बुधवार, १७ जानेवारी, २०२४

 

सावध ऐका पुढल्या हाका| छद्मी ईमेल्स आणि कॉल्सच्या ||



 

रोज फक्त पंधरा मिनिटे काम करून दिवसाचे ५००० कमवा, 

फक्त विडियो लाईक करून महिन्याला ३०००० रुपये कमवा,

 पुढच्या एक तासात वीजबिलाचे पैसे भरले नाहीत तर तुमचे कनेक्शन तोडण्यात येईल, तत्काळ पैसे भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

या अशा प्रकारचे संदेश तुम्ही पाहिले असतील, तुमच्या मोबाईलवर तुम्हाला अनेकदा आलेही असतील. कदाचित त्यामुळे तुमच्या मनात कुतूहल निर्माण झालं असेल, कधी भीती तर कधी अगदी असे मेसेज वाचून हृदयाची धडधडही वाढली असेल. पण हे सर्व होऊनही तुम्ही त्यांना बळी पडला नसाल तर तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून स्वत:ला दूर ठेवण्यात यशस्वी ठरला आहात.

सध्याचं युग हे मार्केटिंगचं युग आहे असं म्हटलं जातं. आपलं उत्पादन ग्राहकाच्या गळी उतरवण्यासाठी संस्था वाटेल त्या मार्गाचा अवलंब करतात. गोडी गुलाबीने आपल्या उत्पादनाची स्तुती करण्यापासून ते आमचं उत्पादन वापरलं नाहीत तर जणू जगबुडीच होईल अशी गर्भित धमकी देण्यापर्यंत कुठलेही मार्ग त्यांना वर्ज्य नसतात. हेच लोण आता अगदी तुमच्या मोबाईलपर्यंत येऊन पोचलं आहे.

बोलण्यात गुंतवून, गोड बोलून, हातचलाखी करून फसवणूक करण्याचे प्रकार दशकानूदशके चालू आहेत. गुन्हेगार समोरच्याचे कच्चे दुवे हेरून त्यांचा वापर करून माणसाला फसवतो हे या सर्व गुन्ह्यामागचं समान सूत्र. बऱ्याच वर्षांपूर्वी घरोघरी फिरून वस्तू विकणारे सेल्समन, सेल्सगर्ल्स असत. त्याच्या माध्यमातून पाळत ठेवून, माहिती काढून चोरी, घरफोडीचे अनेक गुन्हे घडले होते. आज या गुन्ह्याचं सुधारित रूप आहे आपल्या मोबाईल आणि ई मेलमधून आपल्यापर्यंत पोचणारे ई विक्रेते किंवा ई सेल्सपर्सन.

यांच्यापासून दूर राहायचं, अशा मेसेजेसना उत्तर द्यायचं नाही हे आपल्याला माहिती असतं. परंतु काही ना काही कारणामुळे एका क्षणासाठी दुर्लक्ष होतं आणि आपण एका गुन्ह्यास बळी पडतो. अनेकदा तर नक्की हा संदेश खरा आहे की खोटा? खरा असेल तर उगाच भुर्दंड बसेल यासारखी भीतीही मनात निर्माण होते आणि नंतर कटकट नको म्हणून आपण त्या संदेशातील लिंकवर क्लिक करतो आणि नंतर फसवणूक होते.

आज भाषातज्ज्ञ म्हणून काम करताना या सर्व प्रकारच्या संदेश, ईमेल्स किंवा फोनकॉल्समध्ये मला काही समान धागे दिसतात. हे संदेश थोडे बारकाईने वाचले तर त्यातील शब्द, लेखन, मजकूर या आधारे आपण मेसेज खरा की खोटा याचा अंदाज घेऊन पुढे योग्य ती पावले उचलू शकतो. तर मुळात हे असे फसवणुकीचे ईमेल्स, संदेश, फोन कॉल्स ओळखायचे कसे याची माहिती या लेखात घेऊ या.

१.       अनधिकृत क्रमांक किंवा ई पत्त्यावरून आलेले संदेश – तुमचे कर्ज, वीजबिल, पाणी, टेलीफोन अशा कोणाकडूनही होणारा पत्रव्यवहार हा त्यांच्या ठरलेल्या ई-पत्त्यावरून किंवा मोबाईल क्रमांकावरून होतो. शक्यतो अशा संस्थांचे संदेश त्यांच्या विशिष्ट नावानिशी तुम्हाला येतात उदा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेसेजच्या नावात SBI असतं, एअरटेलच्या मेसेजवर Airtel. असे त्या त्या संस्थांची लघुरूपे असतात. कुठलीही संस्था वैयक्तिक क्रमांक अथवा ई पत्त्यावरून संपर्क करत नाही.   

२.       लेखन आणि वाक्यरचना – कुठलीही संस्था आपल्या ग्राहकांना एका विशिष्ट शैलीत संपर्क करते. हे लेखन औपचारिक असतं. तुमच्यासाठी असलेल्या संदेशात तुमचं नोंदणीकृत नाव, तुमचं खाते क्र. असे तपशील असतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे लेखन नेटकं, अचूक असतं. याउलट फसव्या संदेशात बरेचदा फक्त नमस्कार प्रिय ग्राहक, hello esteemed customer असे मोघम उल्लेख असतात. त्यात तुमचं नाव नसतं. लेखन अर्धवट, घाईघाईत लिहिलेलं असतं, अनावश्यक लघुरूपे असतात. त्यात खास तुमच्या माहितीचा उल्लेख नसतो. वाक्यरचना चुकीची, अर्धवट असते. मराठी असेल तर ते यांत्रिक भाषांतर असतं, इंग्रजी लेखनात स्पेलिंगच्या, वाक्यरचनेच्या चुका असतात. असे संदेश नेहमीच टाळा.

३.       भीती दाखवणारे संदेश – फसवणूक करणारा माणसाच्या मनातल्या भीतीचा गैरफायदा घेतो. अनेकांना वेळेवर बील दिलं नाही, एखाद्या गोष्टीची वेळेवर पूर्तता केली नाही, समोरचा घाई करत असेल तर त्याची दखल घेतली नाही तर अस्वस्थ वाटत राहतं, चीडचीड होते. अपराधीपणाची भावनाही निर्माण होते. आपण समोरच्याने सांगितलेल्या वेळेत ते केलं नाही तर आभाळ कोसळेल, किंवा ती ऑफर आपल्याला मिळणार नाही, आपले पैसे वाचणार नाहीत या भावणेतूनही अनेकदा लोक अशा घाई करणाऱ्या संदेशाला बळी पडतात. फसवणूक करणारे संदेश नेहमीच असे भीती दाखवणारे, वेळेचं अवाजवी बंधन घालणारे असतात. त्यामुळे असं काहीही संदेशात किंवा ई मेलमध्ये असेल तर त्या संस्थेच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क करून त्याची आधी खातरजमा करावी. कर्जाचे हप्ते, पाणी जोड वीज जोड संबंधित कुठलीही कारवाई होणार असेल तर त्यासंबंधी पूर्वसूचना अधिकृत मार्गांनी पत्राद्वारे, वैयक्तिक रित्या भेटून दिली जाते. असे अधिकृत पत्र सोडून कुठल्याही संदेशावर विश्वास ठेवू नका.  

४.       अनाहूत संदेश – फसवणुकीचे संदेश नेहमीच अनाहूत असतात. अचानक कधीतरी अनोळखी क्रमांकावरून तुम्हाला फोन येतो किंवा एखादा मेसेज येतो. यातली भाषा अनेकदा आर्जवी, गळेपडू असते. काहीतरी आमिष असतं, किंवा अशक्यप्राय कमी किमतीत, सवलतीत वस्तू देण्याचे आश्वासन असते. एवढं स्वस्त कसं असा प्रश्न आपल्याला पडतो. हा प्रश्न पडणं हीच फसवणुकीच्या संदेशाची ओळख. त्यापासून दूर राहा. तो संदेश डिलिट करा आणि तो क्रमांक ब्लॉक करा. हल्ली असे संदेश व्हॉटस अॅपवरही येतात. Do you have a few minutes? I have an interesting offer. अशा आशयाचा मेसेज त्यात असतो. हे काय म्हणून आपण सहज बघायला जातो आणि त्यांच्या जाळ्यात अडकतो.

५.       अनाहूत विडिओ कॉल्स – व्हॉटस अॅपवर विडिओ कॉल करून अश्लील चित्रफीत दाखवून ब्लॅकमेल करण्याच्या बऱ्याच घटना सध्या दिसून येतात. अनोळखी क्रमांकावरून आलेले हे विडिओ कॉल्स काही सेकंदच असतात परंतु यात नकळतपणे आपला विडिओ रेकॉर्ड केला जातो. नंतर हेच व्हीडियो आपल्या फोटोसह आपल्या नातेवाईक, मित्रवर्तुळात पसरवण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात. बदनामी होईल या भीतीने चूक नसतानाही या फसवणुकीस बळी पडतो. असे कॉल्स न घेणं महत्त्वाचे पाऊल. हे क्रमांक अनोळखी असतातच आणि अनेकदा भारतातील नसतात, म्हणजेच त्यांची सुरूवात +९१ ने होत नाही. तर कुठल्याही अनोळखी क्रमांकावरून येणारे विडिओ कॉल्स घेणे १०० % टाळा. असा कॉल आल्यास तो मोबाईलवर कट कसा करायचा हे शिकून घ्या, कट करता आला नाही तर तो बंद होईपर्यंत तसाच वाजू द्या. नंतर तो नंबर रिपोर्ट करून ब्लॉक करा.

 - तेजाली चंद्रकांत शहासने

पूर्वप्रसिद्धी : वाणिज्यविश्व जानेवारी 2024 

 

गुरुवार, २० जुलै, २०२३


समाजमाध्यमांवर धोरण म्हणून एखादी भाषा वापरताना तीचा योग्य वापर खूप महत्त्वाचा. भाषेचं व्याकरण, धाटणी जपणं, त्यात इतर भाषांची अनावश्यक भेसळ करणं आवर्जून टाळणं यातून त्या लिखाणाचा आणि लेखकाचा अस्सलपणा दिसतो. त्याचे कष्ट, विषयावरची पकड लक्षात येते. सोपी अर्थवाही वाक्यरचना आणि नेटकी मांडणी हे लेखनाचे श्वास आहेत.

 दुसऱ्या भाषेतील शब्द वापरूच नये असं नाही. पण ते शब्द वापरताना, खरंच याची इथे गरज आहे का, याला त्या भाषेत कुठला शब्द आहे का हे प्रश्न परत परत विचारून अपरिहार्य परिस्थितीतच दुसऱ्या भाषेतील शब्द वापरावा असं मला वाटतं. दुसऱ्या भाषेतील शब्द आपण वापरतो तेव्हा आपण वाचकाला ती भाषा येते हे गृहीत धरतो. या गृहीत धरण्याला माझा आक्षेप आहे. 

कुणालाही गृहीत धरू नये हे व्यवस्थापन आणि संज्ञापनातलं एक महत्त्वाचं सूत्र आहे. इतर भाषांतले अगदी साधे साधे शब्दसुद्धा एखाद्याला माहिती नसण्याची शक्यता आपण कधीच नाकारू शकत नाही. (साध्या रोजच्या आयुष्यात वाचता वाचता 4 वेळा शब्दकोश पाहावा लागत असेल किंवा परभाषिक शब्द असल्याने त्यांचे अर्थ लागत नसतील तर त्या लेखनाचा काय उपयोग?)

आज आशय लेखन हे खूप महत्त्वाचे काम झाले आहे. त्यामुळे कोणालाही 'गृहीत' न धरता, सर्वांना समजेल असे समतोल,
लेखन करणं, चुकीचे पायंडे पडू न देणं ही एक आशय लेखक म्हणून सदैव आपली नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं.

- तेजाली चंद्रकांत शहासने 
२१ जून २०२३ 

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

बहुभाषिकत्व आणि उद्योगवृद्धी

पूर्वप्रसिद्धी : वाणिज्य विश्व दिवाळी अंक 2022 
तेजाली चंद्रकांत शहासने 
 


(चित्र आंतरजालावरून साभार)   


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पंतप्रधानपदाची कारकीर्द सुरू केल्यानंतर ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला आणि भारतीय उद्योग जगतात नवसंकल्पना, नवनिर्मितीचं वारं खेळू लागलं. भारतीय उद्योगजगताचा प्रवासही आता ग्लोबल ते लोकल असा व्हायला लागला आहे. तर मग आपल्या व्यावसायिक वापरातही आपण जास्तीत जास्त प्रादेशिक, स्थानिक भाषांना प्राधान्य द्यायला हवं.

आता भारत ही 100 कोटी लोकसंख्येची एक मोठी बाजारपेठ आहे आणि मुख्य म्हणजे ही सर्व बाजारपेठ बहुभाषिक आहे. सन 2011 च्या आकडेवारीनुसार भारतात 22 अधिकृत भाषा आहेत आणि साधारण 57% लोक हिंदी बोलू शकतात. त्याखालोखाल बंगाली, मराठी, तेलुगु, तमिळ आणि पुढे अशी उतरंड आहे. या यादीत इंग्रजी सर्वांत शेवटी येते. इंग्रजी बोलू शकणारे लोक भारतात 10%च आहेत आणि तरीही आपण सर्वत्र इंग्रजीचा मुक्त वापर बघतो, जणूकाही आपण गृहितच धरतो की प्रत्येकाला इंग्रजी येतेच. उलट जपान, जर्मनी, फ्रान्ससारख्या देशांत जा, इंग्रजी औषधाला सापडणार नाही आणि यातून त्यांचं काहीच अडत नाही. याउलट भारतात तर व्यवसायात, नोकरीत उत्तम यश मिळवायचं असेल तर इंग्रजी आलंच पाहिजे असा जणू पायंडाच पडून गेलाय. मग ते इंग्रजी नीट यावं म्हणून आटापिटा! आपल्या मुलांना मातृभाषा सोडून इंग्रजी माध्यमात घालण्यापासून सर्व प्रयत्न आपण केले. पण इंग्रजी येतंय म्हणून कोणी छातीठोकपणे यशस्वी झाला आणि इंग्रजी नीट येत नाही म्हणून अयशस्वीच राहिला असं कधी झालंय का?

इंग्रजी न आल्यामुळे अनेक लोक महत्त्वाच्या माहितीपासून वंचित राहतात किंवा त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. यातूनच मग इंग्रजी शिकणं आज अपरिहार्य झालेलं आहे. आता भारतात एवढी भाषिक विविधता असताना अशी एकच भाषा वापरण्यास भाग पाडणं योग्य आहे का? समजा मराठी माणसाला मराठीतून, कानडी माणसाला कानडीतून माहिती मिळाली तर त्यांना किती आनंद होईल! भारतातली ही भाषिक परिस्थिती पाहता ‘ग्लोबल ते लोकल’चा प्रवास करताना आपल्या भाषेचा प्रवासही जागतिक भाषा (इंग्रजी) ते स्थानिक भाषा( मराठी, गुजराती, तमिळ, उडिया इ.) असा झाला, ग्राहकांना उद्योग उत्पादनांची माहिती प्रादेशिक भाषांत मिळायला लागली तर तो प्रवास भाषिक दृष्टीनेही ‘जागतिक ते स्थानिक’ असा होईल. हे कसं होईल, तर याची दोन उत्तरं आहेत, एक वैयक्तिक पातळीवरचं आणि एक औद्योगिक. त्याआधी एक छोटं उदाहरण देते म्हणजे माझा मुद्दा नीट समजू शकेल.  आजकाल प्रवास करण्याचं प्रमाण वाढलं आहे. दक्षिण भारतातले प्रवास करताना आपण थोडं बाचकतो. तसंच जपान,कोरिया, स्वीडन, नॉर्वे सारख्या देशातही जायला लगेच धजावत नाही, कारण भाषा. बंगलोरला राहायला गेलेल्या अनेकांना तिथली भाषा समजत नाही म्हणून बरेचदा कंटाळा येतो, घरची आठवण येते. एखादा पुढे जाऊन भाषा शिकतो आणि तिथे छान बस्तान बसवतो किंवा एखादा वैतागून दिल्ली, मुंबईतली किंवा बाहेर अमेरिका-युरोपतली नोकरी बघतो. न समजणाऱ्या भाषा सतत दिसण्याचा, त्या समजून घेण्याचा, कानावर आदळण्याचा, त्यांच्यासोबत संघर्ष करण्याचा ताण खूप जास्त असतो. ज्या संस्था, व्यक्ती हा ताण कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांना ग्राहक प्राधान्य देतात. म्हणजेच आपलं उत्तर आहे आपलं उत्पादन आपल्या ग्राहकाच्या भाषेत उपलब्ध करून देणं. एकेकाळी मोबाईल फक्त इंग्रजी भाषेतच असत, पण त्यानंतर हिंदी, मराठी भाषेत आलेल्या मोबाईलमुळे अगदी गावागावातल्या लोकांपर्यंत मोबाईल पोचला, त्यामुळे मोबाईल आणि मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या या दोन्हीचे ग्राहक वाढले. आज अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या जसं की अमॅझोन, फ्लिपकार्ट, गुगल, मायक्रोसॉफ्ट लोकलायझेशनचं धोरण ठेवून आपली उत्पादने मराठीत आणि इतर प्रादेशिक भाषांत सादर करत आहेत. अगदी औषधाच्या बाटलीच्या सूचनाही तुम्हाला हिंदी, जपानी, थाई, आणि इंग्रजीत एकत्र दिसतील. नव्या स्टार्टअप धोरणांमुळे मोठमोठी गुंतवणूक असणारे उद्योग उभे राहत आहेत ज्यांची स्पर्धा थेट या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी आहे. त्यामुळे उत्पादनांची माहिती स्थानिक भाषांत दिली तर उत्तम दर्जासोबतच भारतीयत्व आणि त्यातही आपल्याच भाषेत दिलेली माहिती हे घटक ग्राहकांना तुमच्या उत्पादनाकडे नक्कीच आकर्षित करतील. ग्लोबल ते लोकल या प्रवासात ग्राहकाला त्याच्या भाषेतून माहिती अर्थातच लोकलायझेशन हा उत्पादन आणि ग्राहक यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल. बदलत्या भारतीय बाजारपेठेत उद्योगधंदे, व्यापारी संस्था यांच्या बाबतीत बहुभाषिकत्व हे या प्रकारे अपेक्षित आहे. यात उत्पादनांची प्रादेशिक भाषांत माहिती यासोबतच बहुभाषिक कर्मचारी वर्ग, कॉल सेंटर्स, वेबसाईट्स, सांस्कृतिक समज, जाहिराती, कागदपत्रे इ. बाबी समाविष्ट करता येतील. अर्थात यात उत्तम लेखन आणि डोळस भाषांतर हे कळीचे मुद्दे, पण त्यासाठी उत्तमोत्तम लेखक आणि अनुवादक सहज मिळतील.

आज अनेकजण प्रादेशिक भाषेतल्या लेखनाला, अनुवादाला दुय्यम समजतात. त्यामुळे प्रादेशिक भाषेत काम करणाऱ्यांना मोबादलाही कमी मिळतो आणि त्यामुळे लेखकांचा इंग्रजीत काम करण्याकडे कल वाढतो. ही मोबादल्याची दरीही संपायला हवी. खरंतर प्रादेशिक लेखनामुळे तुम्हाला तुमचा आयुष्यभराचा बांधील ग्राहक मिळणे संभाव्य होईल. अशा रीतीने बहुभाषिकत्वाच एक धोरण म्हणून राबवलं तर संस्थेच्या विकासासोबतच लोकलायझेशन उद्योगालाही चालना मिळून रोजगरनिर्मिती होईल आणि भाषा संवर्धनही होईल. बोलणाऱ्याची माती विकली जाते नाही बोलत त्याचं सोनही विकलं जात नाही, बरोबर ना? म्हणजे नोकरी धंदा उत्तम करायचा तर बोलायला हवं, विचारात स्पष्टता हवी, उद्योजकता कल्पकता हवी आणि दृढ आत्मविश्वास हवा. मग भाषा कोणतीही असो, तुमचं उत्पादनच तुमच्यासाठी बोलतं. सांगण्याचा मुद्दा हा की या नव्या बदलत्या उद्योगविश्वात आपण इंग्रजीच्या पलिकडेही इतर भाषांचा मग त्या प्रादेशिक किंवा परदेशी असो विचार करायला हवा.

संस्थात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर आता वैयक्तिक दृष्टीने बघू. भारतात प्रत्येक व्यक्ती ही कमीतकमी द्विभाषक आहेच. महाराष्ट्रात जन्माला आलेला माणूस मराठी, हिंदी तर आपसूक शिकतो. इंग्रजीही शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणातून शिकली जाते. गुजराती, मारवाडी शेजारीपाजारी किंवा व्यापारी संबंध असतील तर तीही जमते. व्यापारी वर्गासाठी बहुभाषिकत्व नवीन नाही. वर्षानुवर्षे देशोदेशी, गावोगावी व्यापाऱ्यांचे तांडे फिरत, कामाच्या शोधार्थ स्थलांतर होत असे, युद्धे होत तेव्हाही स्थलांतर होत असे. यातून लोक त्या त्या प्रदेशातली भाषा आत्मसात करत. आज अनेक देश नागरिकत्व किंवा व्हिसा देताना त्या देशाची भाषा येणे अनिवार्य करतात. पण फक्त परदेशात राहण्याच्या संधी एवढाच बहुभाषिकत्वाचा फायदा नाही. विविध भाषा येत असल्याने एक उत्तम सामाजिक वर्तुळ तयार होतं जे माणसाच्या सामाजिक विकासासाठी पूरक ठरतं.

बहुभाषिकत्वाचा व्यावसायिक जीवनात काय उपयोग? सर्वसाधारपणे आपली भाषा ज्याला येते किंवा समजते त्याच्याकडे माणसाचा नैसर्गिक कल असतो. अशांशी व्यापारी किंवा भावनिक संबंध जोडणे, विश्वास ठेवणे माणसाला सोपे जाते, तसंच माहितीची, संदेशांची देवाणघेवाण, वाटाघाटीही सोप्या होतात आणि त्यामुळे व्यवसाय-व्यापार करणे सोपे जाते. म्हणजेच ती ती भाषा येणाऱ्या लोकांसोबत तुमच्या व्यवसायाच्या संधी वाढतात. हा मुद्दा भारतीय आणि परकीय दोन्ही भाषांसाठी सारखाच लागू. विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की बहुभाषिक लोक अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करू शकतात. दूसरा मुद्दा सांस्कृतिक बुद्धिमत्ता. आज आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतो किंवा बहुभाषिक ठिकाणी काम करतो तेव्हा नकळतपणे कोणाच्या भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्याबद्दल सहिष्णू असणं हा एक उपाय. पण आपण एखादी भाषा शिकतो तेव्हा त्या प्रांताची संस्कृतीही शिकत असतो. एक छोटसं उदाहरण, एकदा माझ्या ऑफिसातल्या एक तामिळी सहकाऱ्याला मी सहज म्हणाले की तुमची लिपी सगळी जिलेब्यांसारखी दिसते तर त्याने खूपच मनाला लावून घेतलं. मला जर तमिळ येत असती तर कदाचित हा प्रसंग टळला असता.

मगाशी मी अनुवाद आणि लोकलायझेशनचा मुद्दा मांडला. यात भारतीय आणि परकीय भाषांत अनेक संधी आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आज भारतात येत आहेत, अनेक देश भारतात गुंतवणूक करत आहेत. यांना भारताच्या विविध प्रांतात अगदी कानाकोपऱ्यात पोचण्यासाठी बहुभाषिक कर्मचारी वर्गाची गरज लागते. स्थानिक भाषा येणं ही अशा ठिकाणी जमेची बाजू ठरते. वरिष्ठ व्यवस्थापनातल्या लोकांनाही अनेक भाषा येत असल्याचा खूप फायदा होतो. कर्मचाऱ्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधून त्यांच्या भावना योग्य रीतीने समजावून घेता येतात, व्यावसायिक वाटाघातीतही याचा चांगला उपयोग होतो. इंग्रजी न वापरणारेही अनेक देश आहेत. या देशांतील लोकांसाठी दुभाषा म्हणून काम करूनही उत्तम पैसे कमावता येतात. अनेक कंपन्यांत दुभाषा, अनुवादक ही पदे असतात. जपानी, जर्मन, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश अशा भाषांत या संधी उपलब्ध असतात. लोकलायझेशनचं धोरण अनेक कंपन्या सध्या राबवत आहेत. त्यांनाही उत्तम अनुवादक आणि ती ती भाषा येणारे जाणकार आवश्यक असतात. हे लोकलायझेशन परकीय आणि भारतीय अशा दोन्ही भाषांत होते. सध्या भारतात मराठी, हिंदी, तमिळ तेलुगु पासून ते डोगरी, बोडो सोबतच अगदी हिंग्लिशमध्येसुद्धा लोकलायझेशन केले जाते. त्यामुळे प्रादेशिक भाषांतही संधी आहेत. अनुवादित पुस्तकांची बाजारपेठ मोठी आहे. मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅच्युरल लॅंगवेज प्रोसेसिंग या क्षेत्रात सध्या अनेक भाषांवर काम चालू आहे. भाषा उत्तम प्रकारे अवगत असलेली बहुभाषिक व्यक्ती इथे उत्तम रीतीने काम करू शकते.

भारतासारख्या बहुभाषिक खंडप्राय देशात प्रादेशिक भाषा शिकण्यावरही आपण भर द्यायला हवा. शाळेत आपल्याला फ्रेंचचा पर्याय असतो आपण गुजराती, कानडी शिकायची असेल कुठलीच औपचारिक व्यवस्था उपलब्ध नाही. उलट विविध प्रांतात भाषेच्या आधारे तेढ पसरवली जाते. बहुभाषिकतेमध्ये भाषिक सौहार्द हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण जर्मनीला जायचं तर जर्मन शिकतो, मग बंगलोरला, चेन्नईला जायचं तर कानडी किंवा तमिळ शिकतो? किंवा इथे आलेला माणूस मराठी शिकतो का, त्यासाठी एखादी शासकीय व्यवस्था आहे? असे घडले तर परप्रांतात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आयुष्य किती सुखकर होईल! भारताच्या भाषिक एकात्मतेसाठी हे महत्त्वाचं आहे. बहुभाषिकता हे भारताचं वैशिष्ट्य आहे. आपण दर वेळी इंग्रजी-हिंदी गृहीत धरण्यापेक्षा विविध प्रांतात नोकरी धंद्यासाठी जाताना स्थानिक भाषा कामापॉरती जरी शिकली तरीही हळूहळू संपूर्ण भारतात सर्व भारतीय भाषा पसरतील. याचे आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक फायदे तुम्हाला नक्की मिळतील. व्यापारी संस्थांनीही बहुभाषिकतेचा हा नवा दृष्टिकोन लक्षात घेऊन काम केल्यास त्यांना व्यवसायात यश मिळेलच पण त्याच बरोबर संतुष्ट ग्राहक आणि एक जबाबदार उद्योग म्हणून ख्यातीही वाढेल. 

रविवार, २४ जुलै, २०२२

डेक्कन कॉलेजातील लोकमान्य टिळकांचा वारसा

 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्य समरातील एक युग पुरुष. ज्यांच्या केवळ लेखणीने एक मोठी क्रांती घडवून आणली, ज्यांच्या अग्रलेखांनी ब्रिटिश सरकारला धारेवर धरले आणि ज्यांच्या केसरीने अनेक प्रश्नांना वाचा फोडली.

विचार करा, ज्या माणसाच्या केवळ शब्दांत एवढं बळ होतं की त्यांना घाबरून ब्रिटिश सरकारने त्यांना सहा वर्षे अतिशय खडतर अशा मंडाले तुरुंगात तुरुंगवासाची शिक्षा दिली, त्यांच्या बुद्धीचं तेज किती प्रखर असेल! पण ते फक्तच एक क्रांतिकारक लेखक होते का? त्यांच्या प्रखर देशप्रेमामागे एका प्रकांड पंडिताची वैचारिक बैठक होती. ते एक उत्तम वकील, तत्त्वज्ञ होते. संस्कृत, गणित आणि ज्योतिष विषयांत निष्णात होते. पण एवढी विद्वत्ता त्यांनी कशी मिळवली असेल? कुठून एवढं ज्ञान मिळवलं असेल?

या मोठ्या प्रश्नाच्या उत्तराचा एक छोटासा भाग मी माझ्या डेक्कन कॉलेजच्या ग्रंथालयात पाहिला. त्यांनी वाचलेली ग्रंथ संपदा!


 आमच्या या कॉलेजच्या ग्रंथालयात लोकमान्य टिळकांनी स्वत: वाचलेल्या, अभ्यासलेल्या  पुस्तकांचं एक कपाट आहे.
याचं नाव आहे ‘Lokmanya Bal Gangadhar Tilak Vedic Collection’. ही पुस्तकं कॉलेजला देणगी म्हणून मिळालेली आहेत. ही पुस्तकं म्हणजे त्यांनी वाचलेल्या एकूण पुस्तकांचा एक छोटासा भाग असतील. पण त्यांची नावं आणि विषय हे एवढे मातब्बर की एवढं ज्ञान पचवायला एखादी व्यक्ती आयुष्य खर्ची घालेल. उदा. Language (Bloomfield), Original Sanskrit Text (सर्व खंड), The Saiva And Sarta Upanishada, Vedischz Mythologiz I II III, Ludwig Der Rigwed, Alt Indien, Nyay Prakash (Edgerton), The Samanya Vedant Upnishad, Secred Books of the East (F. Max Moller). 

(याच पुस्तकावरून लोकमान्य टिळकांनी आर्यांचे मूळ वसतिस्थान हा ग्रंथ लिहिला.)

यात ज्या पुस्तकवरून त्यांनी मंडालेमध्ये आर्यांचे मूळ वसतिस्थान हा ग्रंथ लिहिला त्या The origin of Aryans ते पुस्तकही आहे. या आणि या कपटातील सर्व पुस्तकांना लोकमान्य टिळकांचा पवित्र हस्तस्पर्श झालेला आहे. 




  
 

आज लोकमान्य टिळकांच्या जन्मदिनी मी खरंच स्वतःला नशीबवान समजते की ते शिकलेल्या (डेक्कन कॉलेज पुणे) आणि त्यांनी स्थापन केलेल्या (बी. एम. सी. सी. डेक्कन एज्युकेशन सोसा. पुणे) अशा दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये मला शिकण्याची संधी मिळाली. या संपन्न वारशाबद्दल मला अभिमान वाटतो आणि त्यांचे  जीवनचारित्र, या कॉलेजची वास्तू, त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची स्पंदने मला हा संपन्न वारसा पुढे नेण्यासाठी प्रेरणा देतात.

-तेजाली चंद्रकांत शहासने


रविवार, १० जुलै, २०२२

जेव्हा मला विठ्ठल भेटला ...

चित्र - आंतरजालावरून साभार   
 

पंढरपुरी, युगे अठ्ठावीस हात कटीवर ठेवून, विटेवर उभा राहून, या विश्वाचा जगडव्याळ व्याप शांतपणे पाहत आहे पांडुरंग! कोणाचा विठू, कोणाचा विठोबा, कोणाची विठू माऊली, कोणाचा सखा पांडुरंग तर कोणाचा पंढरीनाथ... असा हा, सर्व जातीधर्म, नाती, लिंगभेद आणि स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून या सर्व चराचराला व्यापून उरणारा पांडुरंग...आणि त्याच्या ओढीने दर वर्षी पायी वाट तुडवत पंढरपुरची वारी करणारे वारकरी. गेली आठ-नऊ शतके त्या विठू माऊलीच्या चरणाशी तादात्म्य पावत एकरूप होऊन, प्रत्यक्ष उदहरणानेच अद्वैताचे तत्त्वज्ञान सांगत, समाजातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, अज्ञान दूर करण्याचे काम या वारकरी संप्रदायातील संत करत आहेत. असा संप्रदाय जगाच्या पाठीवर विरळाच. 'एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात. त्यापुढे जाऊन मी म्हणेन 'एक तरी वारी अनुभवावी'. खरंच, कधीतरी सहज एखाद्या दिंडीत एखाद्या वारकाऱ्याबरोबर चालून बघा, त्याची विठ्ठलाची ओढ एवढी की तुम्हाला त्याच्यामागे धावावं लागेल. एखाद्या माऊलीला सहज विचारून बघा, कितवी वारी मावशी? तीला कदाचित आकडा आठवणारही नाही; पण ती तुम्हाला वेगवेगळ्या रूपात भेटलेल्या विठू सावळ्याच्या गोष्टी नक्की सांगेल. कधी तो तीला शिवारात भेटला असेल, कधी बाजारात जड टोपली उचलताना कोणीतरी पुढे केलेल्या हातात भेटला असेल. कोणाला अगदीच हाता-तोंडाशी आलेलं पीक जातंय की काय झालेलं असताना बरसलेल्या पावसात भेटला असेल. कोणाला शेवटची बस निघून गेल्यावर अवचित भेटलेल्या फटफटीवाल्याच्या रूपात भेटला असेल. असा हा पांडुरंग, श्रद्धा असेल त्याला फुला-पानांत, जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी तो सापडतो आणि मग तो वारकरी गाऊ लागतो कांदा, मुळा, भाजी| अवघी विठा बाई माझी| लहानपणापासून ही संत परंपरा पाहत मी मोठी झाले. माझे बाबा दासबोध वाचत, आजी कलावती आईंची भजनं गात असे. पुण्यात आल्यावर पहिल्यांदा वारी जवळून पाहिली. वारकरी पाहिले. तो अफाट जनसमुदाय एकाच ओढीने पुढे जाताना पाहणं ही देखील एक वेगळीच अनुभूति होती. पण आत कुठेतरी रितं रितं वाटायचं. कधी आपल्याला भेटेल का पांडुरंग? एवढी भक्ती, एवढी ओढ आपल्यात कधी येणार? नंतर नंतर तर “आपल्याला का नाही भेटत पांडुरंग?; आपल्यालाच का नाही भेटत? तो तर केवढा साधा भोळा, थोड्याशा भक्तीनेही प्रसन्न होणारा.. मग का नाही? या प्रश्नांची उत्तरं शोधताना अनेक वर्षं गेली. एके दिवशी रिकाम्या वर्ड फाईलकडे पाहत काहीतरी लिहायचा विचार करत होते. एकीकडे ‘कानडा राजा पंढरीचा... ’ वाजत होतं; काहीतरी डोक्यात होतं पण शब्दच सापडत नव्हते. त्या कल्पनेचं टोक काही हातात येत नव्हतं. काहीतरी अव्यक्त, निराकार असं डोक्यात घुमत असताना ओळी ऐकू आल्या निराकार तो निर्गुण ईश्वर| असा प्रकटला कसा विटेवर| आणि... आणि या ओळींनी माझ्या आयुष्यात युरेका क्षण आणला. अरेच्चा... एवढी वर्षं अनेक अमूर्त, निराकार कल्पना आपण शब्दांत पकडून या कागदावर, विटेवर साकार करून लिहिल्या की! जणू तो ईश्वर जो अद्वैत आहे, अमूर्त, निराकार, निर्गुण आहे, जशा माझ्या मनातल्या संकल्पना आहेत; त्याच कागदावर शब्दांच्या रूपात उमटल्यात... त्या विठू माऊलीने... पांडुरंगाने माझ्या शब्दांचं रूप घेऊन, कागदाच्या विटेवर आपले रूप प्रकट केले. म्हणजे, हा पांडुरंग आतापर्यंत मला कित्येक वेळा भेटला... वेगवेगळ्या शब्दांची रूपं घेऊन किती वेळा त्याने मला मार्ग दाखवला, मला उपदेश केला, माझी पाठ थोपटली... माऊली! कसं गं लक्षात आलं नाही माझ्या? आणि त्या क्षणी मला कर्मयोगाचा पहिला साक्षात्कार झाला. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने माझी ही आठवण तुम्हाला सांगताना माझ्या मनाला खूप समाधान लाभत आहे. या निमित्ताने आज पुन्हा या महान संतपरांपरेचा आपण जागर करू, कर्मयोगाचा जागर करू. सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! तेजाली चंद्रकांत शहासने १० जुलै २०२२

#वारी #पंढरपूर #आषाढी #आषाढीएकादशी #मराठी #विठोबा #contentwriter #contentcreation #linkedinforcreators #storytelling #मराठी #म #कर्मयोग #karma #karmayoga

सोमवार, २ मे, २०२२

मराठी वाचवण्याची जबाबदारी नक्की कोणाची?

 

मराठी आज माती खात आहे...
-तेजाली चंद्रकांत शहासने 

तुम्ही ही पोस्ट वाचाल तेव्हा महाराष्ट्र दिन, कामगार दिवस यांचं कवित्व संपत आलेलं असेल. आजकाल आपल्याला जो तो दिवस साजरा करण्याची धुंदी असते. आजच्या दिवसाची धुंदी आता उतरली असावी अशी आशा. आता थोडं महत्त्वाचं, मुद्दयाचं आणि तथ्याचं बोलू.

भाषावार प्रांतरचनेतून आपल्याला मिळालेली देणगी म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र. सारख्या भाषिक वैशिष्ट्यांचे लोक एकत्र, गुण्या-गोविंदाने राहावेत, त्यांना आपली भाषा, संस्कृती सहज जोपासता, वर्धित करता यावी, असाच हेतू! एवढं महत्त्व दिलं भाषेला. पण आज काय अवस्था? मराठी शाळा बंद पडतायत, मराठीची अवस्था दिवसेंदिवस केविलवाणी होतीये, मूठभर लोक सोडून कोणालाही त्याबद्दल काहीच वाटत नाही. उलट बोलीभाषा - प्रमाणभाषेचे वाद, इंग्रजीमुळेच मिळणाऱ्या संधी, पहिलीपासून इंग्रजी शिकवावं की नाही, मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवावं की मराठीतून, अभिजात की आधुनिक यासारख्या वादांना रीतसर खतपाणी घालून आपल्याच मराठी भाषकांत फुट पाडली जातीये. या सर्व विषयांवर वर्षानुवर्षे चर्वितचर्वण झालेलं आहे. अनेक सिद्धांत मांडले गेलेत जे जगभर मानले जातात, ज्यांचा शिक्षणव्यवस्थेत अंतर्भाव केला जातो. पण आपल्याकडे मात्र मराठी गौरव दिनाला चर्चा घडतात, चर्चासत्रे, महिलामंडळे, संमेलने, समित्या यामार्फत त्याच त्या विषयांवर वाद झाडतात, ठराव होतात, पी. एच. डी. करतात, शासनाला प्रस्ताव दिले जातात. पण यातून निष्पत्ति काय? अमृततेही पैजा जिंके म्हणणाऱ्या मराठीला आज आपण माती खायला लावतोय. आपल्याच राज्यात आपलीच भाषा दीनवणी बनून राहते, भर राजधानीत ... अगदी सांस्कृतिक राजधानीत सुद्धा... हेच का फलित त्या बलिदानाचं?

मराठीच्या मागे पडण्याला इंग्रजी माध्यमातील शिक्षण हे एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. पण खरंच तसं आहे का? कधी आत्मपरीक्षण केलंय? मराठी शाळा वाचवा म्हणून बोंब ठोकली जाते पण मला सांगा, भाषा वाचवण्याचं ओझं त्या चिमूरड्यांच्या खांद्यावर का? दुसरा मुद्दा हिंदी आणि इंग्रजीच्या अतिक्रमणाचा. त्याबद्दल थोडं नंतर बोलू. पण प्रसार आणि संवर्धनाबद्दल ठोस उपाययोजना फारशा दिसत नाहीत हे आजचं सत्य आहे. शासकीय पातळीवर मराठी पंधरवडा, मराठी गौरव दिनाचे अवाढव्य कार्यक्रम करून खरंच प्रसार होतो? मराठी लेखनाचे शासनमान्य नियम आहेत अनेकांना माहिती नसतं. त्यात पुन्हा बोली भाषा लेखी भाषेचा वाद, मग मराठीत अनेक शब्द मुळात मराठीच कसे नाहीत हे सिद्ध करणारा एक वर्ग. यातून भाषा हे एक साधन न राहता ती क्लिष्ट होऊन, पोट भरलेल्या वर्गाच्या चघळण्याचा एक विषय म्हणून उरते आणि भाषा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जायला लागते आणि लोकांचा त्यातला भाषा म्हणून समजून घेण्याचा रस संपून जातो.    

आज मराठी भाषा टिकावी, जपावी म्हणून काही पालक आपल्या मुलांना आवर्जून मराठी शिकवतात, त्यांच्यावर तसे संस्कार करतात, पण हे व्यक्तिगत पातळीवर झालं. मला सांगा, जसे ठिकठिकाणी फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, जपानी भाषा शिकवल्या जातात तशी मराठी का शिकवली जात नाही? ‘इंग्रजी शाळेत मराठी तिसरी भाषा म्हणून शिकवली जाते’ हा युक्तिवाद मला मान्य नाही. तिसऱ्या भाषेचं काय होतं सर्वांना माहिती आहे. इंग्रजी तिसरी भाषा म्हणून शिकलेल्या पिढीतली मी आहे. दहावीपर्यंत इंग्रजी शिकूनही कॉलेजात आणि त्यानंतरही आणि आजपर्यंत, "मराठी मिडियममधून शिकलो ना, त्यामुळे इंग्लिश येत नाही" हा न्यूनगंड बाळगणारे आणि तो सार्थ करणारे पैशाला पन्नास मिळतील. दहावीनंतर तर्खडकर, रॅपिडेक्स, ILTS, स्पोकन इंग्लिश यासारखे अनेक प्रकार करून इंग्रजी परत शिकावी लागते. या उद्योगावर अनेकांनी भारतात रग्गड पैसे कमावलेत. ही तिसऱ्या भाषेची गत आहे. त्यामुळे हा युक्तिवाद बाजूलाच ठेवू,

इंग्लिश विंग्लिश चित्रपट, सर्वांच्याच आवडीचा, त्यात श्रीदेवी इंग्रजी शिकायला जाते, अगदी आताची एमीली इन पॅरीसमधली एमीली सुद्धा पॅरिसला गेल्यावर फ्रेंचचा क्लास लावते. असं कुठे पाहिलेय की कोणी पुण्यात आला आणि मराठीचा क्लास लावला? पुणे आज आयटी हब आहे, देशभरातून इथे लोक येतात आणि इथलेच बनून जातात. मुंबईत हीच परिस्थिती आहे. ती तर सगळ्या प्रकारच्या उद्योगांची आदिमाय आहे. देवनागरी लिपी आणि शब्दांचे साधर्म्य यामुळे हिंदी भाषकांना इथे संभाषणात अडचणी येत नाहीत. बिचारा मराठी माणूसही त्यांच्या कलाने घेत मोडकी तोडकी बंबाईया हिंदी बोलत संवाद साधतो. यात त्या हिंदी माणसाचं काम साधतं पण आपली मराठी ठेच खाते. आता यापेक्षा या शब्दसंग्रहाचंच भांडवल करून त्यांना मराठी शिकण्यास उद्युक्त केलं तर? असे प्रयत्न कधी झालेत?

वर्षानुवर्षे लोक महाराष्ट्रात राहतात आणि त्यांना मराठी येत नाही. फरक पडत नाही ही एक गोष्ट. पण या अमराठी जनतेपर्यंत मराठी नेण्याचा, त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न कधी शासनाने केलाय? आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इतर कौशल्य निर्मिती जसे खेळ, भाषा, संवाद कौशल्य यावरही लक्ष दिले जाते. याच्याच जोडीने राज्यात नव्याने आलेल्या अमराठी भाषकांना मराठीच्या शिकवण्या कॉर्पोरेट स्तरावर कंपन्यांतूनच उपलब्ध करून दिल्या तर? यातून काही शैक्षणिक क्रेडिट देखील देता येतील. लोक मराठी शिकतील, अनेक मराठी तरुणांना उत्तम रोजगार मिळेल. राजा बोले दळ हाले या उक्तीप्रमाणे अशा मराठी शिकवण्यांची शिफारस शासनाने केली तर कितीतरी मोठ्या पटीत मराठीचा प्रसार होईल आणि बरंच व्यापक परिणाम सहज साधता येईल. 'फक्त मराठीतून बोला' हा आग्रह करण्यासोबतच त्यासाठीची यंत्रणा उभी करणे हेही महत्त्वाचं आहे आणि शासनाचं कर्तव्य आहे.

कॅनडात, ऑस्ट्रेलियात, अमेरिकेत मराठी शाळा आहेत, तिथली मुलं तिथे असून सुद्धा किती चटपटीत मराठी बोलतात यासारख्या कौतुकातून मराठीचा फक्त गौरव होईल, पण संवर्धन आणि प्रसार खूप दूरची गोष्ट आहे. आज दुर्दैवाने म्हणावे लागते की शासनातर्फे अशा रीतीने समाजाच्या उभ्या आडव्या स्तरात मराठीच्या प्रसारासाठी फारसे प्रयत्न झालेले मला तरी आजपर्यंत दिसलेले नाहीत. अतिपरिचयात् अवज्ञा या न्यायाने जर आपण आपली मातृभाषा गृहीत धरत असून तर तेही कुठेतरी थांबण्याची गरज आहे. ती भाषा आहे, तिच्याकडे भाषेसारखं बघितलं तर तिच्या संवर्धन आणि प्रसाराचे अनेकानेक सर्जनशील मार्ग आपल्याला सापडतील. अन्यथा तिची अवस्था गंगेसारखी होईल.

[हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने अनेक भारतीय भाषांना लागू होईल. आज हिंदी भाषा ही संवाद भाषा म्हणून वापरावी असा प्रस्ताव विचाराधीन आहे. भाषिक सौहार्द्रासाठी ते अनेक प्रकारे मारक आहे. या ऐवजी त्या त्या राज्यांनी अशी यंत्रणा राबवली तर त्यातून चांगले फलित मिळेल. इतर राज्यातही त्यांना हा प्रयोग करता येईल. उदा. पुण्यातून बंगलोरला अनेकजण जातात, तर पुण्यात कन्नडचे, तेलुगूचे क्लासेस का घेऊ नयेत? दिल्ली, चेन्नईतून लोक पुण्यात येतात तर त्या त्या ठिकाणी मराठीचे क्लासेस का असू नयेत? इतर देशांत जाताना आपण पूर्वतयारी म्हणून तिथली भाषा शिकतोच की! अनेक ठिकाणी ती प्राथमिक गरजही असते. तसंच अशा भारतीय भाषांच्या शिकवण्या या स्थलांतर करणाऱ्या लोकांना नक्कीच उपयोगी पडतील. नोकरी बदलल्यानंतर तीन महीने नोटिस कालावधी असतो. या कालावधीचा उपयोग तिथली भाषा शिकण्यासाठीही करावा असे धोरण राबवणे कठीण नाही. देशभर एकच संपर्क भाषा असण्यापेक्षा लोकांना त्यांच्या गरजेची आणि आवडीची संपर्क भाषा दिल्यास देशातील भाषिक सौहार्द टिकून राहण्यास आणि एकात्मता वाढण्यास नक्की मदत होईल.]

 

मंगळवार, २९ मार्च, २०२२

मार्च आला.. कर नियोजन सांभाळा

 पूर्वप्रसिद्धी - मार्च आलाय; कर नियोजन केलं की नाही? जाणून घ्या Tax वाचवण्याच्या टिप्स | Sakal (esakal.com)


तेजाली चं. शहासने

मार्च महिना हा ऋतुबदलाचा महिना. पानगळ सुरू होते. गरम व्हायला लागतं. लोकरीचे कपडे बॅगेत बंद होऊन सूती, मलमलीचे कपडे बाहेर येतात. चहाऐवजी लिंबू सरबत बरं वाटतं. एसी, कूलर्स परत सुरू होतात. एकूण काय आपण उन्हाळ्याच्या जय्यत तयारीला लागतो. पण यात चोरपावलांनी आणखी एक गोष्ट येते, काय बरं? कर नियोजनाच्या जाहिराती! आता कर नियोजनबद्दल माहिती देणाऱ्या, तुम्हाला घाबरवणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या, मदत करणाऱ्या, गोंधळात टाकणाऱ्या अशा असंख्य प्रकारच्या जाहिराती आता तुमच्या मेल बॉक्समधे,मोबाईलच्या मेसेज बोक्समध्ये, वेगवेगळ्या वेबसाइटवर धुमाकूळ घालायला सुरुवात करतील. आणि तुम्हाला एकदम जाग येईल की आपलं कर नियोजन राहिलंय आणि त्यामुळे आता भरभक्कम कर भरावा लागणार.

  भारतात आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपतं. त्यामुळे ज्यांना करपात्र उत्पन्न असलेल्यांची एकदम धांदल उडून जाते. वर्षभर कंटाळा करत पुढे पुढे ढकललेलं करनियोजन आता एकदम घशाशी येतं आणि कुठे ना कुठे पैसे गुंतवायचे आणि त्यातल्या त्यात जमेल तेवढा कर वाचवायचा या भावनेतून माणूस समोर येईल त्या कर नियोजन योजनेत पैसे गुंतवतो. इथेच फसव्या, दिशाभूल करणाऱ्या संस्था, योजनांचं फावतं. तात्पुरता आपला कर वाचतो पण बरेचदा गुंतवणूक तितकीशी फायदेशीर ठरत नाही आणि उलट दीर्घ मुदतीत आपल्याला भुर्दंड सहन करावा लागतो.

आता यातून आपला बचाव कसा करता येईल? सर्वांत पहिला आणि मोलाचा सल्ला म्हणजे आर्थिक शिस्त अंगी बाणवा. उत्तम संपत्ती निर्मितीसाठी काटेकोर आर्थिक शिस्त आणि नियोजन याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एप्रिल महिन्यापासून तुमचे अर्थ नियोजन करण्याची सवय लावून घ्या आणि ती काटेकोरपणे पाळा. अशी योग्य वेळी आणि विचारपूर्वक केलेली गुंतवणूक तुम्हाला उत्तम परतावा देईल.

आता वळू शेवटच्या महिन्यातील कर नियोजनाकडे. इथेही शिस्त महत्त्वाची. सर्वप्रथम स्थितप्रज्ञ राहा. गोंधळून न जाता शांतपणे तुम्हाला कशात गुंतवणूक करता येईल त्याचे उपलब्ध आणि तुम्हाला परवडणारे पर्याय लक्षात घ्या. 80C आणि 80D अंतर्गत बऱ्याचशा वजवटी येतात. 80D अंतर्गत वैद्यकीय उपचाराचा खर्च, वैद्यकीय विमा या बाबी समाविष्ट होतात. 80C अंतर्गत जास्तीत जास्त १५०,००० – २००००० पर्यंतचेच कर नियोजन होऊ शकते. यापेक्षा जास्तीची  गुंतवणुक वजावटपात्र नसते. म्हणजे एकूण कर बचत ही २०,००० पेक्षा जास्त होत नाही. जर तुमचे गृहकर्ज असेल तर बरेचदा त्यातूनच तुमचे पुरेसे करनियोजन होते. उरलेली रक्कम वरीलपैकी एखाद्या ठिकाणी गुंतवता येईल. कर नियोजनासाठी, हे सर्व एकत्र करून या व्यतिरिक्त आणखी गुंतवणूक आवश्यक आहे का हे नक्की पडताळा.   

तुमच्याकडे जवळपास तीन आठवडे विचार करण्यासाठी आहेत. कर बचतीसाठीच्या मुदत ठेवी हा एक सोपा सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. यात केलेली गुंतवणूक तीन वर्षे काढता येत नाही आणि मिळणारा परतावा त्या मानाने कमी असतो. पब्लिक प्रॉव्हिडंड फंड हा आणखी एक सुरक्षित गुंतवणुकीचा उपाय. अचानक कर नियोजनाची वेळ आली आणि गुंतवणुकीबाबत योग्य मार्गदर्शन करणारं कोणी नसेल तर हे दोन सर्वांत सुरक्षित पर्याय ठरतात.

यानंतरचे हुकूमी कर नियोजनाचे पर्याय म्हणजे कर बचतीचे म्यूचुअल फंड, विमा पॉलिसी, शासनाचे विविध बॉण्डस, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय निवृत्ती योजना, तुम्ही उद्योजक असाल तर स्थावर किंवा जंगम मालमत्तेची खरेदी, व्यावसायिक खर्च, देणग्या इत्यादी. जसं मी आधी म्हणाले, जरी कर नियोजन झालेले नसले तरीही मुळात भंबावून जाऊ नका.  

 सध्याची युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअरबाजार खाली आला आहे, त्यामुळे चांगले म्यूचुअल फंड वाजवी किमतीत मिळून पुढे दीर्घ मुदतीत ते चांगला परतावा देऊ शकतील. त्यामुळे टॅक्स सेव्हींग म्यूचुअल फंडचा विचार करता येईल.

पुढचा पर्याय विमा पॉलिसी.
जर विमा पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल तर विमा संरक्षण पुरेसे आहे ना हे पाहणे सर्वांत महत्त्वाचे. त्याचा हप्ता किती जाणार आणि त्यातून कशा कशा प्रकारे परतावा मिळेल यांची पूर्ण स्पष्टता मिळल्याशिवाय विमा घेऊ नका. मनी बॅक, इक्विटी लिंक्ड, यूलिप, एंडोवमेंट, रिटायरमेंट प्लॅन, टॅक्स सेव्हिंग प्लॅन अशा विविध योजना येतात. मार्चमधील तातडीचे कर नियोजन लक्षात घेता शक्यतो दीर्घ काळ हप्ते भरावे लागतील अशी नवी विमा पॉलिसी घेऊ नये. निर्णय चुकल्यास त्याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागू शकतात. एक लक्षात ठेवा की विमा ही गुंतवणूक नसून आपत्कालीन तरतूद आहे. इतर गुंतावणुकीप्रमाणे त्यातून परतावा मिळत नाही. पुरेसे विमा संरक्षण, आरोग्य विमा, निवृत्तीनंतरची तरतूद या प्रमुख बाबी सोडून अधिकचा विमा फक्त तुमचा खर्च वाढवेल.  

मालमत्तेच्या विक्रीतून जर भांडवली लाभ (कॅपिटल गेन) झाला असेल तर त्याची पुनर्गुंतवणूक अथवा ते विशिष्ट बँक खात्यात ठेवण्यास विसरू नका.  

यासोबतच या मार्च महिन्यात आणखी काही महत्त्वाची कामे जी प्रत्येक करदात्याने करणे आवश्यक आहे

1.आर्थिक वर्ष २०-२१चं कर विवरण पत्र भरलं नसेल तर विलंबित कर विवरण (belated income tax return) ३१ मार्च २०२२ पर्यंत भरता येईल.          

२. बँकेत तुमच्या KYCची पूर्तता करा. रिजर्व बँकेने यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत दिलेली आहे. KYCची पूर्तता नसेल तर नंतर तुम्हाला बँकांचे व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात.

३. तुमचे आधार आणि पॅन एकमेकांशी जोडा. यासाठी देखील ३१ मार्च २०२२ पर्यंतची मुदत आहे.   

४. करदात्याचे करदायित्व दहा हजाराच्या वर जात असेल प्रत्येक तिमाहीत अग्रिम कर (अॅडव्हान्स टॅक्स) भरावा लागतो. तुम्हाला अग्रिम कर लागू होत असेल तर तो भरण्याची मुदत १५ मार्चपर्यंत आहे. नंतर त्यावर १% दंड भरावा लागतो.  

तेजाली चं. शहासने

०४-०३-२०२२