तेजाली चं. शहासने-
पाऊस आणि ढगांचं नातं अतूट. पावसाची वर्दी मिळणार ती ढगांकडूनच आणि त्यांच्या रंगा, ढंगावरून पावसाचा मूडही कळणार. एवढं महत्त्व ढगांचं. या पावसाळ्यात गोष्ट सांगणार आहे मेघस्य आलय: इति मेघालय| असं ज्याच वर्णन केल जात त्या मेघालयाची...
हिमालय म्हटलं की आपल्याला बर्फ आठवतो. तसंच मेघालय म्हटलं की मला ढग आठवतात, नागा, गारो, खॉंसी आणि जैंतीया या डोंगररांगांवरून हुंदडणारे. हिमालय जर तपस्वी वाटत असेल तर मेघालयातल्या या डोंगररांगा, हिरवकंच शेला लपेटलेला लेकुरवाळा बाप वाटतात मला. आपल्या अंगाखाद्यावरच्या समृद्ध जैवविविधतेतून इथल्या मानवावर मनसोक्त उधळपट्टी करणारा बाप! म्हटलं तर, इथे वर्षभर पाऊस पडतो. आपल्या सह्याद्री काही कमी नाही, पण पावसाळ्यातला, हिरवागार सह्याद्री उन्हाळ्यात सुकून जातो, मलूल होतो, डोंगर उघडे बोडके पडतात.
मेघालयाला हा पिवळा रंग ठाऊकच नाही. हिरव्या रंगाच्या १०० छटा पाहायला तुम्ही मेघालयात जा. सतत कॉम्प्युटरच्या पडद्यावर भिरभिरुन थकलेले तुमचे डोळे इथे निवतील. इथला पाऊस अंगाअंगात भरून घ्या, गात्र तृप्त होतील.
अगदी त्याचा कहर अनुभवायचा असेल तर भर जुलैमध्ये जा. समोरचे ढग तुम्हाला गाडीतून काय, चालतही दोन फुटांपुढे हलू देणार नाहीत. खरं तर, हे ढग नसतातच. ते असतात ‘जलद’. ढगाचा कण न कण पाण्याने संपृक्त होऊन त्या भाराने झुकालेले. ते जीवनाचं दान भरभरून देण्यासाठी आसुसलेले. पावसाळ्यात मेघालयात निसर्गाच्या रोमारोमात फक्त पाऊस भरलेला दिसेल. आणि ते जीवनाचं दान प्राशून तुम्ही समृद्ध व्हाल.
आता तिथे जाण्याचा ऋतू, एप्रिल ते जून सर्वांत उत्तम, पण माझ्या मते हिवाळा; कारण तोपर्यंत पाऊस तसा कमी होतो. तिथले धबधबे मस्त धबधबत असतील, तिथल्या लवण स्तंभांच्या प्रचंड गुहा पाहताना अचानक ढग किंवा पाऊस येऊन तुम्हाला घाबरवणार नाहीत, तिथले जीवंत मूलसेतू पाहायला जाताना चिखलाचा त्रास होणार नाही.
तिथलं एक मोठं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे #उमनगोट नदी. आरपार, तिच्या तळाचा ठाव घेणारे फोटो तुम्ही पाहिले असतील. ते खरोखर अनुभवायचं असेल तर खरंच हिवाळ्यात जा. कारण पाऊस कमी झाल्याने डोंगरातून नदीत वाहून येणारी वाळू कमी होते, नदी शांत होते, तळ निवळतो. पण इतर वेळी सुद्धा कधीही गेलात, तरी ती तुम्हाला आनंदीतच करते. आजोळी आलेल्या लेकरांसारखी! छोट्याशा बोटीतून नावाडी तुम्हाला तिथल्या एका बेटावर नेतो. तिथे पाण्यात खेळा, दगडांचे किल्ले करा, तासभर शांत बसा, आजूबाजूचे डोंगर बघा, हवं ते करा. तुम्ही गप्पीष्ट असाल तर तो नावडी तुम्हाला तिथल्या गोष्टी सांगेल. कोळशाच्या वाहतुकीबद्दल सांगेल, वाळूच्या अवैध तस्करी बद्दल, माणसांच्या अवैध येण्या जाण्याबद्दल सांगेल. अरे, हे मधेच काय अवैध आलं? सांगते.. तर, जिथे या उमनगोट नदीला तुम्ही भेटता ते ठिकाण आहे डाउकि. भारत आणि बांगलादेशाच्या सीमेवरच शेवटचं गाव. सील्हेट जिल्हा आठवतोय? फाळणीच्या वेळी हा जिल्हा बांग्लादेशात गेला. शतकानुशतकांचा शेजार एका अदृश्य रेषेने दुभागला. इथून हा सील्हेट जिल्हा आणि बांग्लादेशाची हद्द सुरू होते. मेघालयाच फिरताना, वळणावळणांतून इतिहास हा असा अचानक समोर येतो.
या अदृश्य रेषेला दृश्य स्वरूप देण्याचं, कुंपण घालण्याचं काम मी गेले तेव्हा सुरू झालं होतं. याला अनेकदा विरोधही झालाय. हे काम किचकट देखील आहे. इथे भारत-बांग्लादेश सीमा डोंगरा-वनांतून, नदीतून जाते. यामुळे, शतकानुशतके इथे राहणारे स्थानिक, आता आडवाटा काढत या देशातून त्या देशात ये-जा करतात. मित्रांना, नातेवाईकांना भेटतात, लग्नं होतात, सगळं काही यथासांग चालू असतं. उमनगोट नदीचं डाउकिमधलं पात्र प्रचंड मोठं आहे. डोंगरातून उत्तम प्रतीचा गाळ वाहून येतं असल्याने नदीतील वाळूच्या विक्रीचे कामही जोमत चालते. पण त्यालाही तस्करीची काळी किनार आहेच. ही भूलभूलय्या असणारी हद्द आणि तिचा सोयीस्करपणाच आज मेघालयाच्या मुळावर उठलाय...
(क्रमश:)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा