शनिवार, ११ मे, २०१९

|| सुखोत्सवी अशा जीव अनावर, पिंजऱ्याचे दार उघडावे ||

लेखाची तारीख : १२ मे  २०१८
आज सकाळीच लोकसत्तामध्ये १०४ व्या वर्षी एका संशोधकाने इच्छामरण पत्करल्याची बातमी वाचली. माझं जगणं परिपूर्ण झालं असून यापुढे जगण्याची इच्छा नाही, असं म्हणत हसत ते मृत्यूला सामोरे गेले. जाताना, मला ऑस्ट्रेलियात मरणं आवडलं असत, पण तसा कायदा तिथे नाही, याचा सलही त्यांनी बोलून दाखवला... वाचता वाचता जीव कातर झाला ... नकळत आजी आठवली, तीही अशीच कुडीत अडकली होती... आणि त्यानंतर दुपारी लिमये आजोबा गेल्याचं समजलं. त्यांचही वय झालंच होत, कितीतरी दिवस वाट पाहत होते ...सुटकेची. सुटले एकदाचे! टचकन पाणी आलं डोळ्यांतून. असं सगळं एकाच दिवशी, म्हणजे निव्वळ योगायोग. पण बघा ना.. आपण म्हणतो काय...सुटले ! अनेक यातना, त्रास, हताशा यातून सुटका झाली, जसं काही पिंजऱ्यातून पक्षी सुटला.. मुक्त झाला.. स्वच्छंद विहारायला. म्हटलं तर त्या जीवासाठी हा परमोच्च आनंदाचा क्षण. पण 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!' आणि तेव्हा जाणवलं इच्छामरणाची गरज किती आहे ते ! अर्थात तिथेही नैतिक-अनैतिकतेचा मुद्दा येतोच. पण जिथे आपण हवा तो जीव (प्राणी, पक्षी, फळ, फुल अगदी माणूस) आपल्या मर्जीप्रमाणे बनवण्याच्या तंत्रज्ञानापर्यंत आलोय, अगदी मुहूर्ताप्रमाणे जन्म देण्यासाठी सिझेरियन करण्याची अक्कल ज्या मानवाला आली आहे, तिथे संपूर्ण उपभोगल्यानंतर उरलेलं निर्माल्य आनंदानं विसर्जित करायचं असेल तर त्यात का आडकाठी?
विज्ञानाच्या असंख्य उपकारांपैकी एक म्हणजे माणसाच वाढलेलं आयुर्मान! त्यावरून एक विनोद आठवला, दारू न पिऊन तुमचं आयुष्य वाढेल पण ती वर्षं म्हातारपणातली असतील. वृद्धापकालाच्या मर्यादा यावरून समजून याव्यात.
माणसाचं आयुष्य वाढलेलं असलं, तरी ते प्रचंड व्यग्र झालं आहे. पहिलीतल्या मुलापासून ते ऑफिसला जाणाऱ्या आईपर्यंत घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण दिवस येन केन प्रकारेण कमालीचा बिझी असतो. अशा वेळी त्यामुळे घरी वृद्ध व्यक्ती असेल, कितीही म्हटलं तरी तिच्यासाठी वेळ देता येत नाही. त्यांच्यासाठी मदतनीस, आया जरी ठेवली तरीही नात्यातला ओलावा, प्रेम त्यातून मिळेलच याची शाश्वती काय?
जोपर्यंत हातपाय हलतात तोपर्यंत नाही, पण काही कारणास्तव आजारपणामुळे ती व्यक्ती अंथरुणाला खिळली तर सगळ्या कुटुंबाचंच स्वास्थ्य हरवतं(असं कुटुंब प्रत्येकाला लाभो). सगळ्यांचाच जीव त्यात अडकलेला असतो आणि आपला व्यग्र दिनक्रम आणि आपला बाप किंवा लाडक्या आजोबांचं अंथरुणाला खिळलेल रूप यात प्राधान्य कशाला द्यायचं यात माणसाचा त्रिशंकू होतो.
त्या न्युनगंडातून मग पैशाने समाधान शोधण्याचे असंख्य मार्ग समोर येतात. निरनिराळे उपचार, महागडी औषधं, साधनं! आणि दुसरीकडे आजारी माणूस आपल्या जर्जर कायेवर चाललेल्या शृंगाराने व्यथित होत राहतो. एवढे मोठाले खर्च, पोराबाळांची तगमग त्या जीवालाही पाहवत नाही. त्यात आजारपणात होणाऱ्या यातना, परावलंबित्वाने होणारा मानसिक त्रास हे वेगळंच. यासाठी जरा-मानसोपचार ही नवी शाखा उदयाला येतीये, ज्यात वृद्धानां मानसोपचार दिले जातात.
या उपचारांना यश आलं ठीक, नाहीतर एका क्षणी तो जीव मनाशी खुणगाठ पक्की बांधतो आणि....वाट पाहण्याचा बघणं सुरु होतं.
म्हटलं तर इच्छा मरणाचा मुद्धा इथे येतो. कारण निर्माल्य वेळेत विसर्जित केलं तर ठीक नाहीतर ते कुजतंच! आनंददायी जीवन जगण्याचा हक्क जसा सर्वांना आहे तसाच आनंदी मृत्यूचा हक्क प्रत्येकाला का नसावा?
(हे थोडं कडू असलं तरी सत्य आहे. आपल्याच मृत्यूची आस लावून बसलेली माणसं भेटणं दुर्मिळ नाही, आणि त्यातून येणारं नैराश्य हा वेगळ्या लेखाचा विषय होईल.) 

माझी लाडकी आजी आणि आमचे आप्त लिमये आजोबा (गणेश हरी लिमये, देहावसान ११ मे २०१८ ) यांच्या स्मृतीस अर्पण 
-तेजाली शहासने.
12/05/2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा