इंद्रधनुष्य पेलण्याचे आव्हान 🌈🌈🌈🌈🌈🌈✌️
खूप लहानपणीची गोष्टं, मी पाचवी सहावीत होते. मी आणि आजोबा दोघेच घरी होतो आजोबा चहा करत होते. रस्त्यावर टाळ्यांचा आवाज ऐकू आला. कुतूहलाने मी खिडकीत गेले, टापटीपीने नेसलेल्या मळकट साड्या आणि गडद मेक अप केलेल्या काही पुरुषी बायका घराखालच्या दुकानदारांकडे पैसे मागत होत्या. त्यांना छक्के म्हणतात हे नंतर आजोबांनी सांगितलं. ठाण्याला राहायला आल्यावर सिग्नलला, रेल्वेत भीक मागणारे तृतीयपंथी बघून भीती वाटायची कि किळस नक्की सांगताच येणार नाही. त्यांचा एकूण अवतार, वागणं बोलणं, त्यांच्याबद्दलच्या दंतकथा... खूप वर्ष त्यांच्याबद्दल मनात भीतीच होती.
आज कलम ३७७ रद्द झालं ✌️✌️त्या निमित्ताने या सर्व घटना चटकन नजरेसमोर आल्या. आजचा दिवस संपूर्ण ‘LGBTQ’ जमातीसाठी खऱ्या अर्थाने ‘gay’ दिवस आहे. (ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी, गे चा एक अर्थ आनंदी असाही आहे). व्हिक्टोरीयन कायद्याच्या चौकटीतून बाहेर पडून, अनेक बाजूंनी चर्वितचर्वण होऊन, धर्मग्रंथ, संविधान, कायद्यांचा कीस पडून आज भा.दं. वि. कलम ३७७ सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलं. भारतातल्या एका मोठ्या वर्गाच्या मुलभूत हक्कांचा लढा सुफळ संपूर्ण झाला. अनेकांनी म्हटलं, आज स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटतंय. 👨❤️👨👨❤️👨 👩❤️👩👩❤️👩
पण भारतीय समाजासाठी ही एका नव्या युगाची, नव्या जाणीवा नेणीवांच्या प्रदेशातील प्रवासाची सुरूवात आहे. आता या समुदायाला कायद्याने मोकळेपणे भरभरून श्वास घेण्याची संधी दिली आहे. पण मुळात त्यांच्या अस्तित्त्वाचा स्वीकार हेच भारतीय समाजापुढचं फार मोठ आव्हान आहे. गेली अनेक वर्ष कळत नकळत भारतीय मनात पोसले गेलेले भयगंड, समजुती, अंधश्रद्धा यांची जळमटं कायद्याचा एका फटकाऱ्यानिशी काढून टाकता येणार नाहीत. प्रचंड आणि सातत्याने जनजागृती करूनच मनाची मशागत करणं शक्य होईल.
कायद्याने तर या इंद्रधनुष्याची दखल घेतली 🌈पण हे इंद्रधनुष्य समर्थपणे पेलण्याची, त्याचे चमकदार रंग अबाधित ठेवण्याची जबाबदारी आज प्रत्येक भारतीय व्यक्तीवर आहे. आणि हेच आज आपल्यासमोरच आव्हानही आहे.
साठाउत्तराची कहाणी पाचाउत्तरी सफळ संपूर्ण!🌈
तेजाली
६/०९/२०१८

Fantastic ... Keep going..
उत्तर द्याहटवा