शिव...उत्पत्ती , स्थिती आणि लय यांतील लयाचा कर्ता, अत्यंत गूढ, उग्र , राकट, एकांतप्रिय, अत्यंत टोकाच्या स्वभावांचा उत्कट मिलाप, भणंग असूनही समस्त सृष्टीचा कारभार सांभाळणारा, महायोगी, नटराज, तृतीय नेत्राचा एकमेव अधिकारी, सांब सदाशिव !!!
तसा शंकर काही आबालवृद्धांचा लाडका वगैरे नाहीच. ते खातं त्याच्या लेकाकडे बऱ्याच प्रमाणात, आणि थोडं बहुत कृष्णाकडे. शंकर म्हणजे एकप्रकारे घरातला , गावातला बडा बुढा...सगळ्यांचा बाप ,देवांचा देव महादेव किंवा ऑफिस मधला बिग बॉस (I stillhave reservation about this thought, but just to simplify concept.) त्याच्याबद्दल लोकांच्या मनात श्रद्धा आणि भीती सारखीच . स्मशान वैरागी, एकांती निवांत, आपल्या कामात गुंग, देवादिकांवर जिवावरची संकटं आली की सगळे त्याला शरण, श्रावणी सोमवार, सोळा सोमवार, महाशिवरात्रीचा कडक उपास, पार्वतीची तपश्चर्या , शंकराचं तांडव, एकूणच काय तर अगदी कडक परीक्षा पाहणारा , चूक झालीच तर कडक शासन करणारा पण एकदा त्याच्या मनात बसलं की तुम्हाला कसलीही ददात पडू न देणारा!!मी काही कट्टर शिवभक्त नाही, पण हो, त्यावरची श्रद्धा मला वारसाहक्काने मिळाली आहे. मी आस्तिक किंवा नास्तिक दोन्हीही नाही; पण शिव या संकल्पनेभोवतालची गूढता मला त्याच्याकडे आकर्षित करते. त्यातली अनामिक, भारून टाकणारी ऊर्जा मला अचंबित करते, माझ्या अस्तित्वाच्या उद्देश्यावर विचार करायला भाग पाडते.
शिवाची माझी पहिली भेट कधी आठवत नाही, पण खूप लहानपणापासून ही शक्ती माझ्या जगण्याचा भाग आहे. त्यातला एक भाग माझे आजी आजोबा, आणि दुसरा ज्याने मला शिवाच्या आणखी जवळ नेलं... नृत्य ... जिथे शंकराला नटराज म्हणून पूजलं जातं.
‘आंगिकम् भुवनम् यस्य, वाचिकम् सर्व वाड्मयम्,
आहार्यम् चन्द्रतारादि: तम् नम: सात्विकं शिवम् |
असं म्हणत, त्याला साक्षी ठेवून नर्तकाची कला सिद्धीस जाते. एकाच शक्तीची ही विभन्न रूपं शिवाभोवतलचं गारुड आणखी गूढ करतात. आजी आजोबांचे उपास तापास, अनुभव, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी यातून नकळत या श्रद्धेची बीजं मनात रुजली. आता यात प्रत्यक्ष शंकराचा वाटा किती आणि आजी आजोबांवरच्या प्रेमाचा किती हे सांगणं कठीण ( आजही सोमवार म्हटलं म्हणजे शंकरपेक्षा , आजीचा उपास , तिची श्रद्धा हेच आठवतं). पुढे जसं जसं वाचत गेले,सहस्त्र दल कमळासारखं शिव रूप उलगडू लागलं. आणि एका क्षणी जाणवलं हे रूप पाहण्यापेक्षाही अनुभवणं आणखी सुंदर आहे.
खरं तर याचं रूप किती साधं... आणि किती प्रांजळ, कितीतरी सत्य!‘ शक्तीशिवाय शिवाचं अस्तित्व शून्य हे त्यानेच सांगितलेलं. शिवलिंगाला अभिषेक घालताना कधी हा विचार केलाय की शाळुंकेशिवाय शिवलिंगाला पूर्णत्व येत नाही याचा अर्थ काय? संपूर्ण विश्वाचा तोल सांभाळणारं ते अत्यंत सोपं तत्त्वज्ञान आहे, नर-नारी यांच्या मिलनातून प्रकट होणाऱ्या उर्जेचं हे एक साधं रूपक आहे. पूजा असते या चैतन्याची, ऊर्जेची; आणि सामान्य माणूस अडकून राहतो अर्थहीन कर्मकांडात! वरवरच्या चंदेरी सोनेरी मुखवट्यांत! बम भोले करत फुप्फुसं जळणाऱ्या गांजाच्या चिलीमीत!
-तेजाली


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा