रविवार, १० जुलै, २०२२

जेव्हा मला विठ्ठल भेटला ...

चित्र - आंतरजालावरून साभार   
 

पंढरपुरी, युगे अठ्ठावीस हात कटीवर ठेवून, विटेवर उभा राहून, या विश्वाचा जगडव्याळ व्याप शांतपणे पाहत आहे पांडुरंग! कोणाचा विठू, कोणाचा विठोबा, कोणाची विठू माऊली, कोणाचा सखा पांडुरंग तर कोणाचा पंढरीनाथ... असा हा, सर्व जातीधर्म, नाती, लिंगभेद आणि स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून या सर्व चराचराला व्यापून उरणारा पांडुरंग...आणि त्याच्या ओढीने दर वर्षी पायी वाट तुडवत पंढरपुरची वारी करणारे वारकरी. गेली आठ-नऊ शतके त्या विठू माऊलीच्या चरणाशी तादात्म्य पावत एकरूप होऊन, प्रत्यक्ष उदहरणानेच अद्वैताचे तत्त्वज्ञान सांगत, समाजातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, अज्ञान दूर करण्याचे काम या वारकरी संप्रदायातील संत करत आहेत. असा संप्रदाय जगाच्या पाठीवर विरळाच. 'एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात. त्यापुढे जाऊन मी म्हणेन 'एक तरी वारी अनुभवावी'. खरंच, कधीतरी सहज एखाद्या दिंडीत एखाद्या वारकाऱ्याबरोबर चालून बघा, त्याची विठ्ठलाची ओढ एवढी की तुम्हाला त्याच्यामागे धावावं लागेल. एखाद्या माऊलीला सहज विचारून बघा, कितवी वारी मावशी? तीला कदाचित आकडा आठवणारही नाही; पण ती तुम्हाला वेगवेगळ्या रूपात भेटलेल्या विठू सावळ्याच्या गोष्टी नक्की सांगेल. कधी तो तीला शिवारात भेटला असेल, कधी बाजारात जड टोपली उचलताना कोणीतरी पुढे केलेल्या हातात भेटला असेल. कोणाला अगदीच हाता-तोंडाशी आलेलं पीक जातंय की काय झालेलं असताना बरसलेल्या पावसात भेटला असेल. कोणाला शेवटची बस निघून गेल्यावर अवचित भेटलेल्या फटफटीवाल्याच्या रूपात भेटला असेल. असा हा पांडुरंग, श्रद्धा असेल त्याला फुला-पानांत, जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी तो सापडतो आणि मग तो वारकरी गाऊ लागतो कांदा, मुळा, भाजी| अवघी विठा बाई माझी| लहानपणापासून ही संत परंपरा पाहत मी मोठी झाले. माझे बाबा दासबोध वाचत, आजी कलावती आईंची भजनं गात असे. पुण्यात आल्यावर पहिल्यांदा वारी जवळून पाहिली. वारकरी पाहिले. तो अफाट जनसमुदाय एकाच ओढीने पुढे जाताना पाहणं ही देखील एक वेगळीच अनुभूति होती. पण आत कुठेतरी रितं रितं वाटायचं. कधी आपल्याला भेटेल का पांडुरंग? एवढी भक्ती, एवढी ओढ आपल्यात कधी येणार? नंतर नंतर तर “आपल्याला का नाही भेटत पांडुरंग?; आपल्यालाच का नाही भेटत? तो तर केवढा साधा भोळा, थोड्याशा भक्तीनेही प्रसन्न होणारा.. मग का नाही? या प्रश्नांची उत्तरं शोधताना अनेक वर्षं गेली. एके दिवशी रिकाम्या वर्ड फाईलकडे पाहत काहीतरी लिहायचा विचार करत होते. एकीकडे ‘कानडा राजा पंढरीचा... ’ वाजत होतं; काहीतरी डोक्यात होतं पण शब्दच सापडत नव्हते. त्या कल्पनेचं टोक काही हातात येत नव्हतं. काहीतरी अव्यक्त, निराकार असं डोक्यात घुमत असताना ओळी ऐकू आल्या निराकार तो निर्गुण ईश्वर| असा प्रकटला कसा विटेवर| आणि... आणि या ओळींनी माझ्या आयुष्यात युरेका क्षण आणला. अरेच्चा... एवढी वर्षं अनेक अमूर्त, निराकार कल्पना आपण शब्दांत पकडून या कागदावर, विटेवर साकार करून लिहिल्या की! जणू तो ईश्वर जो अद्वैत आहे, अमूर्त, निराकार, निर्गुण आहे, जशा माझ्या मनातल्या संकल्पना आहेत; त्याच कागदावर शब्दांच्या रूपात उमटल्यात... त्या विठू माऊलीने... पांडुरंगाने माझ्या शब्दांचं रूप घेऊन, कागदाच्या विटेवर आपले रूप प्रकट केले. म्हणजे, हा पांडुरंग आतापर्यंत मला कित्येक वेळा भेटला... वेगवेगळ्या शब्दांची रूपं घेऊन किती वेळा त्याने मला मार्ग दाखवला, मला उपदेश केला, माझी पाठ थोपटली... माऊली! कसं गं लक्षात आलं नाही माझ्या? आणि त्या क्षणी मला कर्मयोगाचा पहिला साक्षात्कार झाला. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने माझी ही आठवण तुम्हाला सांगताना माझ्या मनाला खूप समाधान लाभत आहे. या निमित्ताने आज पुन्हा या महान संतपरांपरेचा आपण जागर करू, कर्मयोगाचा जागर करू. सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! तेजाली चंद्रकांत शहासने १० जुलै २०२२

#वारी #पंढरपूर #आषाढी #आषाढीएकादशी #मराठी #विठोबा #contentwriter #contentcreation #linkedinforcreators #storytelling #मराठी #म #कर्मयोग #karma #karmayoga

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा