मुलाखतीसाठी इंग्रजी
भारताचा भौगोलिक विस्तार खूप मोठा आहे. व्यवसायाची
केंद्रे दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, कलकत्ता अशी भारतभर
पसरलेली आहेत. त्यामुळे आपसूकच बहुभाषिकतेवर उतारा म्हणून भारतात इंग्रजी भाषा या
विविध प्रांतातील विविधभाषी लोकांना जोडण्याचं काम करते. त्यामुळेच
इंग्रजीच महत्त्व व्यावसायिक जीवनात अतिशय वाढलेले दिसते. इंग्रजी येत नाही, नीट
बोलता येत नाही म्हणून अनेकांच्या मनात न्यूनगंड असतो आणि त्यामुळे चांगल्या संधी
हातातून जातात किंवा त्या घेण्याचा आत्मविश्वास लोकांकडे नसतो.
पण इथे एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा
आहे तो म्हणजे आत्मविश्वास आणि आपले आपल्या विषयातील सखोल ज्ञान. इंग्रजी ही एक
भाषा आहे. तुमचे विचार, ज्ञान तुम्ही समोरच्यापर्यंत पोचवण्याची संधी ही भाषा
तुम्हाला प्राप्त करून देते. त्यामुळे इंग्रजीचा बाऊ करण्यापेक्षाही आपले ज्ञान,
स्पष्ट विचार, आणि सहज संभाषण कौशल्य यावर उत्तम पकड कशी येईल याचा विचार आधी करणं
आवश्यक आहे. योग्य रीतीने संवाद साधणं, आपले विचार योग्य प्रकारे मांडता
येणं हे मुलाखतीसाठी आवश्यक असतं. संभाषण कौशल्य उत्तम
असेल तर इंग्रजीतूनही उत्तम मुलाखत तुम्ही देऊ शकाल.
खास मुलाखतीसाठी म्हणून इंग्रजीची तयारी करताना खालील
गोष्टी महत्त्वाच्या. हे मुद्दे लक्षात घेऊन त्यासंबंधीत शब्द, वाक्यरचना, संभाषण
इंग्रजीतून करण्याची तयारी केलीत तर मुलाखतीस
तुम्हाला आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल. :
इंग्रजी भाषा सुधारण्याच्या दृष्टीने :
मुलाखतीत काही विशिष्ट प्रश्न आवर्जून विचारले जातात. उदा.
तुमच्याबद्दल सांगा किंवा तुम्हाला ही नोकरी का हवी? या प्रश्नांना तुम्ही दिलेल्या उत्तरांवर मुलाखातीची
दिशा ठरते. अशा
काही ढोबळ प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आधीच इंग्रजीत तयार करता येतील. ती करा आणि
त्याबद्दल संभाषण करायचा सराव करा. आणखी काही उदाहरणे खालील प्रमाणे
१. योग्य अभिवादन आणि स्वत:ची ओळख करून देणे -
मुलाखतीची वेळ, व्यक्तीचा
हुद्दा, इ.
लक्षात घेऊन नमस्ते, good morning, good afternoon, किंवा hello म्हणून अभिवादन करता
येईल. त्यानंतर स्वत:ची माहिती सांगा. ही सर्व माहिती इंग्रजीतून सांगण्याचा घरी
सराव करा. हे बोलताना आपल्या आवाजात नम्रता आणि आत्मविश्वास असू द्या. ही ओळख
अतिशय महत्त्वाची असते. साधी सोपी वाक्यरचना ठेवा. अकारण शब्दबंबाळ बोलू
नका. पाल्हाळ लावू नका. तुमचे शिक्षण, पार्श्वभूमी, अनुभव, छंद इत्यादि माहिती
यात देता येते.
२. तुमचा आतापर्यंतचा अनुभव – याबद्दल माहिती देताना साधारण
किती वर्षांचा अनुभव आहे हे सांगून पुढे तुमच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या घटना,
प्रकल्प, त्यातून तुम्ही काढलेले निष्कर्ष अशा विविध बाबी बोलता येतील.
३. त्या-त्या क्षेत्राशी संबंधित कळीचे मुद्दे –
तुमच्या क्षेत्राशी संबंधित ताज्या घडामोडी, कायदे, त्याबद्दल तुमचे मत,
दृष्टीकोन, त्यासंदर्भात तुम्ही केलेले काम किंवा काम करण्याची इच्छा याबद्दल
तुम्हाला इंग्रजीतून बोलता येणे आवश्यक आहे.
४. तुमच्या कामाशी संबंधित विशिष्ट शब्दसंग्रह, संज्ञा आणि तांत्रिक
माहिती – मुलाखत देताना योग्य मुद्देसूद उत्तरांसोबतच खास त्या
क्षेत्रातल्या संज्ञा, शब्दप्रयोग तुमच्या बोलण्यात यायला हव्यात. असे शब्द शोधून
ते संभाषणात विविध प्रकारे वापरण्याचा सराव करा. साधारण त्या त्या व्यवसायाची एक
स्वतची भाषा असते. ती भाषा आत्मसात करा.
५. औपचारिकता – औपचारिकता हे
मुलाखतीतले खूप महत्त्वाचे अंग आहे. आपल्या वागण्या-बोलण्यातून औचित्याभंग होणार
नाही, सर्वांचा आणि स्वतचाही मान राखला जाईल याची सर्वतोपरी काळजी घ्या. अनेकांना
बोलता बोलता अपशब्द वापरण्याची सवय असते. पाय हलवणे, केस खाजवणे अशा सवयी असतात.
इंग्रजी बोलण्यातही अकारण शीट, ब्लडी असे शब्द किंवा अकारण शब्दांची लघुरूपे
वापरण्याची सवय असते, याह, यु नो, सो असे शब्द सारखे मधेमधे वापरायची सवय असते. तुम्हाला
अशा सवयी असतील तर मुलाखतीत त्या दिसणार नाहीत याकडे लक्ष द्या.
मुलाखतीसाठी वरील मुद्यांची माहिती इंग्रजीत सांगण्याचा
सराव केलात तर मुलाखत देणे कठीण जाणार नाही. इंग्रजीतून बोलण्याचा सराव तुमच्या
घरातले किंवा मित्र-मैत्रिणींसोबत करा, मॉक इंटरवयूचा सराव देखील तुमचे
संभाषण सुधारेल.
व्यावसायिक प्रकारचे इंग्रजी बोलता येण्यासाठी तसा
शब्दसंग्रह अतिशय आवश्यक. त्यासाठी खास तुमच्या क्षेत्रातील व्यावसायिक प्रकाशने
नक्की वाचा. नसेल जमत तर कमीत कमी एक चांगले इंग्रजी वृत्तपत्र, पुस्तके, ब्लॉग्स वाचता येतील.
उत्तम इंग्रजी मुलाखती ऐका. अनेक उद्योजक, यशस्वी विद्यार्थी, शास्त्रज्ञ यांच्या
मुलाखती विविध माध्यमांवर उपलब्ध आहेत. या ऐकून इंग्रजीतील संवाद कसा करायचा, शांतपणे उत्तर कसं
द्यायचं, योग्य
शब्द निवड कशी करायची हे शिकता येईल.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमचे
ज्ञान, अभ्यास
आणि स्वत: वरचा आत्मविश्वास कायम ठेवा. इंग्रजी हे फक्त एक माध्यम आहे. ते
प्रभावीपणे वापरा. मुलाखतीत इंग्रजी थोडं चुकलं तुमची मांडणी आणि अभ्यास चुकवू
नका. आत्मविश्वास कायम ठेवा.
मुलाखतीला जाताना लक्षात
घेण्याच्या काही सर्वसाधारण बाबी खालीलप्रमाणे :
1. उत्तर देताना
मुलाखतकाराकडे पाहून, शक्यतो
नजरेस नजर देऊन उत्तर द्या. यातून तुमचा आत्मविश्वास दिसतो. मात्र नजरेत
अहंकार, मग्रुरी दिसणार नाही याची काळजी घ्या. खाली पाहून उत्तर देऊ नका.
2. मुलाखतीस जाताना
नीटनेटके जा. तुमच्या व्यवसायास साजेसे योग्य मापाचे, शक्यतो सौम्य रंगाचे,
स्वच्छ कपडे कपडे घाला. केस नीट विचारलेले, नखे स्वच्छ, नीट कापलेली, वाढवलेली
असल्यास त्यांची निगा राखणे आवश्यक. शक्यतो दाढी करून जा, दाढी राखलेली असल्यास ती
नीटनेटकी असावी.
3. हलकासा
मेकअप तुम्हाला नीटनेटके दिसण्यास मदत करतो. पण तो आवश्यक आहेच असे नाही. तुम्हाला
घाम जास्त येत असल्यास, बराच प्रवास करून मुलाखतीस जायचे असल्यास डिओ अवश्य वापरा.
सुगंधाने मनही प्रसन्न होते. मात्र उग्र वासाच्या अत्तरांचा वापर टाळा. आपले
व्यक्तिमत्व प्रसन्न आणि नीटनेटके असणे आवश्यक आहे.
4. आभूषणे
मर्यादित ठेवा. मुलाखत देताना तुमच्या आभूषणांमुळे मुलाखतकाराचे लक्ष विचलित होणार
नाही याची काळजी घ्या. घडयाळ आवर्जून वापरा.
5.
ज्या संस्थेत मुलाखतीसाठी जात आहात आणि ज्या कामासाठी मुलाखत आहे
त्याची पूर्ण माहिती घ्या. संस्थेची तत्वे, धोरणे, सद्यपरिस्थिती, साधारण इतिहास
याचा अभ्यास केला तर त्या अनुषंगाने तुम्ही योग्य उत्तरे देऊ शकता. शक्य झाल्यास
आपल्या मुलाखतकाराबद्दलही माहिती घ्या. त्याने केलेल्या कामाची उदाहरणे तुम्ही
मुलाखतीत वापरली तर त्यातून तुमची सखोल अभ्यास करण्याची आणि माणसे जोडण्याची
वृत्ती दिसून येते. कुठल्याही संस्थेत व्यक्तिगत संबंध खूप महत्त्वाचे असतात. प्रत्येकाशी
व्यक्तिगत पातळीवर जोडले गेल्यास तुम्ही त्यांच्या चांगले लक्षात राहता.
- तेजाली चंद्रकांत शहासने


