शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

बहुभाषिकत्व आणि उद्योगवृद्धी

पूर्वप्रसिद्धी : वाणिज्य विश्व दिवाळी अंक 2022 
तेजाली चंद्रकांत शहासने 
 


(चित्र आंतरजालावरून साभार)   


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पंतप्रधानपदाची कारकीर्द सुरू केल्यानंतर ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला आणि भारतीय उद्योग जगतात नवसंकल्पना, नवनिर्मितीचं वारं खेळू लागलं. भारतीय उद्योगजगताचा प्रवासही आता ग्लोबल ते लोकल असा व्हायला लागला आहे. तर मग आपल्या व्यावसायिक वापरातही आपण जास्तीत जास्त प्रादेशिक, स्थानिक भाषांना प्राधान्य द्यायला हवं.

आता भारत ही 100 कोटी लोकसंख्येची एक मोठी बाजारपेठ आहे आणि मुख्य म्हणजे ही सर्व बाजारपेठ बहुभाषिक आहे. सन 2011 च्या आकडेवारीनुसार भारतात 22 अधिकृत भाषा आहेत आणि साधारण 57% लोक हिंदी बोलू शकतात. त्याखालोखाल बंगाली, मराठी, तेलुगु, तमिळ आणि पुढे अशी उतरंड आहे. या यादीत इंग्रजी सर्वांत शेवटी येते. इंग्रजी बोलू शकणारे लोक भारतात 10%च आहेत आणि तरीही आपण सर्वत्र इंग्रजीचा मुक्त वापर बघतो, जणूकाही आपण गृहितच धरतो की प्रत्येकाला इंग्रजी येतेच. उलट जपान, जर्मनी, फ्रान्ससारख्या देशांत जा, इंग्रजी औषधाला सापडणार नाही आणि यातून त्यांचं काहीच अडत नाही. याउलट भारतात तर व्यवसायात, नोकरीत उत्तम यश मिळवायचं असेल तर इंग्रजी आलंच पाहिजे असा जणू पायंडाच पडून गेलाय. मग ते इंग्रजी नीट यावं म्हणून आटापिटा! आपल्या मुलांना मातृभाषा सोडून इंग्रजी माध्यमात घालण्यापासून सर्व प्रयत्न आपण केले. पण इंग्रजी येतंय म्हणून कोणी छातीठोकपणे यशस्वी झाला आणि इंग्रजी नीट येत नाही म्हणून अयशस्वीच राहिला असं कधी झालंय का?

इंग्रजी न आल्यामुळे अनेक लोक महत्त्वाच्या माहितीपासून वंचित राहतात किंवा त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. यातूनच मग इंग्रजी शिकणं आज अपरिहार्य झालेलं आहे. आता भारतात एवढी भाषिक विविधता असताना अशी एकच भाषा वापरण्यास भाग पाडणं योग्य आहे का? समजा मराठी माणसाला मराठीतून, कानडी माणसाला कानडीतून माहिती मिळाली तर त्यांना किती आनंद होईल! भारतातली ही भाषिक परिस्थिती पाहता ‘ग्लोबल ते लोकल’चा प्रवास करताना आपल्या भाषेचा प्रवासही जागतिक भाषा (इंग्रजी) ते स्थानिक भाषा( मराठी, गुजराती, तमिळ, उडिया इ.) असा झाला, ग्राहकांना उद्योग उत्पादनांची माहिती प्रादेशिक भाषांत मिळायला लागली तर तो प्रवास भाषिक दृष्टीनेही ‘जागतिक ते स्थानिक’ असा होईल. हे कसं होईल, तर याची दोन उत्तरं आहेत, एक वैयक्तिक पातळीवरचं आणि एक औद्योगिक. त्याआधी एक छोटं उदाहरण देते म्हणजे माझा मुद्दा नीट समजू शकेल.  आजकाल प्रवास करण्याचं प्रमाण वाढलं आहे. दक्षिण भारतातले प्रवास करताना आपण थोडं बाचकतो. तसंच जपान,कोरिया, स्वीडन, नॉर्वे सारख्या देशातही जायला लगेच धजावत नाही, कारण भाषा. बंगलोरला राहायला गेलेल्या अनेकांना तिथली भाषा समजत नाही म्हणून बरेचदा कंटाळा येतो, घरची आठवण येते. एखादा पुढे जाऊन भाषा शिकतो आणि तिथे छान बस्तान बसवतो किंवा एखादा वैतागून दिल्ली, मुंबईतली किंवा बाहेर अमेरिका-युरोपतली नोकरी बघतो. न समजणाऱ्या भाषा सतत दिसण्याचा, त्या समजून घेण्याचा, कानावर आदळण्याचा, त्यांच्यासोबत संघर्ष करण्याचा ताण खूप जास्त असतो. ज्या संस्था, व्यक्ती हा ताण कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांना ग्राहक प्राधान्य देतात. म्हणजेच आपलं उत्तर आहे आपलं उत्पादन आपल्या ग्राहकाच्या भाषेत उपलब्ध करून देणं. एकेकाळी मोबाईल फक्त इंग्रजी भाषेतच असत, पण त्यानंतर हिंदी, मराठी भाषेत आलेल्या मोबाईलमुळे अगदी गावागावातल्या लोकांपर्यंत मोबाईल पोचला, त्यामुळे मोबाईल आणि मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या या दोन्हीचे ग्राहक वाढले. आज अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या जसं की अमॅझोन, फ्लिपकार्ट, गुगल, मायक्रोसॉफ्ट लोकलायझेशनचं धोरण ठेवून आपली उत्पादने मराठीत आणि इतर प्रादेशिक भाषांत सादर करत आहेत. अगदी औषधाच्या बाटलीच्या सूचनाही तुम्हाला हिंदी, जपानी, थाई, आणि इंग्रजीत एकत्र दिसतील. नव्या स्टार्टअप धोरणांमुळे मोठमोठी गुंतवणूक असणारे उद्योग उभे राहत आहेत ज्यांची स्पर्धा थेट या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी आहे. त्यामुळे उत्पादनांची माहिती स्थानिक भाषांत दिली तर उत्तम दर्जासोबतच भारतीयत्व आणि त्यातही आपल्याच भाषेत दिलेली माहिती हे घटक ग्राहकांना तुमच्या उत्पादनाकडे नक्कीच आकर्षित करतील. ग्लोबल ते लोकल या प्रवासात ग्राहकाला त्याच्या भाषेतून माहिती अर्थातच लोकलायझेशन हा उत्पादन आणि ग्राहक यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल. बदलत्या भारतीय बाजारपेठेत उद्योगधंदे, व्यापारी संस्था यांच्या बाबतीत बहुभाषिकत्व हे या प्रकारे अपेक्षित आहे. यात उत्पादनांची प्रादेशिक भाषांत माहिती यासोबतच बहुभाषिक कर्मचारी वर्ग, कॉल सेंटर्स, वेबसाईट्स, सांस्कृतिक समज, जाहिराती, कागदपत्रे इ. बाबी समाविष्ट करता येतील. अर्थात यात उत्तम लेखन आणि डोळस भाषांतर हे कळीचे मुद्दे, पण त्यासाठी उत्तमोत्तम लेखक आणि अनुवादक सहज मिळतील.

आज अनेकजण प्रादेशिक भाषेतल्या लेखनाला, अनुवादाला दुय्यम समजतात. त्यामुळे प्रादेशिक भाषेत काम करणाऱ्यांना मोबादलाही कमी मिळतो आणि त्यामुळे लेखकांचा इंग्रजीत काम करण्याकडे कल वाढतो. ही मोबादल्याची दरीही संपायला हवी. खरंतर प्रादेशिक लेखनामुळे तुम्हाला तुमचा आयुष्यभराचा बांधील ग्राहक मिळणे संभाव्य होईल. अशा रीतीने बहुभाषिकत्वाच एक धोरण म्हणून राबवलं तर संस्थेच्या विकासासोबतच लोकलायझेशन उद्योगालाही चालना मिळून रोजगरनिर्मिती होईल आणि भाषा संवर्धनही होईल. बोलणाऱ्याची माती विकली जाते नाही बोलत त्याचं सोनही विकलं जात नाही, बरोबर ना? म्हणजे नोकरी धंदा उत्तम करायचा तर बोलायला हवं, विचारात स्पष्टता हवी, उद्योजकता कल्पकता हवी आणि दृढ आत्मविश्वास हवा. मग भाषा कोणतीही असो, तुमचं उत्पादनच तुमच्यासाठी बोलतं. सांगण्याचा मुद्दा हा की या नव्या बदलत्या उद्योगविश्वात आपण इंग्रजीच्या पलिकडेही इतर भाषांचा मग त्या प्रादेशिक किंवा परदेशी असो विचार करायला हवा.

संस्थात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर आता वैयक्तिक दृष्टीने बघू. भारतात प्रत्येक व्यक्ती ही कमीतकमी द्विभाषक आहेच. महाराष्ट्रात जन्माला आलेला माणूस मराठी, हिंदी तर आपसूक शिकतो. इंग्रजीही शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणातून शिकली जाते. गुजराती, मारवाडी शेजारीपाजारी किंवा व्यापारी संबंध असतील तर तीही जमते. व्यापारी वर्गासाठी बहुभाषिकत्व नवीन नाही. वर्षानुवर्षे देशोदेशी, गावोगावी व्यापाऱ्यांचे तांडे फिरत, कामाच्या शोधार्थ स्थलांतर होत असे, युद्धे होत तेव्हाही स्थलांतर होत असे. यातून लोक त्या त्या प्रदेशातली भाषा आत्मसात करत. आज अनेक देश नागरिकत्व किंवा व्हिसा देताना त्या देशाची भाषा येणे अनिवार्य करतात. पण फक्त परदेशात राहण्याच्या संधी एवढाच बहुभाषिकत्वाचा फायदा नाही. विविध भाषा येत असल्याने एक उत्तम सामाजिक वर्तुळ तयार होतं जे माणसाच्या सामाजिक विकासासाठी पूरक ठरतं.

बहुभाषिकत्वाचा व्यावसायिक जीवनात काय उपयोग? सर्वसाधारपणे आपली भाषा ज्याला येते किंवा समजते त्याच्याकडे माणसाचा नैसर्गिक कल असतो. अशांशी व्यापारी किंवा भावनिक संबंध जोडणे, विश्वास ठेवणे माणसाला सोपे जाते, तसंच माहितीची, संदेशांची देवाणघेवाण, वाटाघाटीही सोप्या होतात आणि त्यामुळे व्यवसाय-व्यापार करणे सोपे जाते. म्हणजेच ती ती भाषा येणाऱ्या लोकांसोबत तुमच्या व्यवसायाच्या संधी वाढतात. हा मुद्दा भारतीय आणि परकीय दोन्ही भाषांसाठी सारखाच लागू. विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की बहुभाषिक लोक अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करू शकतात. दूसरा मुद्दा सांस्कृतिक बुद्धिमत्ता. आज आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतो किंवा बहुभाषिक ठिकाणी काम करतो तेव्हा नकळतपणे कोणाच्या भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्याबद्दल सहिष्णू असणं हा एक उपाय. पण आपण एखादी भाषा शिकतो तेव्हा त्या प्रांताची संस्कृतीही शिकत असतो. एक छोटसं उदाहरण, एकदा माझ्या ऑफिसातल्या एक तामिळी सहकाऱ्याला मी सहज म्हणाले की तुमची लिपी सगळी जिलेब्यांसारखी दिसते तर त्याने खूपच मनाला लावून घेतलं. मला जर तमिळ येत असती तर कदाचित हा प्रसंग टळला असता.

मगाशी मी अनुवाद आणि लोकलायझेशनचा मुद्दा मांडला. यात भारतीय आणि परकीय भाषांत अनेक संधी आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आज भारतात येत आहेत, अनेक देश भारतात गुंतवणूक करत आहेत. यांना भारताच्या विविध प्रांतात अगदी कानाकोपऱ्यात पोचण्यासाठी बहुभाषिक कर्मचारी वर्गाची गरज लागते. स्थानिक भाषा येणं ही अशा ठिकाणी जमेची बाजू ठरते. वरिष्ठ व्यवस्थापनातल्या लोकांनाही अनेक भाषा येत असल्याचा खूप फायदा होतो. कर्मचाऱ्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधून त्यांच्या भावना योग्य रीतीने समजावून घेता येतात, व्यावसायिक वाटाघातीतही याचा चांगला उपयोग होतो. इंग्रजी न वापरणारेही अनेक देश आहेत. या देशांतील लोकांसाठी दुभाषा म्हणून काम करूनही उत्तम पैसे कमावता येतात. अनेक कंपन्यांत दुभाषा, अनुवादक ही पदे असतात. जपानी, जर्मन, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश अशा भाषांत या संधी उपलब्ध असतात. लोकलायझेशनचं धोरण अनेक कंपन्या सध्या राबवत आहेत. त्यांनाही उत्तम अनुवादक आणि ती ती भाषा येणारे जाणकार आवश्यक असतात. हे लोकलायझेशन परकीय आणि भारतीय अशा दोन्ही भाषांत होते. सध्या भारतात मराठी, हिंदी, तमिळ तेलुगु पासून ते डोगरी, बोडो सोबतच अगदी हिंग्लिशमध्येसुद्धा लोकलायझेशन केले जाते. त्यामुळे प्रादेशिक भाषांतही संधी आहेत. अनुवादित पुस्तकांची बाजारपेठ मोठी आहे. मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅच्युरल लॅंगवेज प्रोसेसिंग या क्षेत्रात सध्या अनेक भाषांवर काम चालू आहे. भाषा उत्तम प्रकारे अवगत असलेली बहुभाषिक व्यक्ती इथे उत्तम रीतीने काम करू शकते.

भारतासारख्या बहुभाषिक खंडप्राय देशात प्रादेशिक भाषा शिकण्यावरही आपण भर द्यायला हवा. शाळेत आपल्याला फ्रेंचचा पर्याय असतो आपण गुजराती, कानडी शिकायची असेल कुठलीच औपचारिक व्यवस्था उपलब्ध नाही. उलट विविध प्रांतात भाषेच्या आधारे तेढ पसरवली जाते. बहुभाषिकतेमध्ये भाषिक सौहार्द हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण जर्मनीला जायचं तर जर्मन शिकतो, मग बंगलोरला, चेन्नईला जायचं तर कानडी किंवा तमिळ शिकतो? किंवा इथे आलेला माणूस मराठी शिकतो का, त्यासाठी एखादी शासकीय व्यवस्था आहे? असे घडले तर परप्रांतात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आयुष्य किती सुखकर होईल! भारताच्या भाषिक एकात्मतेसाठी हे महत्त्वाचं आहे. बहुभाषिकता हे भारताचं वैशिष्ट्य आहे. आपण दर वेळी इंग्रजी-हिंदी गृहीत धरण्यापेक्षा विविध प्रांतात नोकरी धंद्यासाठी जाताना स्थानिक भाषा कामापॉरती जरी शिकली तरीही हळूहळू संपूर्ण भारतात सर्व भारतीय भाषा पसरतील. याचे आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक फायदे तुम्हाला नक्की मिळतील. व्यापारी संस्थांनीही बहुभाषिकतेचा हा नवा दृष्टिकोन लक्षात घेऊन काम केल्यास त्यांना व्यवसायात यश मिळेलच पण त्याच बरोबर संतुष्ट ग्राहक आणि एक जबाबदार उद्योग म्हणून ख्यातीही वाढेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा