मंगळवार, २८ मे, २०१९

ब्रायटनच्या किनाऱ्यावर

ब्रायटन...अजूनही नाव वाचलं की मनात हलकीशी कळ उमटते. आता अर्थात संदर्भ बदललेत. पण त्यातली आर्तता अजूनही तीच आहे. सहावी सातवीत असताना वि.दा.सावरकरांची ‘सागरास’ ही कविता होती शिकायला. ती पाहिल्यावर, एवढी मोठी कविता पाठ कशी होणार या तद्दन अभ्यासू प्रश्नाने मी हैराण झाले होते. नंतर मग कधीतरी ते गाणं ऐकलं... सागरा प्राण तळमळला... आणि असंच कधीतरी ती कविता श्वास बनून गेली. मूळ मुद्दा हा, त्या कवितेच्या माहितीमध्ये, ‘‘ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर बसून सावरकरांनी ‘सागरास’ ही कविता लिहिली.” हे वाक्य होतं. ब्रायटनची ओढ तेव्हापासूनची! पण तेव्हा कधी वाटलं नव्हत की खरंच ब्रायटनला मी जाईन.
 
ब्रायटनचा समुद्रकिनारा या अप्रतिम काव्यरत्नाची प्रसवभूमी. लंडनमधील धकाधकीला कंटाळून काही दिवस शांतपणे व्यतीत करवेत या उद्देशाने सावरकर ब्रायटन या छोट्याश्या खेड्यात आले. त्यांना आलेलं एकाकीपण, घरच्यांची चिंता, मायदेशाची आठवण हे सगळं या कवितेत अगदी ओतप्रोत भरलंय.
    कसा असेल तो समुद्रकिनारा, कसा असेल तो सागर? तिथे काही आठवणी असतील का त्यांच्या? असंख्य प्रश्न मनात घेऊन ब्रायटनला गेले. खरंतर लंडनला जायचं ठरलं तेव्हा काहीच डोक्यात नव्हतं ... आणि तयारी करता करता एके दिवशी अचानक आठवलं ... अरे मी ब्रायटन कसं विसरले? लंडनला जातीये तर ब्रायटनला जायलाच हवं. आणि एकदाचा ४ मार्च २०१९ रोजी तो सुदिन उगवला आणि अस्मादिक ब्रायटनला येऊन पोचलो.
    यूकेमध्ये प्रवास त्या मानाने महाग आहे हे जाता जाता सांगायला हरकत नाही. लंडन ब्रायटन अंतर साधारण ८७ किमी आहे पण तेवढ्या प्रवासाचे वट्ट २० पौंड भरले... येऊन जाऊन ४० आणि खाण्यापिण्याचे वेगळे. एकूण काय, बांबू बसला ... पण हौसेला मोल नसतं! पण प्रवास मात्र सुंदर होता. शहरातून गावाकडे जातानाचा प्रवास हा नेहमीच सुखावह असतो. मी गेले तेव्हा हिवाळा संपत आलेला. त्यामुळे लंडनमध्ये झाडांचे सापळे दिसत होते. कुठे कुठे झाडांना फुटवे यायला सुरवात झाली होती. बस शहरातून बाहेर पडली आणि लांबलचक कुरणं, पांढऱ्या, गुलाबी फुलांनी लगडलेली झाडं दिसायला सुरवात झाली. मधेच कधीतरी डोळा लागला, तो थेट ब्रायटनला पोचल्यावरच उघडला. दुपारी १२ च्या आसपास पोचले असेन. ऊन होतं पण हवेत गारठा होता. एका प्रशस्त रस्त्यावरून  भसकन एका चिंचोळ्या गल्लीत आमची बस शिरली. ड्रायव्हर चुकला की काय? मनात विचार आला आणि अगदी दोनच मिनिटात त्या गल्लीच्या टोकाशी असलेल्या एका छोट्याश्या बस स्टॅंडवर आमची बस थांबली.
(या दोन पिवळ्या इमारतींच्या मध्ये एक छोटी गल्ली आहे, तिथे बस स्टँड आहे. हा फोटो पिअरच्या गेटवरून काढलाय.)
समुद्रकिनारा तिथून जवळच होता. जवळ म्हणजे डेक्कनच्या बस स्टॉपपासून नदी जेवढी जवळ आहे तेवढाच आणि बसस्टॉपचा आकार, आपल्या इथल्या एखाद्या फलाटाएवढाच (म्हणजे कोथरूडचा PMT स्टॅंडपण मोठा वाटेल.)  लगबगीनं रस्त्यावर आले. डाव्या हाताला थोड्या अंतरावर ब्रायटन पियर दिसत होतं. कधी त्या किनाऱ्यावर पोचते असं झालेलं.
   आता इथे थोडं तिथल्या रस्त्याबद्दलही लिहायला हवं. रचना तशी नेहमीसारखीच! रस्ता, त्याला लागून सायकलचा ट्रॅक आणि त्याला लागून फुटपाथ. पण वेगळेपणा हा की फुटपाथ आणि सायकलचा रस्ताही अगदी ऐसपैस, प्रशस्त होते. आपल्या गणिताप्रमाणे चांगला तीनपदरी रस्ता आरामात बसला असता हो तेवढ्यात!

 हा सायकल मार्ग यूकेतील National Cycle Network चा भाग आहे.
तर... फुटपाथाला लागून रुंद कठडे होते, दुर्बिणी ठेवल्या होत्या. छान ऊन होतं. मस्त माहोल झालेला. किनाऱ्यावर पोचायला मन अधीर झालेलं. रस्ता पार करू फुटपाथवरून चालत चालत एकदाचे तिकडे पोचलो. इथे समुद्र किनाऱ्यावर एका मोठ्या धक्क्यावर ब्रायटन पॅलेस पिअर बनवलं आहे.  इथे रेस्तरॉं आहेत, छोटी छोटी दुकानं आहेत, कॅसिनो आहे, एक छोटेखानी amusement park पण आहे.
😛
एका कुटुंबाला एक मस्त दिवस घालवण्यासाठी लागणारं सगळं आहे तिथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून दोन्ही बाजूला ब्रायटनचा समुद्र किनारा आणि समोर क्षितिजापर्यंत दूर पसरलेला निळसर हिरवा (to be specific, turquoise blue) समुद्र अगदी मनसोक्त पाहता येतो.
आणि यासोबत इथल्या सीगल्सच्या लीला पाहणं म्हणजे चेरी ऑन द केक.
   मी पोचले तेव्हा दुपारचे १२.३० झालेले. भूक लागायला सुरूवात झालेली थोडी थोडी. इथे तासभर थांबू आणि मग शहराची भटकंती करू असं ठरवलं.(Planning महत्त्वाचं हो). एक दोन मोजकी दुकानं उघडी होती. दुपार असल्याने हॉटेल्स बंदच होती. पिअरवर खूप जास्त वारा होता. माझे कान दुखायला लागलेले, बिचारे सीगल्स उडत नाही, तरंगत होते. भरपूर फोटो काढले तिथे. मग तिथेच एका कठड्याशी थांबले..
                      

      एका बाजूनं सुंदर, रंगीत-संगीत ब्रायटन आणि दुसऱ्या बाजूला समोर तो अथांग सागर पसरलेला आणि त्याच्यालगत पहुडलेला त्याचा किनारा.
आपल्याइथे कोकणातला समुद्र तपकिरी, काळपट रंगाचा...
अंदमानला निळाशार, अगदी शाईतून बुडवून काढलेला समुद्र पाहिलेला...
तर इथल्या समुद्राची छटा अजूनच वेगळी. दूरवर हिरवट मोरपंखी, किनाऱ्याशी थोडा करडा. भर दुपारचं उन असल्यामुळे ते रंग अजूनच खुलून दिसत होते. समुद्राची ही छटा यापूर्वी कधी पहिली नव्हती. कितीतरी वेळ तो रंग डोळ्यात साठवत होते.
इथल्या किनाऱ्यावर वाळू नाही तर चक्क मोठमोठे गोटे आहेत. (त्यामुळे परदेशातल्या वाळूत पदचिन्हं उमटवण्याचा, नाव लिहून फोटो काढण्याचा प्रताप काही करता आला नाही, ते दु:ख वेगळंच. बदला म्हणून ४ गोटे खिशात टाकून आणले.)
या संपूर्ण किनाऱ्यावर हे गोटे बाहेरून आणून टाकलेत. याला पेबल बीच असंही म्हणतात. थोडं दूर समुद्रातल्या पवनचक्क्या इथून सहज दिसतात.
(ही आयडिया भारी आवडली मला. एवढा वारा असतो इथे, सरळ समुद्रातच पवनचक्क्या. लंडनहून निघाले तेव्हासुद्धा विमानातून खाली बघताना बऱ्याच ठिकाणी समुद्रात पवनचक्क्या दिसल्या. आपल्याकडेपण असं करायला पाहिजे.) समुद्राची खोल गाज आणि वाऱ्याचा आवाज याचं एक अजब पार्श्वसंगीत तिथे चालू होतं. एक दीर्घ श्वास घेऊन ते वातावरण मनापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला.
     हाच समुद्र कुठेतरी पुढे माझ्या मायदेशापर्यंत पोचतो ही भावना किती उत्कट आणि हळवं करणारी आहे हे त्या क्षणी जाणवलं. कानात ती कविता घुमायला लागली.
कदाचित याचं किनाऱ्यावर कुठेतरी, कोणे एके काळी एक कणखर मनाचा देशभक्त व्यथित झाला असेल, आपल्या जीवलगांच्या आठवणीने व्याकुळ झाला असेल... कदाचित अगतिकही...
आणि हा समोरचा समुद्र या आपल्यातला दुवा आहे... तो संदेशवाहक आहे हे वाटणं किती दिलासादायक असेल! सगळ चित्रं मनासमोर उभं राहिलं आणि डोळ्यात पाणी तरारलं. आयुष्याच्या चेक लिस्ट मधला एक बॉक्स टिक झाला होता.
-तेजाली शहासने.

सोमवार, २० मे, २०१९

शिव

शिव...उत्पत्ती , स्थिती आणि लय यांतील लयाचा कर्ता, अत्यंत गूढ, उग्र , राकट, एकांतप्रिय, अत्यंत टोकाच्या स्वभावांचा उत्कट मिलाप, भणंग असूनही समस्त सृष्टीचा कारभार सांभाळणारा, महायोगी, नटराज, तृतीय नेत्राचा एकमेव अधिकारी, सांब सदाशिव !!! 
     तसा शंकर काही आबालवृद्धांचा लाडका वगैरे नाहीच. ते खातं त्याच्या लेकाकडे बऱ्याच प्रमाणात, आणि थोडं बहुत कृष्णाकडे. शंकर म्हणजे एकप्रकारे घरातला , गावातला बडा बुढा...सगळ्यांचा बाप ,देवांचा देव महादेव किंवा ऑफिस मधला बिग बॉस (I stillhave reservation about this thought, but just to simplify concept.) त्याच्याबद्दल लोकांच्या मनात श्रद्धा आणि भीती सारखीच . स्मशान वैरागी, एकांती निवांत, आपल्या कामात गुंग, देवादिकांवर जिवावरची संकटं आली की सगळे त्याला शरण, श्रावणी सोमवार, सोळा सोमवार, महाशिवरात्रीचा कडक उपास, पार्वतीची तपश्चर्या , शंकराचं तांडव, एकूणच काय तर अगदी कडक परीक्षा पाहणारा , चूक झालीच तर कडक शासन करणारा पण एकदा त्याच्या मनात बसलं की तुम्हाला कसलीही ददात पडू न देणारा!!
    मी काही कट्टर शिवभक्त नाही, पण हो, त्यावरची श्रद्धा मला वारसाहक्काने मिळाली आहे. मी आस्तिक किंवा नास्तिक दोन्हीही नाही; पण शिव या संकल्पनेभोवतालची गूढता मला त्याच्याकडे आकर्षित करते. त्यातली अनामिक, भारून टाकणारी ऊर्जा मला अचंबित करते, माझ्या अस्तित्वाच्या उद्देश्यावर विचार करायला भाग पाडते.
      शिवाची माझी पहिली भेट कधी आठवत नाही, पण खूप लहानपणापासून ही शक्ती माझ्या जगण्याचा भाग आहे. त्यातला एक भाग माझे आजी आजोबा, आणि दुसरा ज्याने मला शिवाच्या आणखी जवळ नेलं... नृत्य ... जिथे शंकराला नटराज म्हणून पूजलं जातं. 


‘आंगिकम् भुवनम् यस्य, वाचिकम् सर्व वाड्मयम्,
आहार्यम् चन्द्रतारादि: तम् नम: सात्विकं शिवम् |
असं म्हणत, त्याला साक्षी ठेवून नर्तकाची कला  सिद्धीस जाते. एकाच शक्तीची ही विभन्न रूपं शिवाभोवतलचं गारुड आणखी गूढ करतात. आजी आजोबांचे उपास तापास, अनुभव, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी यातून नकळत या श्रद्धेची बीजं मनात रुजली. आता यात प्रत्यक्ष शंकराचा वाटा किती आणि आजी आजोबांवरच्या प्रेमाचा किती हे सांगणं कठीण ( आजही सोमवार म्हटलं म्हणजे शंकरपेक्षा , आजीचा उपास , तिची श्रद्धा हेच आठवतं). पुढे जसं जसं वाचत गेले,सहस्त्र दल कमळासारखं शिव रूप उलगडू लागलं. आणि एका क्षणी जाणवलं हे रूप पाहण्यापेक्षाही अनुभवणं आणखी सुंदर आहे. 

  आणि असाच साधा काशी विश्वनाथ. अवघ्या विश्वाचा तो नाथ! गंगेकाठी विसावला ज्योतिर्लिंग रूपाने, देऊळ केवढं त्याचं... अगदी एवढंस, २० २५ लोक मावतील एवढंच. अवतीभोवती बंदिस्त आवार आहे. चांदीचा दरवाजा, चांदीचे दिवे, कलश पूजा सामग्री हे सर्व आपण मानवाने केलेले उपचार हो! पण त्याला काय हवं, चिताभस्म !! काशीविश्वनाथाच्या पूजेत रोज चिताभस्म असतं. इथेही हा देव आपलं साधेपण सोडत नाही. पहाटे चार वाजता अभिषेक सुरु होतो. माझ्या वाढदिवशी माझ्या संपूर्ण कुटुंबासहित त्याचं दर्शन झालं हे माझं भाग्य. अजूनही चंद्र आकाशात होता, पुजाऱ्यांचा धीरगंभीर मंत्रघोष,एकेका मंत्रासोबत पिंडीवर होणारे संस्कार, तिच्यावर चढवली जाणारी फुलं.. एका क्षणी डोळे मिटले डोळ्यांतून चटकन अश्रू ओघळले, स्वतःला समर्पित केलं शिवाच्या चरणांशी. त्याचे आभार मानले त्या भारावलेल्या क्षणासाठी. तो क्षण ज्या क्षणी मृत्यूचं भय कमी झालं…
खरं तर याचं रूप किती साधं... आणि किती प्रांजळ, कितीतरी सत्य! शक्तीशिवाय शिवाचं अस्तित्व शून्य हे त्यानेच सांगितलेलं. शिवलिंगाला अभिषेक घालताना कधी हा विचार केलाय की शाळुंकेशिवाय शिवलिंगाला पूर्णत्व येत नाही याचा अर्थ काय? संपूर्ण विश्वाचा तोल सांभाळणारं ते अत्यंत सोपं तत्त्वज्ञान आहे, नर-नारी यांच्या मिलनातून प्रकट होणाऱ्या उर्जेचं हे एक साधं रूपक आहे. पूजा असते या चैतन्याची, ऊर्जेची; आणि सामान्य माणूस अडकून राहतो अर्थहीन कर्मकांडात! वरवरच्या चंदेरी सोनेरी मुखवट्यांत! बम भोले करत फुप्फुसं जळणाऱ्या गांजाच्या चिलीमीत!
-तेजाली

शनिवार, ११ मे, २०१९

|| सुखोत्सवी अशा जीव अनावर, पिंजऱ्याचे दार उघडावे ||

लेखाची तारीख : १२ मे  २०१८
आज सकाळीच लोकसत्तामध्ये १०४ व्या वर्षी एका संशोधकाने इच्छामरण पत्करल्याची बातमी वाचली. माझं जगणं परिपूर्ण झालं असून यापुढे जगण्याची इच्छा नाही, असं म्हणत हसत ते मृत्यूला सामोरे गेले. जाताना, मला ऑस्ट्रेलियात मरणं आवडलं असत, पण तसा कायदा तिथे नाही, याचा सलही त्यांनी बोलून दाखवला... वाचता वाचता जीव कातर झाला ... नकळत आजी आठवली, तीही अशीच कुडीत अडकली होती... आणि त्यानंतर दुपारी लिमये आजोबा गेल्याचं समजलं. त्यांचही वय झालंच होत, कितीतरी दिवस वाट पाहत होते ...सुटकेची. सुटले एकदाचे! टचकन पाणी आलं डोळ्यांतून. असं सगळं एकाच दिवशी, म्हणजे निव्वळ योगायोग. पण बघा ना.. आपण म्हणतो काय...सुटले ! अनेक यातना, त्रास, हताशा यातून सुटका झाली, जसं काही पिंजऱ्यातून पक्षी सुटला.. मुक्त झाला.. स्वच्छंद विहारायला. म्हटलं तर त्या जीवासाठी हा परमोच्च आनंदाचा क्षण. पण 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!' आणि तेव्हा जाणवलं इच्छामरणाची गरज किती आहे ते ! अर्थात तिथेही नैतिक-अनैतिकतेचा मुद्दा येतोच. पण जिथे आपण हवा तो जीव (प्राणी, पक्षी, फळ, फुल अगदी माणूस) आपल्या मर्जीप्रमाणे बनवण्याच्या तंत्रज्ञानापर्यंत आलोय, अगदी मुहूर्ताप्रमाणे जन्म देण्यासाठी सिझेरियन करण्याची अक्कल ज्या मानवाला आली आहे, तिथे संपूर्ण उपभोगल्यानंतर उरलेलं निर्माल्य आनंदानं विसर्जित करायचं असेल तर त्यात का आडकाठी?
विज्ञानाच्या असंख्य उपकारांपैकी एक म्हणजे माणसाच वाढलेलं आयुर्मान! त्यावरून एक विनोद आठवला, दारू न पिऊन तुमचं आयुष्य वाढेल पण ती वर्षं म्हातारपणातली असतील. वृद्धापकालाच्या मर्यादा यावरून समजून याव्यात.
माणसाचं आयुष्य वाढलेलं असलं, तरी ते प्रचंड व्यग्र झालं आहे. पहिलीतल्या मुलापासून ते ऑफिसला जाणाऱ्या आईपर्यंत घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण दिवस येन केन प्रकारेण कमालीचा बिझी असतो. अशा वेळी त्यामुळे घरी वृद्ध व्यक्ती असेल, कितीही म्हटलं तरी तिच्यासाठी वेळ देता येत नाही. त्यांच्यासाठी मदतनीस, आया जरी ठेवली तरीही नात्यातला ओलावा, प्रेम त्यातून मिळेलच याची शाश्वती काय?
जोपर्यंत हातपाय हलतात तोपर्यंत नाही, पण काही कारणास्तव आजारपणामुळे ती व्यक्ती अंथरुणाला खिळली तर सगळ्या कुटुंबाचंच स्वास्थ्य हरवतं(असं कुटुंब प्रत्येकाला लाभो). सगळ्यांचाच जीव त्यात अडकलेला असतो आणि आपला व्यग्र दिनक्रम आणि आपला बाप किंवा लाडक्या आजोबांचं अंथरुणाला खिळलेल रूप यात प्राधान्य कशाला द्यायचं यात माणसाचा त्रिशंकू होतो.
त्या न्युनगंडातून मग पैशाने समाधान शोधण्याचे असंख्य मार्ग समोर येतात. निरनिराळे उपचार, महागडी औषधं, साधनं! आणि दुसरीकडे आजारी माणूस आपल्या जर्जर कायेवर चाललेल्या शृंगाराने व्यथित होत राहतो. एवढे मोठाले खर्च, पोराबाळांची तगमग त्या जीवालाही पाहवत नाही. त्यात आजारपणात होणाऱ्या यातना, परावलंबित्वाने होणारा मानसिक त्रास हे वेगळंच. यासाठी जरा-मानसोपचार ही नवी शाखा उदयाला येतीये, ज्यात वृद्धानां मानसोपचार दिले जातात.
या उपचारांना यश आलं ठीक, नाहीतर एका क्षणी तो जीव मनाशी खुणगाठ पक्की बांधतो आणि....वाट पाहण्याचा बघणं सुरु होतं.
म्हटलं तर इच्छा मरणाचा मुद्धा इथे येतो. कारण निर्माल्य वेळेत विसर्जित केलं तर ठीक नाहीतर ते कुजतंच! आनंददायी जीवन जगण्याचा हक्क जसा सर्वांना आहे तसाच आनंदी मृत्यूचा हक्क प्रत्येकाला का नसावा?
(हे थोडं कडू असलं तरी सत्य आहे. आपल्याच मृत्यूची आस लावून बसलेली माणसं भेटणं दुर्मिळ नाही, आणि त्यातून येणारं नैराश्य हा वेगळ्या लेखाचा विषय होईल.) 

माझी लाडकी आजी आणि आमचे आप्त लिमये आजोबा (गणेश हरी लिमये, देहावसान ११ मे २०१८ ) यांच्या स्मृतीस अर्पण 
-तेजाली शहासने.
12/05/2018

रविवार, ५ मे, २०१९

खामोशिया



रात की इन नर्म खामोशियो मे ना जाने है कितनी दास्ताने...
कुछ अनकही करवटें .. कही ना छलके पैमाने
कभी सुन कर देखो ये खामोशिया....ये रात भी कुछ कहेती है
तुम क्या जानो मेरा गम...दिन का शोर इस से कई बेहेतर है!!!!
-तेजाली
11/11/2013

शुक्रवार, ३ मे, २०१९

दुसरा प्याला




   व्हिस्कीच्या दुसऱ्या पेगबरोबर किंवा बियरच्या दुसऱ्या बाटलीबरोबर झाकणाबरोबर मनाची दारंही उघडायला हवीत, तर त्या बैठकीची खरी मजा. पण अशी बैठक अगदी राखीव लोकांसोबतच! उगाच आहेत म्हणून १५-२० टाळकी एकत्र करून बसलात तर तो आपल्या वेळेचा आणि दारूचा फक्त अपव्यय होतो, अशा वेळी फक्त तीर्थप्रसादच बास! (ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी टिप्पणी: दारूबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे, संदर्भासाठी चित्रलेखा हा मीनाकुमारीचा चित्रपट पहावा).
    बैठक हवी निवडक जिवलागांसोबत! एखादी दुपार, संध्याकाळ किंवा रात्र आणि हाताशी भरपूर वेळ. थंडगार बियर घशातून शरीरात जाताना पेशीपेशीला एक हलका धक्का देत जाते, मेंदूच्या घट्ट बिजागऱ्यांत थोडं वंगण घालून सैल करते आणि मनांचे दरवाजे किलकिले करते. घोटागणिक मन सैलावतं, अस्वस्थतेचा अदृश्य बोळा निघतो आणि दुसऱ्या बाटलीच्या बुच्चासोबत फसफसून मनातल्या गोष्टी बाहेर पडायला लागतात. मनाच्या अथांग डोहातील शब्द मौत्तिके उधळू लागतात. तुला एक सांगतो... या धृवपदामागोमाग प्रत्येक प्याल्याबरोबर मनातली गुपितं, चिंता, काळज्या, वैताग यांचे अंतरे बाहेर पडतात... आणि माणूस हळू हळू मोकळा होतो. कोणाला गझल सुचते, कोणी कविता म्हणतं, कोणी हसायलाच लागतं, कोणाच्या जुन्या खपल्या निघून मग अश्रूंचा पूर लोटतो. पण गंमत खरी तेव्हाच असते. आपल्या रडणाऱ्या मित्राचं त्यावेळी ज्या शब्दात सांत्वन होतं, त्या कल्पकतेला तोड नाही.(हे सगळेच मान्य करतील). अशा वेळी साक्षात सरस्वतीच जिभेवर नृत्य करत असते.
    आता तुम्ही म्हणाल बियरच का? तर ते तर फक्त एक उदाहरण. मुख्य मुद्दा मन सैलावणं. विश्वाच्या जगड्व्याळ व्यापात परमेश्वराने माणसाला एवढी बुद्धी दिली, पण मन मोकळं करण्याची कला मात्र दिली नाही, (ज्याला ती साधली त्याने जग जिंकलं, बाकी तुमच्या आमच्यासारखे पामर) Freedom of expression आहे हो आपल्याला. पण ते वरवर! सगळंच प्रचंड भौतिक. आपल्याला नक्की काय वाटतंय हे आपल्याला तरी समजतं? (समजत असतं तर ही आध्यात्माची दुकानं एवढी चालली नसती. असो.) मग कसलं आलंय freedom of expression? जसं जसं जबाबदारी वाढते, माणूस मोठा होतो, भाव-भावनाचे विविध कंगोरे समोर येतात, अनेक गोष्टी मनात सलतात, अनेक मान-अपमान, चिंता, असुरक्षितता, व्यंगं, बीभत्सपणा, ताण-तणाव अपरिहार्यपणे समोर येतात. पण हे सगळं हाताळायचं कसं हे मात्र कोणी शिकवत नाही. उलट, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं म्हणून त्याचं उदात्तीकरण केलं जातं. (मग काय, freedom of expression घंटा!). आणि मग त्याचे परिणाम रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि बरंच काही!!
    एवढं सगळं होण्यापेक्षा मोकळे व्हा ना. आता परत मुद्दा बियरचा.. वा तत्सम पदार्थांचा. तर ही सगळी उदाहरणं. याचं मी काही उदात्तीकरण वगैरे करत नाही. बस महत्त्वाचं; विश्वासू आपल्या माणसासोबत घालवलेला वेळ. मग ती बियर असो, चहा असो किंवा पिझ्झा असो.

उदरात एकदा आहुती पडली की मुळात मन शांत होतं, यात मादक पदार्थ जरा लवकर काम करतात इतकंच. पण सख्या-सोबत्यांना घेऊन एकत्र केलेलं निवांत डिनर देखील तेवढंच परिणामकारक. मनाची दारं उघडणं गरजेचं. (My personal choice is still scotch). आणि त्यासाठी असा निवांत वेळ काढणंही...
- तेजाली शहासने.
29/04/2018

बुधवार, १ मे, २०१९

लिहीणं...

लिहीणं... फ़क्त एक क्रिया नाही, ती एक तपश्चर्या आहे. मन अणि बुद्धी यांच्या संगमातून मूर्त साकारणारं शिल्प आहे लिखाण. नुसतं मनात आणलं तर लिखाण होतंच असं नाही. सर्व व्यवधाने, प्रलोभने बाजूला ठेऊन, इतर विचलित करणाऱ्या गोष्टींवर मात करून जेव्हा एका ठिकाणी मांड ठोकून बसतो तेव्हाच लिखाण सिद्धीस जातं.
     खरंतर दिवसाच्या धबाडग्यात लिखाण स्फुरणारे असंख्य क्षण समोर येतात, काही क्षण तर पुन्हा पुन्हा येतात. मेट्रोची झोकदार वळणं, रोजचीच गडबड, समोरच्या कुंडीत नित्य नेमानं उमलणारं फुल, दिल्लीच्या रस्त्यांवर मनपूतं समाचरेत् आचरणाऱ्या खारी, एक न दोन कितीतरी! मनातल्या मनात, तो अनुभव शब्दांचं रूप घेउन व्यक्त होऊ पाहतो... पण लिहीत नाही तोपर्यंत ते अमूर्तच... अणि वेळीच त्यांना वाट मिळाली नाही तर त्यांचं विश्वर्पणमस्तु!!! मग आपण बसतो हात चोळत.. अरे तेव्हा ना.. काय मस्त सुचलेलं.. आत नाही आठवत.
आता हेच बघा माझ्या घराच्या खिडकीतुन मोठ्ठ बेलाचं झाड दिसतं. शनिवार रविवार त्यावरच्या खाराकुंड्या बघत बसणं माझा आवडता विरंगुळा आहे. आता ही बेलफळं पक्व झालीत. रोज एक एक बेलफळ पकडून त्याच्या देठाजवळ बसून या खारी ती बेलफळं कुरतडत असतात.

 प्रत्येक बेलफळावर एक, अशी रोज खारींची पंगत बसलेली असते. हल्ली पोपट त्यांच्या मदतीला येतो. त्याने फोडून अर्धवट टाकलेल्या बेलफळावर खारींचे पुढचे ३-४ दिवस अगदी सुखाने जातात. नुक्त फोडलेलं बेलफळ खाणारा पोपट पहायला मिळणं यासारखं सुख नाही. इथे दिल्लीमधे तर अगदी पुस्तकात दाखवलेल्या पोपटासारखे पोपट असतात. लाल भड़क चोच, हिरवागार रंग, त्यात काही लालसर रंगाची पिसं अणि त्याचा आयकॉनिक गळ्याभोवतालचा लाल चुटुक पट्टा... असा तो पोपट त्या फांदीवर बसून अगदी मेहनतीने बेलफळ फोड़त असतो. २-४ खारी आजूबाजूला बागडत असतात; बेलफळ फुटल्यावर त्यातून गळलेला रस खालच्या बेलफळावर पडून ते सूर्यप्रकाशात चमकत असतंच; अहाहा!!! मनातल्या मनात मी देवाचे आभार मानते.
     आमच्या पेणला कधी पोपट नव्हते, असले तरी पिंजऱ्यातले. त्यामुळे, अगदी नैसर्गिक अवस्थेतला निवांतपणे बेलफळ खाणारा पोपट पाहायला मिळण हे माझं अहोभाग्यच.
त्या झाडावर हुंदाडणाऱ्या खारी पाहून मनात नानाविध विचार येतात. पोपट, खारी, इतर पक्षी आणि ते झाड याचं सहजीवन जगण्याचा एक नवाच धडा शिकवतं. मनात अनेक विचार, व्यक्ती, गोष्टी, घटना, त्यांचे परस्परसंबंध, जग, विश्व, काम, तत्वज्ञान, अध्यात्म यांचा कल्लोळ चालू असतो. एक एक विचार आपापल्या पातळीवर दुसऱ्या विचाराशी भांडत असतो.
     मग त्यातून काहीतरी भन्नाट सुचेल असं वाटतं. मग मी म्हणते चला, आज लिहायचंच काही करून. मग पुन्हा समोर लक्ष जात तर खारुताई समोर एक छोटासा तुकडा मस्त पोज घेऊन खात असते,
बेलफळावरचा रस उन्हात मस्त चमकत असतो, बाजूला पोपटाचं जेवण चालूच असत. मग मनात येत, आधी फोटो काढू... मस्त फ्रेम आहे. लिखाण होईल नंतर.
मी आतल्या खोलीत जाते, कॅमेरा घेऊन खिडकीत येते setting करून कॅमेरा डोळ्याला लावेपर्यंत खारीचं खाणं संपलेलं असत, ढग आलेले असतात आणि पोपट दुसऱ्या पोपटीच्या मागे पानाआड दडून गेलेला असतो. आणि अशा रीतीने माझं लिखाण आणि माझा फोटो दोन्हीही ‘बोम्बलतात’.
- तेजाली शहासने. 

28/01/2018
हे फोटो माझ्या बहीणीने काढलेत.