्याचे भव्य दगडी अवशेष बघताना आपण विस्मित होतो. याच्या अवती भवती अनेक गोष्टी आहेत. तिथे पोचताना झालेली यातायात हा आणखी वेगळा विषय. ते नंतर लिहीन! तो पर्यन्त love cats, love travelling and love yourself!!!
#turkey #catsofinstagram #catsinturkey #ephesusruins #travel #solotravel 

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

एखाद्याचं /दीचं/ द्यांच सर्वनाम सुद्धा महत्त्वाचं


तो ती ते, त्याला तिला त्यांना, त्याने तिने त्यांनी

सर्वनाम, एखाद्याचं नाव सारखं सारखं न घेता त्याला सहजपणे संबोधण्यासाठी असलेली व्याकरणातील तरतूद. तो पुल्लिंगी, ती स्त्रीलिंगी आणि ते नपुंसकलिंगी. आणि मग काळ, वचनाप्रमाणे त्यांचा वापर. आता समजा विचार करा तुम्ही एक मुलगा किंवा पुरुष आहात आणि एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ‘कशी आहेस?’ असं विचारलं. किंवा तुमच्यासाठी तो ऐवजी ती सर्वनाम वापरलं तर? तुम्हाला काहीतरी चुकल्यासारख वाटेल, बरोबर? तसंच कदाचित तुम्हाला रागही येईल. एखाद लहान मूल असाल तर कदाचित तुमच्यासाठी ते आपमानजनक किंवा दुख:दायकही ठरू शकतं. कारण ते तुमची एक पुरुष म्हणून ओळख नाकारण्यासारखं झालं.

असंच समजा एखाद्याची ओळख सतत समाजाकडून नाकारली जात असेल तर विचार करा त्या व्यक्तीवर किती मानसिक आघात होत असतील. आता तुम्ही म्हणाल, असं कशाला कोण करेल? तर हो आता आपल्याला या सर्वनाम आणि प्रत्ययांच्या बाबतीत सजग राहायला हवं. एक समंजस समाज म्हणून, एक समजूतदार मित्र म्हणून आणि एक प्रगल्भ व्यक्ती म्हणून.

आता याचा संदर्भ देते. याचा थेट संबंध समलैंगिक, उभयलैंगिक, भिन्नलिंगी मिश्रलिंगी, लिंगपरावर्तित अर्थात LGBTQ+ समाजाशी संबंधित आहे. जसजसा काळ पुढे जाईल, कायदेशीर दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या जसजशी मान्यता मिळत जाईल, या समुदायातील अधिकअधिक लोक उघडपणे आपल्या समोर येतील, मुख्य प्रवाहात येतील. त्यांचे संदर्भ आपल्या बोलण्यात, लिहिण्यात वाचण्यात येतील. कदाचित ते तुमचे जिवलग मित्र मैत्रिणीही असू शकतील. अशावेळी त्याना संबोधायचं कसं हा प्रश्न आपल्याला पडेल. आणि त्यासाठीच हा खटाटोप.

सर्वनाम किंवा प्रत्ययांची गल्लत होऊ शकते ती मुख्यत्वे ट्रान्सजेंडर (transgender) म्हणजे भिन्नलिंगी किंवा मिश्रलिंगी व्यक्तींबाबत. ट्रान्सजेंडर (transgender) म्हणजे असे लोक ज्यांची लैंगिकता(sexuality) किंवा लैंगिक ओळख त्यांच्या जन्मजात लिंगाहून(sex) वेगळी आहे. इथे लिंग आणि लैंगिकतेची गल्लत होऊ शकते. लिंग हे तुम्हाला जन्माने मिळलेलं असतं तर लैंगिकता ही भावनेशी किंवा मनाच्या अवस्थेशी निगडीत असते. उदा. मी जन्माने पुरुष असलो तरीही मला आतून मी स्त्री आहे असं वाटू शकतं. याचा अर्थ माझी लैंगिकता ही स्त्रीची आहे. अशा लोकांच्या बाबतीत एक वेळ अशी येते की की ते त्यांची भौतिक ओळख झुगारून स्वत:ला जे अंत:प्रेरणेतून जाणवतं त्याप्रमाणे वागण्याचा निर्णय घेतात. आता यात असेही लोक येतात ज्यांची जन्मजात ओळख स्पष्ट नसते. त्यांच्या शरीरात स्त्री व पुरुष अशी दोघांचीही इंद्रिये असू शकतात. यातील काही लोक मग लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतात. पण हेही प्रत्येकासाठी वैद्यकीय किंवा आर्थिकदृष्ट्या शक्य असतंच असं नाही. शरीर आणि मनाचं हे द्वंद्व अनेक पातळ्यांवर त्या माणसाची परीक्षा बघतं. मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही हे खूप धोकादायक ठरू शकतं. मग यांच्यासाठी स्वत:ची ओळख जपण्याचा सर्वांत सोपा मार्ग असतो तो म्हणजे आपल्या अंतर्मनातून येणारी ओळख सामाजिकरीत्या स्वीकारणं.  

म्हणजे असं घडू शकतं की, एखादा पुरुष तुम्हाला भेटू शकतो ज्याने स्त्रीत्व स्वीकारलं असेल आणि हा क्षण येईल आपली प्रगल्भता दाखवण्याचा. अशा वेळी त्या व्यक्तीस स्त्री म्हणून संबोधणं तिच्या ओळखीचा आदर करणं ठरेल. आता प्रश्न हा की हे कळणार कसं? तर सर्वांत सोपं म्हणजे विचारणे. हल्ली समाजमाध्यमांवर अनेक ठिकाणी तुम्हाला व्यक्तींच्या नावापुढे he/him, they/them, she/her असं लिहिलेल दिसतं, ते याच साठी. आपल्यासाठी हा एक क्लू असतो. आणि हो, तुम्हाला वाटेल they एकवचनी कसं वापरायच? बिनधास्त वापरा. ते बरोबर आहे. यासाठी मराठीत आपण ‘ते’ वापरू शकतो.
आता गंमत अशी की
English मधे हा शब्दप्रपंच he/she/them एवढ्यावर आटपेल. पण मराठीमध्ये... मराठीमध्ये लिंगप्रमाणे प्रत्यय वेगळे होतात. तर तोही मुद्दा हे लक्षात ठेवावा लागेल. म्हणजे जर एखाद्याने स्त्री म्हणून ओळख स्वीकारली असेल तर आवर्जून कशी आहेस, काय म्हणतेस असे स्त्रीलिंगी प्रत्यय वापरावे लागतील.

हे लिहिण्याचा हेतू हाच की पुढे मागे जेव्हा या गोष्टी आपल्यासमोर येतील तेव्हा आपण यासाठी भाषिक पातळीवर आपण तेवढेच प्रगल्भ असायला हवं. LGBTQ+ Linguistics या विषयावर इंग्रजी भाषेत १९४१ पासून काम चालू आहे. अगदी याबद्दल विकिपीडियाचं स्वतंत्र पान देखील आहे. इंग्रजीत या संबोधनांबद्दल (pronouns) सतत जनजागृती चालू असते. हेच काम मराठीतही सुरू होणं आवश्यक आहे. आज हा लेख लिहितानाही LGBTQ+ साठी योग्य शब्द शोधताना माझी तारांबळ उडाली. स्त्री-पुरुष या द्वैतच्या पलीकडील या ओळखींसाठी चपखल मराठी शब्द शोधणं आणि आणि भाषा सर्वसमावेशक करणं हे मराठीसमोरील आव्हान आहे. मी दिलेले शब्द कदाचित चुकीचे वाटू शकतात. हवे तसे शब्द तयार करण्याची जी लवचिकता इंग्रजी भाषेत आहे ती मराठीत नाही किंवा आपल्याला अजून ती सवय लागलेली नाही. त्यामुळे काही मर्यादा आहेत. पण एखाद्याची ओळख मग ती जन्मजात असो वा स्वीकारलेली, तिचा आदर करणं, त्याबद्दल समाजभान निर्माण करणं हे आजच्या घडीला शक्य आहे. आणि तेवढंच करण्याचा हेतू या लेखाचा आहे.

चूक भूल देणे घेणे.

तेजाली चं. शहासने

२६ जुलै २०२१         

पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता ऑनलाईन 

१२ सप्टेंबर २०२१