रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

मेघालय - भाग २

तेजाली चं. शहासने

मेघालयची राजधानी शिलॉंग. शिलॉंग शहर इतर कुठल्याही राजधानीच्या शहरांसारखंच. गजबजलेलं. मोठी गर्दीची बाजारपेठ आहे, हॉटेले आहेत, दुकानं आहेत. मोठमोठ्या बेकरीज आहेत. सिक्कीमच्या तुलनेत इथे दारू पिण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. बरीचशी लोकसंख्या कर्मठ ख्रिश्चन असल्याचा परिणाम, असं आमच्या ड्रायव्हरने सांगितलं. शहराच्या उंच सखलपणामुळे इथे रिक्षा नाहीत तर टॅक्सीज आहेत, त्याही मारुती ८००. व्यवसायासाठी खूप स्वस्त पडतात. अर्थात ही ३ वर्षांपूर्वीची गोष्ट.
तिथली उच्च न्यायालयाची इमारत दृष्ट लागण्याजोगी आहे. माझी बहीण वकील असल्याने ती बघणं हे आमच्या प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत होतं. शिलॉँगमधेच काही संग्रहालयंही आहेत. कॅप्टन संगमा संग्रहालयात मेघालयाची वीरगाथा मांडलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इतर भारतप्रमाणे या भागानेही खूप सोसलं. काटक, लढाऊ जमातीची आख्खी पिढी ब्रिटिशांच्या गोळ्यांना बळी पडली. अर्थात बंदुकीच्या गोळ्यांपुढे भाले आणि तलवारींचा काय निभाव लागणार? तिरोट सिंग या त्यांच्या राजाचं तैलचित्र आणि स्मारक तिथे आहे. १८२९ ते १८३३ या कालावधीत हा राजा आपल्या प्रजेला स्वतंत्र ठेवण्यासाठी झुंजला. “यापेक्षा स्वतंत्र राजा म्हणून मरेन” असं म्हणत मृत्यूला सामोरा गेला. इथे एक फुलापाखरांचं संग्रहालय देखील आहे. डॉन बॉस्कोचं सांस्कृतिक संग्रहालय तर अप्रतिम आहे, सप्तभगिनी प्रदेशातील संपूर्ण लोकजीवन, संस्कृती, त्यांचा इतिहास अतिशय बारकाव्यांसह इथल्या वेगवेगळ्या मजल्यांवर मांडलेला आहे. याच्या गच्चीवरून संपूर्ण शिलॉंगचं नयनरम्य दृश्य दिसतं.
इथल्या माणसाचा मूळ धंदा शेतीच. पण वाढत्या पर्यटनामुळे इथे अनेक उद्योग वाढीस लागलेत. त्यामुळे व्यावसायिक गरजांसाठी इथे आसाम, पश्चिम बंगाल मधून लोक रोजगारनिमित्त येतात. इथल्या भाषेला स्वत:ची लिपी नाही, लिखणासाठी रोमन लिपी वापरली जाते. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाषेची अडचण येऊ शकते. स्थानिक विरुद्ध स्थलांतरित संघर्षाची झळ या टुमदार शहराला बसलीये. अवैधरीत्या भारतात आलेले बांग्लादेशी इथे सहज मिसळून जातात. त्यामुळे रोजगराचा इथे तुटवडा निर्माण झाला आहे. इथे कोळसाही मुबलक मिळतो. इतका की, इथल्या खाण मालकांची मुलं सरसकट परदेशात नामवंत विद्यापीठात शिक्षण घ्यायला जातात, असं आमच्या टॅक्सीवाल्याने सांगितलं. हा कोळसा, ही रेती मेघालयाचं सौन्दर्य घुशीसारख पोखरतीये. त्यातून येणारी सुबत्ता सामान्य जनतेपर्यंत झिरपत नाहीये.


मेघालय पहायचं असेल तर भरपूर प्रवासाची तयारी हवी. अगदी राज्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत. सप्तभगिनी प्रदेशातल्या कुठल्याही राज्यात भटकायचं असेल तर ते आलंच. कारण एक तर हे भाग डोंगराळ आहेत, त्यामुळे बराचसा प्रवास रस्त्यानेच करावा लागतो. गुवाहाटी, बाघ डोगरा हे तिथले महत्त्वाचे विमानतळ. इतर राज्यांत विमानतळ असले तरी उड्डाणाची वारंवारता त्या मानाने कमी आहे आणि थेट फ्लाइट्स जास्त नाहीत. मेघालय हिंडताना दिवसचा दिवस प्रवास करायची तयारी ठेवा.
मी गेले तेव्हा दिल्लीहून गेलेले. दिल्ली ते गुवाहाटी विमान आणि तिथून शिलॉंग गाडीने. भल्या पहाटेची फ्लाइट मला खरं तर आवडत नाही. मी अक्षरक्ष: झोपळलेले. पण या प्रवासात एक गोष्ट मी विसरलेलेच. दिल्लीहून गुवाहाटीला उडताना मधे नगाधिराज हिमालय लागतो. एक डुलकी झाल्यावर खाली नजर टाकली, दूरवर सूर्यकिरणांत हिमालय चमचमत होता. त्या दृश्याने माझी सकाळ सोनेरी केली.
काही वर्षांपूर्वी दार्जिलिंगला गेलेले तेव्हा भल्या पहाटे उठून कांचनगंगा बघायला गेलेले. पण नेमकी तेव्हा ती लाडात येऊन ढगांच्या आड लपून बसली, मात्र तो गुलाबी सोनेरी हिमालय मनात घर करून गेला. हिमालयाचं हे चमचमतं सोनेरी रूप अनपेक्षितपणे माझ्या समोर साकार झालं, तेही अत्यंत अमर्याद, लांबच लांब. नजर जाइस्तोवर आडवा हिमालय पसरलेला. जणू सांगत होता, तिकडे पाहिलंस ते तर माझ टीचभर रूप...चल, तुला विश्वरूप दर्शन घडवतो. अशा वेळी खरंतर सूर्यकिरणांचा अभिषेक वगैरे कल्पनाही थीट्या पडतात. कुणीतरी तप्त सोन्याचा रस हिमालयाच्या शिखरांवर ओतावा आणि त्या हिमावरून ओघळत तो हळूहळू थिजून त्याचा सुवर्णलेप बसावा अशा त्या हिमालयाच्या रांगा दिसत होत्या. नाखुषीनेच घेतलेली सकाळची फ्लाइट, न मागता मिळालेली डाव्या बाजूची सीट आणि मोक्याच्या क्षणी डुलकीतून आलेली जाग... एकसमयवच्छेदेकरून. अशा घटनांना मी खरंच दैवी समजते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा