रविवार, ७ मार्च, २०२१

Get on wheels girl!!

Get on wheels girl!!

गाडी चालवणे आणि पुरुषी अहंकार याचं नातं अजूनही घट्टच आहे. त्यामुळे महिला चांगली गाडी चालवतात हे स्वीकारणं खूपच कठीण जातंय बिचाऱ्यांना. बायांनो, तुम्ही विमान चालावा, बोट चालवा, ट्रेन चालवा, अगदी अंतराळात जाऊन या!पण तरीही यांचं म्हणजे भुईसपाट तरी माझं नाक वर. तरी बरं या कथित कुशल चालकांची पोरं, त्यांच्या आयाच शाळेतून घरी आणतात, कधी चारचाकीतुन कधी दुचाकीवरून. एवढं वाटतंय तर जा स्वतःच तुमच्या जीवाच्या तुकड्याला शाळेतून आणायला. . .
बहीण, बायको, मैत्रीण यांच्या सोबत कधीच गाडीत बसत नाहीत असं हे गर्वाने सांगणार; विमानाने जाताना महिला पायलट असेल तर तुम्ही विमानातून उतरता का हो? सगळं सोयीचं राजकारण!!!
एखादीने तुमची दुचाकी ओव्हरटेक केली तर गलिच्छ शिवी तुम्हीच देणार, बहिणीच्या स्किल्सचं वाभाडे काढतील, पण पुढे जाऊन तिला त्यात मदत करण्यापेक्षा चार चौघात मुखभंग करण्यात आनंद जास्त; नवशिक्या मित्राच्या गाडीतून बोंबलत फिरायला जातील, मग त्यात क्लच प्लेट घासून धूर निघू दे!
कितीतरी स्त्रियांना जीव मुठीत धरून गाडीत बसलेलं मी पाहिलंय, समस्त पी. एम. टी. ड्रायव्हर, ऑटोवाले तर, यांना लायसन्स कोणी आणि का दिलं असा प्रश्न विचारायला भाग पडतात. ते स्त्रियांचे पुरुष झालेले असतात का?
तुमच्या बेबंद गाडी हाकण्याला, एकादी मध्यमवयीन स्त्री तिच्या कमी वेगामुळे अडथळा ठरते… मग म्हणून तिला गाडी जमतंच नाही; आणि हाच बाळ पुढे जाऊन चांदणी चौक, पाषाण रोड, मुंबई पुणे हायवे कुठेतरी गाडीवरचा ताबा सुटून रस्त्यावर फरफटत जाऊन . 
.!!!! तरीही पुरुषांचं म्हणणं आमचीच #$@&$ !10qP
मुद्दा अजूनही मानसिकतेचाच आहे, साचेबद्धतेचाच आहे. 
आकाश मोकळं आहेच, रस्तेही मोकळे करण्याची जर मोहीम आखावी लागली तर त्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही.
ता.क. पुण्यातल्या महिलांबद्दल बोलण्याचा हक्क आणि अधिकार फक्त पुण्यातील महिलांनाच आहे, त्यामुळे त्याबद्दल इतरांनी कॉमेंट करून आपला वेळ वाया घालवू नये.
आणि थोडंस माझ्या 'गाडी शिकली पण आता सवय नाही' मैत्रिणींसाठी
Get back on wheels girls!! मन मोकळं करा, गाडीला स्टार्टर द्या, सगळं दडपण क्लचवर टाका आणि टाका गियर, आणि हलकेच दडपण सोडत आत्मविश्वासाचा accelerator दाबा… बघा तुमची गाडी कशी मस्त पळते.
तेजाली शहासने
०८मार्च २०२१
Photo credit : Mercedes Benz
प्रातिनिधीक चित्र