बुधवार, १७ जानेवारी, २०२४

 

सावध ऐका पुढल्या हाका| छद्मी ईमेल्स आणि कॉल्सच्या ||



 

रोज फक्त पंधरा मिनिटे काम करून दिवसाचे ५००० कमवा, 

फक्त विडियो लाईक करून महिन्याला ३०००० रुपये कमवा,

 पुढच्या एक तासात वीजबिलाचे पैसे भरले नाहीत तर तुमचे कनेक्शन तोडण्यात येईल, तत्काळ पैसे भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

या अशा प्रकारचे संदेश तुम्ही पाहिले असतील, तुमच्या मोबाईलवर तुम्हाला अनेकदा आलेही असतील. कदाचित त्यामुळे तुमच्या मनात कुतूहल निर्माण झालं असेल, कधी भीती तर कधी अगदी असे मेसेज वाचून हृदयाची धडधडही वाढली असेल. पण हे सर्व होऊनही तुम्ही त्यांना बळी पडला नसाल तर तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून स्वत:ला दूर ठेवण्यात यशस्वी ठरला आहात.

सध्याचं युग हे मार्केटिंगचं युग आहे असं म्हटलं जातं. आपलं उत्पादन ग्राहकाच्या गळी उतरवण्यासाठी संस्था वाटेल त्या मार्गाचा अवलंब करतात. गोडी गुलाबीने आपल्या उत्पादनाची स्तुती करण्यापासून ते आमचं उत्पादन वापरलं नाहीत तर जणू जगबुडीच होईल अशी गर्भित धमकी देण्यापर्यंत कुठलेही मार्ग त्यांना वर्ज्य नसतात. हेच लोण आता अगदी तुमच्या मोबाईलपर्यंत येऊन पोचलं आहे.

बोलण्यात गुंतवून, गोड बोलून, हातचलाखी करून फसवणूक करण्याचे प्रकार दशकानूदशके चालू आहेत. गुन्हेगार समोरच्याचे कच्चे दुवे हेरून त्यांचा वापर करून माणसाला फसवतो हे या सर्व गुन्ह्यामागचं समान सूत्र. बऱ्याच वर्षांपूर्वी घरोघरी फिरून वस्तू विकणारे सेल्समन, सेल्सगर्ल्स असत. त्याच्या माध्यमातून पाळत ठेवून, माहिती काढून चोरी, घरफोडीचे अनेक गुन्हे घडले होते. आज या गुन्ह्याचं सुधारित रूप आहे आपल्या मोबाईल आणि ई मेलमधून आपल्यापर्यंत पोचणारे ई विक्रेते किंवा ई सेल्सपर्सन.

यांच्यापासून दूर राहायचं, अशा मेसेजेसना उत्तर द्यायचं नाही हे आपल्याला माहिती असतं. परंतु काही ना काही कारणामुळे एका क्षणासाठी दुर्लक्ष होतं आणि आपण एका गुन्ह्यास बळी पडतो. अनेकदा तर नक्की हा संदेश खरा आहे की खोटा? खरा असेल तर उगाच भुर्दंड बसेल यासारखी भीतीही मनात निर्माण होते आणि नंतर कटकट नको म्हणून आपण त्या संदेशातील लिंकवर क्लिक करतो आणि नंतर फसवणूक होते.

आज भाषातज्ज्ञ म्हणून काम करताना या सर्व प्रकारच्या संदेश, ईमेल्स किंवा फोनकॉल्समध्ये मला काही समान धागे दिसतात. हे संदेश थोडे बारकाईने वाचले तर त्यातील शब्द, लेखन, मजकूर या आधारे आपण मेसेज खरा की खोटा याचा अंदाज घेऊन पुढे योग्य ती पावले उचलू शकतो. तर मुळात हे असे फसवणुकीचे ईमेल्स, संदेश, फोन कॉल्स ओळखायचे कसे याची माहिती या लेखात घेऊ या.

१.       अनधिकृत क्रमांक किंवा ई पत्त्यावरून आलेले संदेश – तुमचे कर्ज, वीजबिल, पाणी, टेलीफोन अशा कोणाकडूनही होणारा पत्रव्यवहार हा त्यांच्या ठरलेल्या ई-पत्त्यावरून किंवा मोबाईल क्रमांकावरून होतो. शक्यतो अशा संस्थांचे संदेश त्यांच्या विशिष्ट नावानिशी तुम्हाला येतात उदा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेसेजच्या नावात SBI असतं, एअरटेलच्या मेसेजवर Airtel. असे त्या त्या संस्थांची लघुरूपे असतात. कुठलीही संस्था वैयक्तिक क्रमांक अथवा ई पत्त्यावरून संपर्क करत नाही.   

२.       लेखन आणि वाक्यरचना – कुठलीही संस्था आपल्या ग्राहकांना एका विशिष्ट शैलीत संपर्क करते. हे लेखन औपचारिक असतं. तुमच्यासाठी असलेल्या संदेशात तुमचं नोंदणीकृत नाव, तुमचं खाते क्र. असे तपशील असतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे लेखन नेटकं, अचूक असतं. याउलट फसव्या संदेशात बरेचदा फक्त नमस्कार प्रिय ग्राहक, hello esteemed customer असे मोघम उल्लेख असतात. त्यात तुमचं नाव नसतं. लेखन अर्धवट, घाईघाईत लिहिलेलं असतं, अनावश्यक लघुरूपे असतात. त्यात खास तुमच्या माहितीचा उल्लेख नसतो. वाक्यरचना चुकीची, अर्धवट असते. मराठी असेल तर ते यांत्रिक भाषांतर असतं, इंग्रजी लेखनात स्पेलिंगच्या, वाक्यरचनेच्या चुका असतात. असे संदेश नेहमीच टाळा.

३.       भीती दाखवणारे संदेश – फसवणूक करणारा माणसाच्या मनातल्या भीतीचा गैरफायदा घेतो. अनेकांना वेळेवर बील दिलं नाही, एखाद्या गोष्टीची वेळेवर पूर्तता केली नाही, समोरचा घाई करत असेल तर त्याची दखल घेतली नाही तर अस्वस्थ वाटत राहतं, चीडचीड होते. अपराधीपणाची भावनाही निर्माण होते. आपण समोरच्याने सांगितलेल्या वेळेत ते केलं नाही तर आभाळ कोसळेल, किंवा ती ऑफर आपल्याला मिळणार नाही, आपले पैसे वाचणार नाहीत या भावणेतूनही अनेकदा लोक अशा घाई करणाऱ्या संदेशाला बळी पडतात. फसवणूक करणारे संदेश नेहमीच असे भीती दाखवणारे, वेळेचं अवाजवी बंधन घालणारे असतात. त्यामुळे असं काहीही संदेशात किंवा ई मेलमध्ये असेल तर त्या संस्थेच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क करून त्याची आधी खातरजमा करावी. कर्जाचे हप्ते, पाणी जोड वीज जोड संबंधित कुठलीही कारवाई होणार असेल तर त्यासंबंधी पूर्वसूचना अधिकृत मार्गांनी पत्राद्वारे, वैयक्तिक रित्या भेटून दिली जाते. असे अधिकृत पत्र सोडून कुठल्याही संदेशावर विश्वास ठेवू नका.  

४.       अनाहूत संदेश – फसवणुकीचे संदेश नेहमीच अनाहूत असतात. अचानक कधीतरी अनोळखी क्रमांकावरून तुम्हाला फोन येतो किंवा एखादा मेसेज येतो. यातली भाषा अनेकदा आर्जवी, गळेपडू असते. काहीतरी आमिष असतं, किंवा अशक्यप्राय कमी किमतीत, सवलतीत वस्तू देण्याचे आश्वासन असते. एवढं स्वस्त कसं असा प्रश्न आपल्याला पडतो. हा प्रश्न पडणं हीच फसवणुकीच्या संदेशाची ओळख. त्यापासून दूर राहा. तो संदेश डिलिट करा आणि तो क्रमांक ब्लॉक करा. हल्ली असे संदेश व्हॉटस अॅपवरही येतात. Do you have a few minutes? I have an interesting offer. अशा आशयाचा मेसेज त्यात असतो. हे काय म्हणून आपण सहज बघायला जातो आणि त्यांच्या जाळ्यात अडकतो.

५.       अनाहूत विडिओ कॉल्स – व्हॉटस अॅपवर विडिओ कॉल करून अश्लील चित्रफीत दाखवून ब्लॅकमेल करण्याच्या बऱ्याच घटना सध्या दिसून येतात. अनोळखी क्रमांकावरून आलेले हे विडिओ कॉल्स काही सेकंदच असतात परंतु यात नकळतपणे आपला विडिओ रेकॉर्ड केला जातो. नंतर हेच व्हीडियो आपल्या फोटोसह आपल्या नातेवाईक, मित्रवर्तुळात पसरवण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात. बदनामी होईल या भीतीने चूक नसतानाही या फसवणुकीस बळी पडतो. असे कॉल्स न घेणं महत्त्वाचे पाऊल. हे क्रमांक अनोळखी असतातच आणि अनेकदा भारतातील नसतात, म्हणजेच त्यांची सुरूवात +९१ ने होत नाही. तर कुठल्याही अनोळखी क्रमांकावरून येणारे विडिओ कॉल्स घेणे १०० % टाळा. असा कॉल आल्यास तो मोबाईलवर कट कसा करायचा हे शिकून घ्या, कट करता आला नाही तर तो बंद होईपर्यंत तसाच वाजू द्या. नंतर तो नंबर रिपोर्ट करून ब्लॉक करा.

 - तेजाली चंद्रकांत शहासने

पूर्वप्रसिद्धी : वाणिज्यविश्व जानेवारी 2024 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा